“त्याला “जोकर” हे नाव शाळेत असतानाच पडलं.. . कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं .. आणि तो सुद्धा ते नेहमीच सार्थ ठरवायचा .. अभ्यासात फार काही चमकदार नसला तरी सुस्वभावी आणि निरुपद्रवी होता ..किंबहुना कोणाला काही मदत हवी असली तर लगेच करायला जायचा ….पण मित्र त्याला फार काही जवळ करायचे नाहीत .. चिडवायचे ,हसायचे त्याला ….. त्यामुळे मित्रांच्या अनेक ग्रुपपैकी कुठल्याच विशिष्ट अशा ग्रुपचा भाग नव्हता तो कधीच .. अगदी अलिप्त नसला तरी शक्यतो आपला आपलाच असायचा .. तरीही प्रसंगी कोणाच्यातही मिसळू शकेल असा मनमिळाऊ होता .. मुळात कोणाचा त्याच्यावर राग, द्वेष वगैरे नव्हता पण शाळेतल्या भाषेत सांगायचं तर मुलांना चिडवण्यासाठी , टिंगल करण्यासाठी वर्गात असलेलं “हक्काचं गिऱ्हाईक” होता ….. जसे जसे सगळे मोठे होत गेले तसे या जोकरची जोकरगिरी आणि बाकीच्यांचं चिडवणं वाढतंच गेलं .. यानी मात्र कधीही ते अंगाला लावून घेतलं नाही .. उलट जोकर हे नाव लहानपणापासून इतकं बिंबलं होतं मनावर की “कुणीही निंदा ,कुणीही वंदा ,हसविण्याचा आपुला धंदा “ हे ब्रीदवाक्य असल्यासारखंच जगायचा तो ..
बोलता बोलता दहावी झाली आणि सगळे आपापल्या करीयरच्या वाटा शोधत वेगवेगळ्या ठिकाणी पांगले .. अनेक वर्ष लोटली … सगळे मार्गाला लागले , संसारात गुरफटले .. मोजके मित्र सोडले तर बरेच जण संपर्कात नव्हते एकमेकांच्या . कोणाच्या तरी डोक्यात WhatsApp group करायचं आलं आणि एकेकाची “धरपकड” सुरू झाली .. बरेच जण जमले. शाळेतल्या गमती जमती ,किस्से ,आठवणी असलेले chats ओसंडून वाहू लागले . .. इतक्यात एकानी मेसेज केला “अरे आपला जोकर कुठाय ???” .. कोणाच्याच संपर्कात नव्हता तो .. इकडून तिकडून माग काढत एकदाचा सापडला आणि आणला त्याला कळपात ..जवळच असलेल्या त्याच्या मूळ गावात स्थिरस्थावर झाला होता जोकर .. पुन्हा एकदा सगळ्यांना ऊत आला .. आणि ई-टवाळी सुरू झाली ग्रुपवर .. त्यातच re-union ची तारीख ठरली .. परवानगी घेऊन शाळेतच भेटणार होते .. सगळे जमले.. गावाहून यायला थोडा उशीर झाला म्हणून जोकर धावत धावतच आला.. कल्ला चालू झाला सगळ्यांचा .. एकीकडे चहा आणि गप्पा .. “मित्रामैत्रिणींनो .. पिकनिक ला जाऊया का कुठेतरी ??”.. ग्रुप अॅडमिन वदले आणि पुन्हा चर्चेला उधाण आले . “फार लांब नको रे !!” , “एखाद दोन दिवसच जाऊया !!” , “खूप महाग नको !!” , “महिलांच्या दृष्टीने सुद्धा सोयीचं हवं !!” , “खूप गर्दीचं ठिकाण नको गं !!” असे अनेक मुद्दे लक्षात घेत बरीच ठिकाणं चर्चेत आली अन त्याच पावली गेली .. निष्पन्न काहीच झालं नाही .. आणि शेवटी “जोकर” म्हणाला … “ एक काम करू .. सगळे माझ्या गावाला चला .. प्रवास खूप नाहीये .. सध्या हवा सुद्धा झकास आहे .. काही पिकनिक स्पॉट आहेत जवळ .. माझ्या घराजवळ ग्रामदेवतेचं देऊळ आहे तिथल्या भक्त निवासात सगळ्यांच्या राहण्याची उत्तम सोय होईल . बाकी चहा-नाश्ता-जेवण सगळं माझ्या घरी अॅरेंज करतो …. मोठी पडवी आहे माझ्या गावच्या घराची.. आमच्याकडे स्वयंपाकाला येणाऱ्या मावशीच्या हाताला जबरदस्त चव आहे …. काय म्हणता मग ??”
“अरे पण तुला तुझ्या कामातून, नोकरीतून वेळ होईल का हे सगळं बघायला ? आणि घरच्यांना चालेल का आम्ही सगळे आलो तर इतके जण ??” .. एकाने सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारले. “छे छे पोरांनो !! तो काहीच प्रॉब्लेम नाही !! घराच्या बाहेरंच माझं दुकान आहे.. इलेक्ट्रिकल वस्तु-उपकरणं वगैरे रीपेअरिंगचं.. त्यामुळे मला लक्ष ठेवायला वेगळं कुठे जायला नको .. आणि हो मी एकटाच रहातो बरं का !! .. तुमच्यासारख्या परिवाराच्या जबाबदऱ्या नाहीत मला .. आई-वडील ३-४ वर्षांपूर्वीच गेले आणि या जोकर बरोबर लग्न करायला लेडी-जोकर नाहीये कोणी !!.. .. हॅं हॅं हॅं !!.. या बिनधास्त सगळे .. काssय टेन्शन नाssय !!! “
हा प्रस्ताव सर्वसमावेशक असल्याने अर्थातच मान्य झाला आणि ज्यांना शक्य होतं ते २५-३० जण ठरलेल्या दिवशी आपापल्या गाड्या काढून जोकरच्या गावी पोचले.. जोकरनी सुद्धा सांगीतल्याप्रमाणे चोख व्यवस्था केली होती . ..ग्रुप मधला एक जण “प्रोफेशनल फोटोग्राफर” असल्याने त्यालाच या ट्रीपची फोटो-व्हीडियोची जबाबदारी दिली होती आणि तोही सतत कॅमेरा गळ्यात अडकवून ईमाने ईतबारे प्रत्येक ठिकाणाचं , छोट्यामोठ्या गोष्टीचं शूटिंग करत होता. दिवसभर गाव भटकून संध्याकाळी दमून भागून सगळे आले आणि जोकरच्या घराच्या पडवीत गप्पा मारत बसले .. फोटो-व्हीडियो बघत , त्यावरून शाळेतल्या आठवणी ,मजा मस्करी , मुला मुलींवरून चिडवाचिडवी सगळी धमाल सुरू होती .. पण या चेष्टेत आजही केंद्रस्थानी होता तो हसणारा-हसवणारा जोकरच.. आजही हक्काचं गिऱ्हाईक.. तो मात्र त्याच्या व्यवस्थेत व्यग्र होता .. रात्रीचं जेवण झाल्यावर सगळे भक्तनिवासात झोपण्यासाठी निघाले . “ उद्या सकाळी या रे वेळेत . मावशीच्या हातचा गरमा गरम उपमा खायला !!.. जोकरच्या या उबदार वाक्यानी त्या थंडीतल्या दिवसाची सांगता झाली ..
दुसऱ्या दिवाशीची प्रसन्न सकाळ उजाडली आणि जोकरकडे जाण्याआधी काही मित्रमंडळी मोकळ्या हवेत मॉर्निंग वॉकला गेली . वाटेत मस्त गवती चहाचा वास आला आणि मोह न आवरून त्यांची पावलं टपरीकडे वळलीच. चहाचा आस्वाद घेत असतानाच त्या वयस्कर चहावाल्यानी विचारलं .. “ काय ओ !! तुम्ही जोकरकडे पाहुणे आले ना !! गावात या बातम्या लगेच समजतात त्यामुळे त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं पण तरीही हा प्रश्न ऐकून मित्र थोडे चपापले .. कारण “जोकर” हे नाव त्यांचं शाळेतलं होतं .. गावात त्याला खऱ्या नावानी हाक मारणं अपेक्षित होतं. .. मग मित्रांचा आणि चहावाल्याचा संवाद सुरू झाला .. “हो काका !!.. पण तुम्हाला जोकर नाव कसं समजलं ??” कसं समजलं म्हणजे ?? आख्खं गांव त्याला याच नावानी ओळखतं .. आत्ताच नाही .. शाळेत असताना सुट्टीला गावी यायचा तेव्हांच तो म्हणायचा “”मला जोकर व्हायचंय !!” .. “कमाल आहे .. हा अजून असाच आहे तर !! आम्हाला वाटलं मोठा झाला असेल आता !!”.. मित्र थट्टेच्या सुरात म्हणाला. “अहो पाहुणे !! कमाल आहे म्हणजे काय ?? हा जोकर आमच्या गावाची शान आहे.. असा कमाल माणूस सापडणार नाही कुठे .. त्याच्या दिसण्या-वागण्यावर आणि त्या छोट्या दुकानावर जाऊ नका तुम्ही !!”.. “म्हणजे ? नक्की काय करतो हा जोकर ??”
ही चर्चा ऐकून चहाच्या टपरीवर आलेला गावकरी सांगू लागला … “तो काय करत नाही ते विचारा ? .. कोणाला कसलीही अडचण असली की हा हजर .. कोणी आजारी पडलं की औषध आणून दे .. कोणाकडे गरोदर बाईला अचानक रात्री अपरात्री कळा सुरू झाल्या की पहिला फोन जोकरला .. झोपेतून उठून दुसऱ्या मिनिटाला त्याची मारुती गाडी घेऊन हा दारात उभा .. कोणाकडे लग्न असलं की हा कायम दिमतीला .. कोणाचं मयत झालं तर पठ्ठ्या सगळं सामान खरेदी करून खांदा द्यायला तयार ….मोठी मुलं क्रिकेट खेळतात तेव्हा आमची धाकटी रडायला लागली .. खेळायला कोणी नाही म्हणून .. तर हा लहान होऊन आट्यापाट्या खेळला .. बंड्याची एसटी चुकली तर एनडीएच्या परीक्षेसाठी बाईकवर घेऊन गेला त्याला .. ते पोरगं सैन्यात नाव काढतंय आज …. समोरची म्हातारी एकटीच असते ..पावसात घर गळायला लागलं तर तिला ताडपत्री टाकून देईल .. त्या गंगूच्या सासऱ्याला मोबाईल शिकवेल …..कधी कोणाचा मेकॅनिक बनेल , कधी ड्रायव्हर , कधी प्लंबर ..अजून काय काय सांगू हो तुम्हाला .. ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता असते ती पूर्ण करायला देवासारखा धावून येतो हा …. असला “कमी तिथे आम्ही” गडी आहे हा जोकर .. आहे की नाही कमाल माणूस ??? ..
हे सगळं ऐकून मित्रांचा जोकरकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला .. आदर वाटू लागलाच पण आता थोडं अपराधीही वाटू लागलं.. त्याच विचित्र मनस्थितीत ते इतर मित्रांपाशी गेले .. त्यांनाही हा सगळा प्रसंग सांगितला .. आणि ठरल्याप्रमाणे सगळे जोकरच्या घरी न्याहरीसाठी पोचले .. तर गॅसशेगडीवरून मोठ्ठं पातेलं उतरवत जोकर म्हणाला .. “अगदी वेळेवर आलात !! “चला दोस्तहो उपम्यासंगे बोलू काही !!.. “ हा हा.. “हे काय ? तू केलास उपमा इतक्या सगळ्यांचा ? मावशी कुठे आहेत ?” .. मैत्रीणीने आश्चर्याने डोळे मोठे करत विचारलं . “अगं मग काय .. मावशीच्या घरी सकाळीच सकाळी अचानक लेक-जावई आले मुंबईहून .. मग मीच म्हंटलं .. तू कर त्यांचा पाहुणचार .. माझे मित्र तरी माझ्या हातचा उपमा कधी खाणार ??” … गरमागरम उपम्यावर खोबरं-कोथिंबीर आणि शेव भुरभुरवत जोकर म्हणाला . या “शेफ जोकर”कडे बघून चहाच्या टपरीवरच्या संभाषणाचा लगेचच प्रत्यय आला .. किंबहुना आता तो मित्रांच्या नजरेस पडला .. कारण मदतीचा स्वभाव तर त्याचा शाळेपासूनच होता .. “ओ जोकर शेठ .. तू बस आधी इकडे !!” ..“एकदम शेठ वगैरे .. उपमा येतो रे मला करता .. घाबरू नका !! हा हा हा !!!…. “ते जाऊ दे .. आम्हाला तुझ्याबद्दल सांग ना .. तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय आम्हाला !!” .. एकाचं कुतुहल बाहेर पडलं ..
अरेsss माझ्याविषयी जाणून घ्यायला मी काय अमिताभ बच्चन आहे की सचिन तेंडुलकर ?? .. माझं आयुष्य म्हणजे उघडलेलं पुस्तक आहे .. त्यात काय एवढं ??” .. “नाही .. तरी सांग .. दहावी नंतर काहीच कॉनटॅक्ट नव्हता आपला .. आणि इथले लोक सुद्धा तुला जोकर नावानी कसे ओळखतात ?? सांग नाsss”.. “अच्छा !! या गावकऱ्यांनी शाळा घेतली होय तुमची ??”
नाश्ता होईपर्यंत सगळ्यांचा आग्रह आणि विनवण्या ऐकून शेवटी काहीसा गंभीर होत जोकर बोलता झाला .. “बारावीपर्यंत तिथेच होतो .. आई आजारी होती म्हणून बारावी झाल्यावर इथे गावाला आलो .. परिस्थिती अशी उद्भवली की पुढे शिकू शकलो नाही .. मग पडेल ते काम केलं ..रीपेयरिंगचे छोटे मोठे कोर्सेस केले .. इलेक्ट्रिक वस्तु , मोबाईल वगैरे , थोडं सुतार काम सुद्धा केलं ..जे जे शक्य असेल ते शिकत गेलो .. चरितार्थासाठी हे दुकान काढलं .. आज काही फार पैसे कमावले नाहीत मी .. पण माझा मी एकटा खाऊन पिऊन सुखी आहे .. माझ्याकडे तुमच्या सारखं भिंतीवर लावायला “डिग्रीचं सर्टिफिकेट” नाही किंवा अभिमानाने चारचौघांना दाखवायला हातात सर्टिफिकेटची सुरळी घेऊन , “चौकोनी काळी टोपी घातलेला फोटो” नाहीये ..अर्थात डिग्री नसल्याची खंत,सल मला कायम आहे आणि पुढेही राहील !! .. पण एक सांगतो मित्रांनो .. मी ठरवलं होतं की आपण फार यशस्वी झालो नसलो तरीही एक “चांगला माणूस” नक्की व्हायचं .. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटावा असं काही केलं नसलं तरी त्यांच्या आत्म्याला वाईट वाटेल असं नक्कीच वागायचं नाही .. आयुष्यात माझ्यामुळे कोणीही दुखावला जाणार नाही याची कायम काळजी घ्यायची .. म्हणूनच मला एक वाक्य खूप आवडतं की “आपल्या दुःखाने कोणाला हसू आलं तरी चालेल पण आपल्या हसण्याने कोणाला दुःख होता कामा नये”…….. तुम्ही मला शाळेत “जोकर” म्हणायचात .. खूप चिडवायचात .. ते मी मजेत घेत असलो तरी कधीतरी वाईट वाटायचं यार !!..”जोकर” शब्दाचा राग यायचा .. पण एकदा मे महिन्याच्या सुट्टीत , ८ वी -९ वीच्या असेल कदाचित .. मी बाबांबरोबर रमी खेळत होतो .. अगदी आत्ता आपण बसलोय ना ss याच ठिकाणी . लागोपाठ दोनदा माझी रमी झाली , पण ती माझ्याकडे असलेल्या “जोकर” मुळे . एकदा “तिर्री” च्या जागी आणि एकदा “राजा”च्या ऐवजी “जोकर” लावत .. बाsss स .. तेव्हाच मी ठरवलं .. आपण मोठेपणी “जोकरच” व्हायचं .. पण नुसता “सर्कशीतला जोकर” नाही तर त्याबरोबरच “””””पत्त्यातला जोकर””””” व्हायचं .. हसणं-हसवण्या सोबतच ज्याला ज्याची गरज आहे ते आपण व्हायचं ..पोकळी भरून काढायचा प्रयत्न करायचा .. “एक्का-राजा-राणी” पासून वेळप्रसंगी “दुर्री-तिर्री” सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे .. कोणाची “रमी” होवो किंवा न होवो पण आपल्या असण्याने कोणाच्या आयुष्यातला किमान “सिक्वेन्स” जरी पूर्ण झाला तरी त्याचा आनंद काही वेगळाच असतो .. आणि याची जाणीव वय वाढत गेलं तशी अधिक होत गेली .. “जोकर’ शब्दाबद्दलचा राग जाऊन आदर वाटू लागला .. त्याची “किंमत” समजली असं म्हणूया हवं तर .. त्या दिवसापासून मी तुमचं चिडवणं सुद्धा सकारात्मक घेऊ लागलो आणि enjoy करू लागलो “…. मग मी माझं “जोकर” हेच नाव सगळ्यांना सांगत आलो कायम .. खरं तर हे नाव बहाल केल्याबद्दल तुमचेच आभार मानायला हवेत मी .. कारण या नावामुळेच तर मला जोकरचे हे दोन पैलू लक्षात आले ..
हळूहळू जोकरनी कुठलाही आडपडदा न ठेवता आपला बराचसा जीवनपट आपल्या बालपणीच्या सवंगड्यांसमोर उलगडला .. शाळू मित्रांसोबतचे बंध खरंच निरागस ,निरपेक्ष आणि तितकेच घट्ट असतात .. “…..आणि आता तर मला या “जोकर” असण्याची सवयच झालीये .. हे गाव माझा परिवार झालाय बघा आता …..म्हणूनच मी लग्न सुद्धा केलं नाही अजून .. कारण माझ्या कुटुंबाच्या जबाबदऱ्यात अडकलो असतो आणि या गावकऱ्यांच्या उपयोगी पडता नसतं आलं तर .. लग्न केल्यावर हा “जोकर” काही जोकर राहिला नसता .. “साधा पत्ता” झाला असता कुठलातरी …. किंवा तुमच्यासारखा “पत्ता कट” झाला असता माझा सुद्धा .. हा हा हा !!! .. पुन्हा एकदा मिश्किलपणे त्यानी विषय आटोपता घेतला .. अखेर त्याचा निरोप घेऊन , एक प्रेरणा घेऊन ,खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन गवसलेल्या पिकनिकहून सगळे परतीच्या प्रवासाला निघाले.. पण जोकरसाठी काहीतरी करावं असं सगळ्यांनाच मनोमन वाटत होतं ..
आज शाळेत एक कार्यक्रम आहे .. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचं नाव उज्ज्वल केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी .. या सगळ्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांबरोबरच .. “प्रेरणादायी व्यक्तिमत्व” म्हणून “विशेष सत्कार” केला जाणार आहे तो या बारावी पास “जोकर”चा .. जमलेल्या सर्वांना त्याचं खरं रूप समजावं म्हणून त्या फोटोग्राफर मित्रानी “चहावाल्याचं बोलणं , गावकऱ्यांच्या भावना , जोकरचं मनमोकळं व्यक्त होणं , गावचा आजूबाजूचा परिसर , निसर्ग ” या सगळ्याचे व्हिडियो संकलित करून सुंदर फिल्म तयार केली होती .. “जोकर” शीर्षक असलेली .. ती तिथे दाखवली .. ती संपताच व्यासपीठावर येण्यासाठी जोकरचं नाव पुकारलं गेलं आणि नेहमी सगळ्यांना हसवणाऱ्या हसतमुख जोकरच्या डोळ्यात आज मात्र पाणी तरळलं .. त्याच भावुक अवस्थेत तो स्टेजवर जाण्यासाठी निघाला आणि पूर्ण प्रेक्षागृहात standing ovation देत समस्त माजी विद्यार्थ्यांचा एकंच जयघोष दुमदुमत होता .. “जोsssकर , जोsssकर , जोsssकर , , जोsssकर , जोकर , जोकर !!!”
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply