कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे.
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. ह्या चौथ्या स्तंभाची महाराष्ट्रात सुरुवात झाली ती बाळशास्त्री जांभेकर यांच्याकडून 1832 साली त्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ हे सुरू केलं.
पण त्यानंतर लोकमान्यांच्या उदयापासून कोकणातील हे पत्रकारितेचं केंद्र पुण्याला स्थलांतरित झालं. ‘दर्पण’च्या अस्तानंतर तब्बल 40 वर्षांनी 1880 साली लोकमान्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ सुरू केली. ‘केसरी’ आणि ‘मराठा’च्या यशामुळे पत्रकारिता ही अनेक वर्ष पुण्याच्या आसपास फिरत राहिली. त्यातच आगरकर टिळकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्या ‘सुधारक’नं वेगळं स्थान निर्माण केलं. पाठोपाठ महात्मा फुलेंच्या ‘सत्यशोधक’नं असंच स्वत:चं स्थान दलित आणि त्याकाळी अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजात निर्माण केलं होतं.
पत्रकारिता कोकणात पुन्हा रुजण्यासाठी स्वातंत्र्यानंतर बराच काळ जावा लागला ही वस्तुस्थिती आहे. मुळात स्वातंत्र्यानंतर बराच काळ सरला तरी कोकण दुर्लक्षित राहिलं हे नाकारता येणार नाही. सेवानिवृत्तांचं शहर अशी ओळख जशी पुण्याला काही काळ मिळाली होती तशीच कोकणाकडे, निष्क्रियांचा प्रदेश, म्हणून बघण्याची समाजाची दृष्टी होती. त्यामुळे कोकणात फार काही घडत नव्हतं. परिणामी पत्रकारितेला पोषक वातावरण कोकणात नव्हतं.
अर्थात ह्याला अन्य अनेक बाबी जबाबदार होत्या. पत्रकारितेला आवश्यक असलेल्या दळणवळणाच्या सोयी कोकणात नव्हत्या. कोकणाची भौगोलिक रचनाही एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजासहजी जाण्यासारखी नव्हती, आजही नाही. कोकण हा प्रांत अनेक वर्ष औद्योगिकीकरणापासून वंचित राहिला आहे. कोकणातील तरुण हा नोकरी उद्योगासाठी कायम शहरात जात राहिल्यानं कोकणात अनेक काळ काही घडलंच नाही. आपण बरं की आपली शेती बरी, अशा विचारांनी इथला शेतकरी राहिल्यामुळे इथे पत्रकारितेला पोषक वातावरण निर्माण होऊ शकलं नाही.
अर्थात अशा परिस्थितीतही काही वृतापत्रांनी, साप्ताहिकांनी आणि नियतकालिकांनी पत्रकारिता धुगधुगती ठेवली हेही नाकारता येत नाही. एक काळ असा होता की रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग ह्या जिल्ह्यांचे वृत्तपत्र म्हणजे रायगड टाइम्स, रत्नागिरी टाइम्स आणि सिंधुदुर्ग टाइम्स अशी ह्या वृत्तपत्रांची ओळख होती; काही प्रमाणात आजही आहे. आजही कोणी नवीन पत्रकार ह्या क्षेत्रात आला तर गावातील लोकं, कुठे रत्नागिरी टाइम्सला का, असं विचारतात. किंवा कोणी बातमी दिल्यावर तो पत्रकार कुठल्या वृत्तपत्राचा आहे हे माहीत असूनही, रत्नागिरी टाइम्सला नाही का येणार बातमी, असं देणारा विचारतो.
असंच काहीसं स्थान निर्माण केलं होतं ते ‘सागर’ ह्या वृत्तपत्रानं. चिपळूणहून प्रसिद्ध होणारं हे वृत्तपत्र. मुंबई पुण्यासारख्या शहरात पाय रोवून नंतर कोकणात जिल्हा आवृत्ती सुरू करणाऱ्या वृत्तपत्रांच्या शर्यतीत स्वत:चं स्थान निर्माण केलेलं हे वृत्तपत्र.
पण सकाळ, लोकमत, तरुण भारत आणि पुढारी ह्या वृत्तपत्रांच्या आगमनानं स्थानिक वृत्तपत्रांचा श्वास कोंडून टाकला आणि हळूहळू ही वृत्तपत्रं मरणासन्न झाली. अर्थात त्याला आणखी एक कारण आहे. कोकणाबाहेरून आलेल्या ह्या सगळ्या वृत्तपत्रांच्या पाठीशी एखादा राजकारणी, एखादा उद्योजक आहे. त्यामुळे ह्या वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यांच्या पाठीशी भक्कम आर्थिक पाठबळ आहे. ती स्थिती कोकणातील स्थानिक वृत्तपत्रांची आणि नियतकालिकांची नाही. त्यामुळे आजच्या महागाईच्या काळात आर्थिक नियोजनात ह्या वृत्तपत्रांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून ठिकठिकाणी पत्रकारांच्या नियुक्त्या करणं, वृत्तपत्रांच्या छपाईसाठी चांगला कागद वापरणं, आजच्या तंत्रज्ञाच्या युगात ई आवृत्ती काढणं ह्यात ही वृत्तपत्रं मागे पडली आहेत.
कोकणात वृत्तपत्र व्यवसाय पाहिजे तेवढ्या प्रमाणात उदयास न येण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथला पत्रकार. इथला पत्रकार आजही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नाही ही वस्तुस्थिती आहे. दोन तीन दशकांपूर्वी तर स्थानिक छायाचित्रकार नाहीतर वृत्तपत्र विक्रेताच पत्रकार म्हणून काम करत असे. शहरात, गावात जे थोडेफार कार्यक्रम होत त्यात छायाचित्रकार हा अपरीहार्य असे. त्यामुळे त्याच्याकडूनच झालेल्या प्रसंगाचा वृतांत लिहून घेऊन त्याची बातमी करण्याचा प्रघात बरेच वर्ष चालू होता. बातमीचा दूसरा स्रोत म्हणजे वृत्तपत्र विक्रेता. त्याच्याकडे वृत्तपत्र विकत घेण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून लोक येत असत. त्यामुळे गावात काय घडलं हे त्याला बसल्या जागी काळात असे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांचे गठ्ठे विक्रीसाठी येत तेव्हा त्या वितरण विभागातील व्यक्तीकडे आदल्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचा वृतांत थोडक्यात लिहून देत असे. त्यावरून मग संपादकीय विभाग त्याची बातमी करत असे.
असा काही काळ गेल्यावर वृत्तपत्रांना स्वतंत्र पत्रकार असावेत याची गरज भासू लागली आणि त्यातून महत्त्वाच्या ठिकाणी पत्रकारांची नियुक्ती होऊ लागली. त्यातही अर्थात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. महत्त्वाची अडचण म्हणजे दळणवळणाची. एक दीड दशकांपूर्वी बातमी कार्यालयात पोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे एसटी हेच असे. पत्रकार बातम्या लिहून त्या लखोट्यात घालून एसटीच्या चालक वाहकाकडे देत असे. शहारातील कार्यालयातील माणूस तो लखोटा एसटी थांब्यावर जाऊन घेत असे. त्यानंतर त्या बातम्या कार्यालयात पोहोचून त्यांच्यावर पुढील संस्कार होत असत. ह्यात अर्थात अनेक अडचणी होत्याच. टपाल वेळेत नं मिळणं, कार्यालयातील व्यक्ती एसटी थांब्यावर वेळेत न पोचणं, परिणामी बातम्या कार्यालयात पोहोचत नसत.
हळूहळू काळ बदलला, मोबाइल आणि इंटरनेटनं जग व्यापलं. पण 21व्या शतकाचा एकचतुर्थांश काळ संपत आला, 5 जीचे वारे शहरात वाहू लागले, तरी कोकणात आजही मोबाइलला रेंज आणि इंटरनेटच्या उपलब्धतेच्या अनंत अडचणी आहेत. त्यामुळे पत्रकारांना मिळालेली बातमी कार्यालयात पोहोचवणं आजही अडचणीचं ठरत आहे.
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पत्रकारांचं आर्थिक गणित. वृत्तपत्रांच्या डेस्कवर काम करणाऱ्या कर्मचारी आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तफावत आहे. परिणामी पत्रकारिता हा मुख्य व्यवसाय न रहात त्याला जोड व्यवसायाचं स्वरूप आलं आहे. कार्यक्रमांना जाणं, तो कव्हर करणं असे प्रकार इथे अभावानंच पहायला मिळतात. तुटपुंज्या मानधनावर काम करणारे पत्रकार हे अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना जात नाहीत. परिणामी कार्यक्रमाचे आयोजकच झालेल्या कार्यक्रमाचा वृतांत पत्रकाराला लिहून देतो. अशा पत्रकारांवरच सध्याची पत्रकारिता बहुतांश विसंबून राहिली आहे. परिणामी बातमी लिहून देणाऱ्यांची भाषाशैली, त्यातील अतिरंजीतपणा, आयोजक हा पत्रकार नसल्यामुळे बातमीत काय आवश्यक आहे याची नसलेली पुरेशी जाण अशा कारणांमुळे बातमीचा मूळ गाभा हा अनेकदा हरवून जातो.
इथला पत्रकार हा प्रशिक्षित नसणं हा आणखी एक अडथळा आहे. केवळ अंगभूत कलेवर किंवा वर्षानुवर्षे करत असलेल्या कामाच्या जोरावर त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याचा काळ संपला आहे. ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्राचं रीतसर प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. पण आजही इथले बहुतांश पत्रकार हे प्रशिक्षित नाहीत. पत्रकारितेचे पदविका, पदवी अभ्यासक्रम आज अनेक विद्यापीठांकडून चालवले जात आहेत. त्यापैकी बहुतांश हे दूरस्थ पद्धतीनं आयोजित करण्यात येतात. त्यामुळे नोकरी उद्योग सांभाळून ते करणं शक्य आहे. काही संस्था पत्रकारितेची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करत असतात. पण अशा शिबिरांनाही पत्रकारांची उपस्थिती अत्यल्प असते. विद्यार्थी होऊन ज्ञान संपादन करणं याची गरज पत्रकारांना वाटेनाशी झाली आहे.
एकूणच काय तर कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल, तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे.
-–अमित पंडित
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply