हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं.
जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या ’ आखरी पैगाम” द्वारे ते’ रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा ’बाजी’ झळकला.आणि जॉनी वॉकरयांनी मागे वळून पाहिले नाही.
बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना “जॉनी वॉकर” हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा ‘जॉनी वॉकर’ झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या ’मधुमती’त जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले ‘हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.
देव आनंद यांच्या सोबत ‘सीआयडी’त तर त्यांनी कमाल केली होती.. ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जान’ हे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की ’जॉनी वॉकर’नावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती. श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले.
मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून ‘आनंद’ गुलज़ार यांच्या आग्रहावरून ‘चाची ४२०’ या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply