इमारतीतील एका प्लॅट मध्ये हॉल मध्ये एका सोफ्यावर बसून चाळीशीचा विजय वर्तमानपत्र वाचत होता इतक्यात दारावरची बेल वाचली ( टिंग – टॉंग )
विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती
ती दिसायला सुंदर असली तरी मोलकरणीच्या वेशात दिसत होती म्हणजे तिचे केस विसकलेले होते.. पदर खोचलेला होता, साडी थोडी मलकटलेले आणि थोडी सावरून वर घेतलेली होती, चेहऱ्यावर अजिबात मेकप नव्हता, चेहरा किंचित थकलेला दिसत होता, शरीरयष्टी खूपच नाजूक म्हणजे ( झिरो फिगर ) होती.
तिच्या गळ्यात एक छोट मंगळसूत्र होत, हातात हिरव्या बांगड्या,पायात जोडवी,कानात छोटीशी सोन्याची कर्णफुले होती. विजयला दरवाज्यात पाहताच ती थबकली होती आणि तिला पाहून विजयही थबकला होता. पण दोघेही स्वतःला सवरत गालात किचिंत हसत होते…
विजय : ( तिच्याकडे पाहत ) प्रतिभा ! तू … इकडे काय करते आहेस ? ये ! ना !आत ये !
प्रतिभा : ( किंचित ओशाळत आत आली आणि विजयला म्हणाली ) विजय ! मला माहित नव्हते हे तुझे घर आहे . नाहीतर ! मी नसते आले, माझी घरकाम करणारी एक मैत्रीण म्हणाली की या घरात कामासाठी एक मोलकरीण पाहिजे म्हणून मी कामासाठी आले होते. बरं ! मी आता निघते आणि ती निघणार इतक्यात …
विजय : कोठे निघालीस ? बस ! मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो.
प्रतिभा : नको ! पाणी नको ! मी निघते मला अजून काही घरातील कामे करायची आहेत..
विजय ! मी बस म्हणालो ना ! ( तो आत जाऊन तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि सोफ्यावर किंचित सावरून बसलेल्या तिच्या हातात देत …
प्रतिभा ! तू कोणत्याही कामासाठी का माझ्या घरात आली असशील ! पण आजही मी तुला माझी मैत्रीण मानतो आणि भविष्यातही मानत राहीन.. माझ्या दृष्टीने कोणतेही काम हलके नाही ! मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नव्हतो , हे तुलाही माहित आहे आणि तसेही हे घर माझ्या मालकीचे नाही, मॅडमच्या मालकीचे आहे , त्या एका मोठ्या कंपनीत कामाला आहेत, त्यांना घरातील कामे करायला अजिबात वेळ नसतो, मी दिवसभर घरातच असतो माझी लिखाणाची आणि इतर कामे करत… तू माझी मैत्रीण असलीस तरी तुला ह्या घरात काम करायला काहीच हरकत नाही ! तू या घराला तुझेच घर समजून काम कर… तुला कामाची गरज आहे आणि आम्हाला मोलकरणीची ! तू उद्या सकाळी आठ वाजता कामाला ये ! मी मॅडमशी तुझी ओळख करून देईन तू त्याच्याशी पगाराचंही बोलून घे ! पगाराची तू चिंता करू नकोस तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच पैसे मिळतील कारण आम्ही घरातल्या माणसासारखीच तुझ्यावर घराची जबाबदारी टाकून बाहेर जाऊ शकू !
प्रतिभा : ठीक आहे ! मी उद्या सकाळी आठ वाजता येते ! ( ती सोफयावरून उठत दरवाज्यात गेली आणि तिचे हात नकळत विजयला टाटा करायला अर्धवट उंचावले…
ती निघून गेल्यावर विजयने दरवाजा बंद करून घेतला आणि तो पुन्हा सोफयावर बसून पेपर हातात घेत त्यात डोके खुपसून बसला… तास – दोन तासाने पुन्हा दारावरची बेल वाजली विजयने पुढे होत दरवाजा उघडला तर दरवाजात यामिनी उभी होती… ( यामिनी विजयची मॅडम, दिसायला अतिशय सुंदर , मध्यम बांधा , शरीरयष्टी प्रतिभासारखी नाजूक नाही पण जास्त स्थूलही नाही, अंगावर पुरुषी पोशाख ! म्हणजे सूट ! तोंडाला बऱ्यापैकी मेकप केलेला, ओठाला लिपस्टिक आणि गालाला लाली होती पण ती भडक नव्हती. बोलण्यात नाजूकपणा थोडा कमीच होता पण त्या बोलण्यात गोडवा मात्र नक्की होता, चेहरा बोलका आणि हसरा होता. ती आत येताच सरळ बेडरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊनच बाहेर आली आणि सोफ्यावर बसून टी .व्ही. सुरु केला , विजय सोफ्यावरून उठून आत स्वयंपाक घरात गेला आणि दोघानसाठीही चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आला, नाश्ता समोरच्या टेबलावर ठेऊन त्याने चहाचा एक कप यामिनीच्या हातात दिला आणि तो तिच्या शेजारी थोडे अंतर ठेऊनच बसला…
यामिनी : थँक्स !
विजय : ( गालातगोड हसला ) यामिनी ! आज एक बाई कामासाठी आली होती, आपण तिला कामावर ठेऊन घेऊ या ! सर्वात महत्वाचे म्हणजे, ती माझ्या ओळखीची आहे पूर्वी आमच्या चाळीत राहणाऱ्या मित्राच्या घरी ती यायची ! आता तिचे लग्न झालेले आहे तिला कामाचीही गरज आहे , ओळखीची असल्यामुळे तिच्यावर डोळे ढाकुन विश्वासही ठेवता येईल… उद्या सकाळी आठ वाजता येणार आहे ती.. तू तिच्याशी पगाराचे बोलून घे !
यामिनी : बरं झालं ! एकदाची मोलकरीण मिळाली , तुझ्या ओळखीची आहे ना ! मग प्रश्नच मिटला, तिला पाहिजे तेवढा पगार आपण देऊ ! तुला ही घरातील छोटी – मोठी कामे करताना पाहायला मला नाही आवडत…
विजय ! त्यात काय ? ही सर्व कामे मी लहानपणापासून करत आलो आहे…
यामिनी : पण मला करायला वेळ मिळत नाही याचे वाईट वाटते.
विजय : उद्या पासून प्रतिभा ! करेल ही कामे
यामिनी : प्रतिभा कोण ?
विजय : असं काय करतेस ? उद्या आपल्याकडे जी बाई कामाला येणार आहे तिचेच नाव प्रतिभा आहे
यामिनी : प्रतिभा ! छान नाव आहे…
विजय : यामिनी तू आज लवकर घरी आली आहेस तर आपण थोड्यावेळाने आज बाहेर फिरायला जाऊ आणि बाहेरूनच जेऊन येऊया !
यामिनी : विजय ! तू अगदी माझ्या मनातलं बोललास… ( आणि यामिनी हळूच विजयच्या मिठीत विसावली ) …
विजय : तिला आपल्या मिठीतुन हळुवार दूर करत सोफ्यावरून उठतो आणि म्हणतो… चला आवरा आता आपल्याला बाहेर जायचे आहे ना ?
यामिनी : जाऊ या रे ! काय घाई आहे …
विजय : मला घाई नाही ! पण तुला नटायला जरा जास्तच वेळ लागतो !
यामिनी : एकदा साडी नेसून बघ ! मग कळेल तुला , जास्त वेळ का लागतो !
विजय : माझी इच्छा खूप आहे ! पण तसा योग काही अजून आला नाही !
यामिनी : म्हणजे !
विजय : एखाद्या नाटकात स्त्री भूमिका करायला मिळायला हवी होती…
यामिनी: कशाला ? लिहितोयस तेवढे पुरेसे आहे !
विजय : बरं बाई ! तू ही आवर ! मी ही आवरतो माझे…
दोघेही मस्त तयार होऊन हॉलमध्ये येतात आणि लाईट बंद करून घराच्या बाहेर पडतात…
लेखक :- निलेश बामणे
Leave a Reply