“अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!!”
मर्ढेकरांच्या या अजरामर ओळींतून जोग रागाची पुसटशी ओळख मिळते. खरतर शब्द आणि सूर यांची नेमकी सांगड घालणे ते फार अवघड असते. त्यातून कविता हे माध्यम एका बाजूने शब्दमाध्यमातील सर्वाधिक लवचिक माध्यम आणि सूर तर नेहमीच अर्धुकलेली भावना दर्शविणारे. त्यामुळे कवितेसारख्या अत्यंत सक्षम आविष्कारातून देखील सुरांची नेमकी ओळख पटविणे तसे नेहमीच अवघड असते. जोग रागाचे सूर ऐकताना, नेहमीच, काहीसे अनोळखी सूर वाटत असतानाच एकदम, नव्याने ओळख झाल्यासारखे होते. एकतर हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही पण वादकांनी मात्र या रागावर प्रेम केले आहे, त्यामुळे या रागाचे सूर तसे अपरिचित वाटतात.
“रिषभ,धैवत” हे दोन्ही सूर वर्ज्य असलेल्या या रागात, “कोमल निषाद” आणि “कोमल + शुद्ध गंधार” या सुरांचे प्रमुख अस्तित्व दिसते. यातील “शुद्ध गंधार” हा आरोही स्वरांमध्ये तर “कोमल गंधार” हा अवरोही स्वरांमध्ये स्थान मिळवून आहे. दोन सूर वर्ज्य असल्याने, रागाची जाती – औडव/औडव असणे क्रमप्राप्तच ठरते.
मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास, “सा ग म प”,”नि प म ग”,”ग म ग ग सा”,”ग म प नि सा” या स्वरसमुहांचे विशेष प्राबल्य आढळून येते. उत्तरांग प्रधान राग असून, कधीकधी अवरोहात “तार षडज” वापरला जातो आणि विशेषत: मिंडकामासाठी या स्वराचा उपयोग केला जातो. प्राचीन ग्रंथांत या रागच समय रात्रीचा दुसरा प्रहर दिलेला आहे, त्यामुळे असेल पण, रागाची ठेवण बरीचशी नाजुकपणाकडे झुकलेली आहे. ताना, बोलताना यात फारशी वक्रता आढळत नाही.
सतार वादनात, पंडित रविशंकर हे नाव फार मोठ्या आदराने घेतले जाते आणि ते योग्यच आहे. सतार वादनाची नवीन “भाषा” तयार करणारे आणि रूढ करणारे, असा हा अद्वितीय कलाकार. सतार हे तंतुवाद्य, तेंव्हा वाद्याला अनुकूल असे वादनाचे “तंतकारी” तंत्र या कलाकाराने विकसित केले आणि त्याला जगभर मान्यता मिळवून दिली. इथे आता आपण जोग राग ऐकताना, याचीच प्रचीती येईल. आलापीमध्ये, वर निर्देशिलेल्या स्वरसंहतीचे प्रत्यंतर घेता येते. सुरवातीलाच, “सा ग म प” आणि ” ग म ग ग सा” ऐकायला मिळतो आणि “कोमल गंधार” स्वरावर घेतलेला ठेहराव, आपल्याला जोग राग दाखवून देतो. आणखी एक वैशिष्ट्य ऐकायला मिळते, स्वरांच्या तुटक आघातातून, घेतलेली मिंड. हा प्रकार तर फारच विलोभनीय आहे. रचना कशी हळूहळू विस्तार करत, “बढत” घ्यायची, हा भाग देखील तितकाच अप्रतिम आहे. “आलाप”,”जोड” आणि पुढे “झाला” असे सगळे अलंकार व्यवस्थित सादर करून मग, वादनातील “गत” सादर केली आहे.
” दिल से रे” ही “दिल से” चित्रपटातील अप्रतिम रचना आपण ऐकायला घेऊया. संगीतकार रेहमान, ही कधीच, रागाचा संपूर्ण असा आधार घेत नाही. रागातील एखादीच हरकत, सुरावट, त्याला चाल बांधण्यासाठी प्रवृत्त ठरू शकते. या गाण्याच्या बाबतील, जेंव्हा “जोग” रागाशी आपण “जोड” लावायला जातो तेंव्हा, आपल्याला गाण्याकडे सरळ दृष्टीने बघून, चालणारे नाही कारण रागाचे वळण आणि या गाण्याच्या चालीचे वळण, यात बरीच तफावत आढळते. पहिली ओळ तार स्वरात आहे पण, तीच ओळ परत घेताना, जेंव्हा काहीश्या ढाल्या किंवा खर्जातील स्वरांत गाणे येते, तिथे जोग रागाची ओळख मिळते. परंतु, अशा रीतीने रागाची ओळख करून दिली तर तो रेहमान कसला? एकतर त्याला, कर्नाटकी ढंगात, पाश्चात्य सुरावटींचा प्रयोग नेहमी करावासा वाटतो. त्यामुळे, गाण्यात, पारंपारिक ठसा तसा सहज आढळत नाही. आता या गाण्यात केरवा तालाचा उपयोग आहे पण, जर का तालाच्या मात्रा हातावर मोजायला घेतल्या तरच, तालाची खूण पटते अन्यथा कुठला ताल आहे, याचा पत्ता लागत नाही. या गाण्यात, रेहमान, गायक म्हणून आपल्या समोर येतो. तसे बघितले तर गायक म्हणून त्याच्या आवाजाला मर्यादा आहेत आणि त्याच्या एकूणच सांगीतिक प्रवृत्तीवर, कर्नाटकी संगीताचा जाड ठसा बघायला मिळतो. त्यामुळे, काहीवेळा शब्दांचे उच्चार खटकतात पण, इथे एक बाब ध्यानात घ्यायला हवी, रेहमान हा काही “गायक” नव्हे. प्रासंगिक तत्वावर गायन,हेच खरे.
“एक सुरज निकला था, कुछ पर पिघला था;
एक आंधी आयी थी, जब दिल से आह निकली थी;
दिल से रे दिल से.”
आता, रेहमान, एक संगीतकार म्हणून थोडे मुल्यमापन करायला घेऊया. चित्रपट संगीताच्या रूढ आणि मान्य शैलीपासून अनेक बाबतींत दूर सरकणारी अर्थपूर्ण रचनापद्धती रेहमानने वापरली आहे. अधिक महत्वाची बाब म्हणजे, भारतीय तालाच्या वर्तुळात्मकते ऐवजी तो अखंड कालविभाजनाने लयावतार घडविण्याचा अवलंब करतो. त्यामुळे त्याचे लयबंध आधुनिक वाटतात. रेहमानने आणखी एक रचनापद्धत योजली आहे आणि ती अशी, की तसे पाहता स्वतंत्र म्हणजे एकल गायनाच्या मार्गाने जाणाऱ्या संगीतात, त्याने अनपेक्षित जागी आणि वेगळ्या प्रकारे समुहगायन किंवा आवजी सादरीकरण आणले आहे. काहीवेळा हे सामुहिक आविष्कार पार्श्वसंगीताची जागा घेतात, तर काही वेळा आपतत: स्वनरंग पुरवणाऱ्या रचनातत्वांचा अंतर्भाव करतात. तसेच रेहमान आपल्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवतो. अनेकदा त्याचे संगीत आकर्षक पण भंग पावलेले आणि गीतत्वापर्यंत न पोहोचू शकणारे सुरावटींचे आकृतिबंध निर्माण करते. याचाच वेगळा अर्थ, अजूनही त्याच्यावर जाहिरात किंवा जिंगल्स संगीताचा प्रभाव आहे. आणखी एक मत मांडायचे झाल्यास, रेहमानच्या कामाची पुर्वावृत्ती राहुल देव बर्मनच्या संगीतात होती, असे जाणवते. भारतीय कलासंगीतापासून दोघेही दूर जातात, पण पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे वळूनही पाहतात.
“त्या सावळ्या तनूचे” हे गाणे, “जोग” रागाशी फार जवळचे नाते दर्शवते. माणिक वर्मांच्या आवाजातील ह्या गाण्याने एके काळी, महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. वास्तविक, मुळातील रागदारी संगीतातील गायिका परंतु सुगम संगीतात, स्वत:चे ठाम स्थान निर्माण केले. एका दृष्टीने विचार केल्यास, ही फारच दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. या गाण्यात, “जोग” रागाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. विशेषत:, गाण्याच्या हरकतींतून तर लगेच ओळख पटते. दशरथ पुजारींच्या सरळ, साध्य, अनलंकृत चालीतून, रागाचे स्वरूप उभे राहते. दशरथ पुजारी हे तसे फार लोकप्रिय संगीतकार नव्हते, शंभर एक भावगीते – इतकीच त्यांची बव्हंशी सांगीतिक कारकीर्द होती पण तरीही, अनेक अजरामर गाण्यांचा जन्म त्यांच्या हातून झाला, असे नक्कीच म्हणावे लागेल. या गाण्याची चाल, काहीशी गायकी ढंगाची आहे पण, तरीही गाण्यातील हरकती बघत, त्यात फार काही “वक्र” गतीच्या ताना आहेत, असे आढळत नाही.
“त्या सावळ्या तनूचे मज लागलें पिसें ग;
न कळे मनांस आता या आवरू कसे ग.”
माणिक बाईंचे गायन आणि सुगम संगीतातील योगदान, हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. ज्या हिशेबात, रागदारी गायनात, सहजता आणि संयम, या गुणांचा आढळ होता, त्याचेच नेमके प्रत्यंतर सुगम संगीतात येत असे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, सुरवातीच्या गाण्यांत ताजेपणा अधिक होता, त्यात पुढे सफाईदारपणा आला. त्यांची भावगीते ऐकताना, विस्ताराच्या शक्यता भरपूर आढळतात. तालाशिवाय घेतलेली आलापी, किंवा तालासाहित घेतलेले आलाप किंवा हरकती ऐकताना, गायकी अंग अधिक स्पष्ट होते. तसे बघितले तर मराठी भावगीतात, त्याने उत्तरेचा ढंग मिसळला. पंजाब अंगाची फिरत पण त्यात मादकपणाचा अंश नाही, नखरा देखील लखनवी ढंगाचा नाही. त्या दृष्टीने बनारसी ढंग जवळचा वाटतो. मुखडा खालच्या अंगाने येणारा असला तरी, पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. संदिग्ध गोडवा हा स्थायीभाव, हेच खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
“पाणीग्रहण” नाटकात जोग रागाचा आधार घेतलेले एक सुंदर गाणे आहे – प्रेम हे वंचिता. संगीतकार श्रीनिवास खळे साहेबांनी याची चाल बांधली आहे.
“प्रेम हे वंचीता, मोह ना जीवनाला;
द्या कुणी आणून द्या प्याला विषाचा.”
गाण्याची चाल जरा बारकाईने ऐकली तर काहीशी उर्दू “गझल” थाटावर चाल गेली आहे असे वाटते आणि त्या दृष्टीने गायन देखील त्याच धर्तीवर झालेले आहे. प्रसिद्ध लेखक प्रल्हाद केशव अत्र्यांची शब्दकळा आहे आणि गीतरचना चालीच्या दृष्टीने ठीकठाक आहे.
सुप्रसिद्ध गायक गुलाम अलींची एक रचना – उन पे कुछ इस तरह प्यार आने लगा, जोग रागाशी नाते सांगणारी आहे. खर तर ही रचना म्हणजे गझल न म्हणता गीतसदृश रचना म्हणता येईल आणि नेहमीप्रमाणे, गुलाम अली हे केवळ रागाचा आधार घेतात आणि विस्तार मात्र आपल्या मगदुराप्रमाणे करतात. त्यामुळे त्यांच्या रचनेत रागाचे नेमके स्थान ठरवणे बरेचवेळा दुरापास्त होते.
“उनपे कुछ इस तरह प्यार आने लगा,
बेकरारी को करार आने लगा”.
गायनात गुलाम अलींची नेहमीची खास गायकी दिसते म्हणजे लयीचे वळण, मध्येच अकल्पितपणे बदलायचे, एखादा शब्द उच्चारताना त्याला हरकतीची जोड द्यायची इत्यादी. अर्थात ही हरकत देखील अति अवघड घ्यायची, ज्यायोगे ऐकणारा अचंबित होऊन जातो.
— अनिल गोविलकर
Leave a Reply