नवीन लेखन...

“जोखीम”

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता. मनू ने लग्न स्वतःच जमवलं असलं तरी मुलगा लाखात एक होता. दोघेही डॉक्टरच त्यामुळे दोघांचं फील्ड एकच. दोन्ही घरून मान्यता त्यामुळे सगळं कसं दणक्यात होतं. शिवाय मुलीची बाजू म्हणून संयोगिता ने सगळ्यात जातीने लक्ष घातलं होतं. तसं भोसले मंडळींनी आधीच सांगितलं होतं, “मुलीची बाजू मुलाची बाजू असं काही नाहीये. आपण सगळे सारखेच आहोत.” त्यांच्या या पुढारलेल्या विचारांनी संयोगिताच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. आजूबाजूला कामं करायला मनू ने माणसं नेमली होती. तिने लग्न ठरलं तेव्हाच संयोगिताला सांगून टाकलं होतं, “आई तू अजिबात दगदग करायची नाहीस. आजपर्यंत खूप केलं आहेस. आता फक्त कामं करून घ्यायची माणसांकडून.”
मनूला तयार व्हायला थोडा वेळ होता त्यामुळे ती हॉल मधल्या सोफ्यावर काही काळच विसावली. तिला कालची रात्र आठवली. काल सगळीकडे निजानीज झाल्यावर ती विचार करत बसली होती, “आज सुबोध हवा होता. त्यालाही आनंद झाला असता का? की त्याच्या आईसारखाच, त्याचाही इतका खर्च बघून चेहरा पडला असता. या गोष्टीलाही आता २६ वर्ष झाली. काळ कुठल्या कुठे जातो. संयोगिता प्रेग्नंट होती तेव्हा सुबोध, त्याची आई आणि बाबा कित्ती खुश होते. सगळं अगदी हाताहातात आणून द्यायचे. खूप काळजी घ्यायचे. खाण्यापिण्यावर पण अगदी जातीने लक्ष होतं सासूबाईंचं. पण बाळ झाल्यावर जणू त्यांच्यात हिंस्र पशुच संचारला. कुणी बघायलाही आलं नाही माझ्या राणीला. सुबोध एक दोन दिवस येऊन गेला खरा. पण बोललाच नाही जास्त काही. निघायच्या आदल्या रात्री त्याने जे काही सांगितलं ते ऐकून अंग आणि मन बधिरच झालं होतं आपलं.” आत्ताही डिसेंबरच्या थंड बोचऱ्या हवेतही ते आठवून तिला दरदरून घाम फुटला. त्यावेळी तो अगदी बाजूला प्रेमाने येऊन बसला आणि म्हणाला, “ संयु, तुला उद्या डिस्चार्ज मिळाला की तू तुझ्या आईच्या घरी जा. असंही पहिलं बाळंतपण आईकडे असतं. नंतर मी तुला घेऊन जायला येतो.” संयोगिता च्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. तिने सरळच विचारलं,” सुबोध नक्की काय झालं आहे? आधी तुम्हीच सगळ्यांनी माझ्या आईला आम्ही करू बाळंतपण म्हणून सांगितलं ना? मग आता काय झालं? बाळ झाल्यावर आई बाबा बघायलाही आले नाहीयेत आणि आता तू मला परस्पर आईकडे पाठवतोयस. घरी सगळं ठीक आहे ना?” तो आधी हो हो म्हणाला आणि नंतर आपण खोलात जाऊन विचारलं तेव्हा ओरडुन म्हणाला, “ हे बघ, मला वाटतं यापुढे तू तिथेच रहा. ही नतद्रष्ट मुलगी मला माझ्या घरात नकोय. आम्हाला मुलगा हवा होता. सावंत घराण्याला वारस हवा होता. आणि तू तर ही जोखीम गळ्यात टाकलीस.” संयोगिता चक्रावलीच. सुबोध सारख्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या मुलाच्या तोंडी ही भाषा. असा भेदभाव यांना कुणी शिकवला. तिने लगेचच उलट प्रश्न विचारला, “ काय? जोखीम?? अरे पहिली बेटी धनाची पेटी असते. बघ आपलं सगळं छानच होईल.” त्यावरच्या त्याच्या बोलण्याने तर संयोगिता थक्कच झाली. “ए बाई, गप ग तू. मला शिकवायला तू अजून मोठी नाही झालीस. जोखीमच आहे ही. वयाने कळती आणि मोठी झाली की किती सांभाळत बसा, त्यांचे नखरे सांभाळा आणि लग्नाच्या वेळी बापाला लुटून न्या. नकोच ते. ही असली ब्याद नकोय मला माझ्या आयुष्यात. आणि तुला जर हिला सांभाळायचं असेल तर बस खुशाल हिला सांभाळत. आणि तसं जर असेल तर मी लवकरच घटस्फोटाचे कागदपत्र पाठवेन. तू गुमान सही कर. तू ही जुजबी कमावती आहेस त्यामुळे पैसे वगैरे मागण्याच्या भानगडीत पडू नकोस. आणि हे लोढणं बस सांभाळत. मला नकोय ही मुलगी..” असं म्हणून सगळं कसं पटकन सोडून आणि तोडून तो पुनश्च तोंड न दाखवण्यासाठी निघूनही गेला. आईने नंतर बरेच दिवस केलं आपलं. काही दिवस नुसते सुन्न मनःस्थितीत गेले. पण नंतर या नाजूक गोंडस लेकीसाठी आपण सहज सज्ज झालो. कुठून आलं आपल्याला हे बळ कोण जाणे. ते म्हणतात न देव चोच देतो तसा दाणा ही तोच देतो.. आई होणं एकवेळ सोपं असतं पण आईपण निभावणं केवढे महत्कठीण रे देवा!” असा विचार करत असतानाच मनू तिथे आली. संयोगिता ने विचारलं, “काय ग मनू, झोप येत नाही का? अगं आज तू छान झोप घे. मग उद्या पूर्ण दिवस माझी शबुडी कशी सुंदर आणि उत्साही दिसली पाहिजे. जा बघू झोप.” मनू ने मात्र अचानक संयोगिता ला प्रश्न विचारला, “कुणाचा विचार करत होतीस आई? आपल्याला सोडून गेलेल्या लोकांचा?” संयोगिता कोड्यात पडली, “म्हणजे ग?” तेव्हा मनू म्हणाली, “ आई, माझ्या वडिलांनी मी जोखीम आहे म्हणून मला नाकारलं हे जरी तू आजपर्यंत माझ्यापासुन लपवून ठेवलं असलं तरीही कालच मला हे आजोबांनी सांगितलं. ते ही मी आता तुला सोडून जात असले तरी तू किती कठीण प्रसंगातून धीराने उभी राहिलीस आणि तूच माझं सगळं केलं आहेस याची मी जाण ठेवावी म्हणून.” संयोगिता एकदम वादळ यावं आणि भयाण शांतता पसरावी तशी निःशब्द झाली. थोड्या वेळाने मात्र तिला रडूच फुटलं. त्यावर मनू आईला जवळ घेत म्हणाली, “आई, माझे बाबा या जगात नाहीत हे तू मला आजपर्यंत सांगत आलीस. केवळ माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग राहु नये म्हणून. हो ना? मला राग नाही आला ग. पण खूप वाईट वाटलं. की माझा बाप असा कोत्या विचारांचा होता.” त्यावर लगेच संयोगिता ने तिला हटकलं, “मनू, काहीही झालं तरी ते तुझे बाबा आहेत आणि त्या ही पेक्षा कुणाही मोठ्या वयाच्या माणसाबद्दल कसं बोलावं याचे चांगले संस्कारच मी केलेत तुझ्यावर हे विसरू नकोस.” त्यावर मनू चिडून म्हणाली, “आई हे त्यांना कळायला नको. त्यांच्यावर संस्कार झाले नव्हते का चांगले?” क्षणभर शांतता पसरली आणि मग मनूच म्हणाली, “आता मला कळलं मी प्रसुतीतज्ञ व्हावं म्हणून तू का मागे लागली होतीस! माझ्याकडून असंख्य बाळांना जन्म दिला जावा आणि त्यातही मुलींना जन्म मिळावा म्हणूनच ना? आज मी तुला एक वचन देते आई, की, मी शर्थीचे प्रयत्न करेन आणि स्त्री भ्रूण नक्की वाचवेन. आणि हो मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे की तिने त्यावेळी ही जोखीम स्वीकारली आणि माझे सगळे लाड व हट्ट पुरवले.” त्यावर संयोगिता डोळे पुसत म्हणाली, “ अग वेडे, जोखीम कसली? तू तर माझा श्वास आहेस. अजूनही मला पहिल्यांदा माझ्या हातात आलेली इवलिशी गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, थोडं मोठं झाल्यावर माझा पदर पकडून मागे मागे फिरणारी, डॉक्टरकीच्या प्रत्येक पेपरच्या वेळी हट्टाने माझ्याकडून रात्री कॉफी मागून घेणारी माझी शबुडीच आठवते. हे सगळं करण्यात कसली आली जोखीम. ह्या सगळ्यांनी माझं आईपण आणि मी दोन्ही समृद्ध झालं आहे. त्यामुळे हे विचार आता नको. आता फक्त भावी आयुष्याचे, नव्या नवलाईचे विचार करायचे. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे हे लक्षात ठेव. आणि देवाकडे एकच मागणं आहे आता की, थोड्या वर्षांनी ही माझी जोखीम तुझ्या गळ्यात पडायला नको ग बाई!” यावर “काय ग आई!” असं म्हणून दोघी मायलेकी गळ्यात पडून मनसोक्त रडल्या होत्या. आणि ते आठवून आत्ताही संयोगिता चे डोळे भरून आले होते.
थोड्या वेळाने “चला मुलीला आणा…लग्नघटिका समीप आली आहे…” असं गुरुजींनी म्हणताच मनू नवरीच्या वेशात तयार होऊन आली. संयोगिता ने डोळ्यांनीच तिची दृष्ट काढली. नंतर लग्नविधी सुरू झाले. आधीचे थोडे विधी झाल्यावर कन्यादानाची वेळ आली. संयोगिता ने आधीच तिच्या मामेभावाला सांगून ठेवलं होतं. ती उठणार तेवढ्यात मनू ने आईचा हात धरून इथेच बसून रहा अशी डोळ्यांनीच खूण केली. मनू ने गुरुजींना आणि जमलेल्या समस्त मंडळींना उद्देशून माईकवरूनच सांगितलं, “गुरुजी, आपल्याकडे कन्यादान मुलीचे वडील नसतील तर एकटी आई करू शकत नाही. पण हेच उलट असेल तर मात्र कनवटीला सुपारी लावून सगळं चालतं. पण मला माझ्यापुरती ही प्रथा बदलायची आहे. माझ्या आईने मला जन्म दिला आणि माझ्या आईनेच मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, सांभाळलं आणि एक सुजाण नागरिक बनवलं. मी माझं नावही लहानपणापासूनच कु. मनस्वी संयोगिता सावंत असंच लावत आले आहे. त्यामुळे माझी आईच माझं कन्यादान करेल.” त्यावर संयोगिता हळूच म्हणाली, “मनू अग हा कसला भलताच हट्ट. व्याही काय म्हणतील. लोक काय म्हणतील.” जराही वेळ न घेता मनू म्हणाली, “आई मी शार्दुल च्या आईबाबांशी बोलले आहे आणि त्यांना यात आनंदच आहे. आणि लोकांचं नको घेऊस तू मनावर. सगळे आपलेच आहेत. ज्यांना पटेल त्यांनी आनंद घ्यावा, ज्यांना नाही पटणार त्यांनी रामराम घ्यावा. पण हे असंच होणार. माझ्या आईच्या हातूनच कन्यादान होणार. चला गुरुजी चालू करा विधी.” सर्वांनी टाळ्या वाजवून या नव्या विचाराचं स्वागतच केलं. आता मात्र संयोगिताला सर्वांसमोर खूप अभिमान वाटत होता मनस्वीचा. आणि एक क्षणच तिच्या मनात विचार आला, अशा गुणी मुलीला जन्मतःच जोखीम समजून नाकारणारे खरंच कपाळकरंटेच…… तिने नकळतच कन्यादानाचं पुण्य मिळाल्याबद्दल देवाला सविनयतेने हात जोडले.
ll शुभं भवतु ll
✍? सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.
(कथा आवडल्यास नावासकट शेअर करावी ही विनंती. फोटो गुगलवरून साभार??)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..