नवीन लेखन...

कड्याच्या टोकावर पत्रकारिता

‘अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेला डॉ. विजय चोरमारे यांचा लेख


आजची मराठी पत्रकारिता चेहरा हरवलेली पत्रकारिता आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. एकूण भारतीय पत्रकारितेसंदर्भातही हे विधान लागू होईल. मराठी पत्रकारिता ही भारतीय पत्रकारितेचाच भाग असल्यामुळे तिची स्थिती वेगळी नाही. मराठी पत्रकारितेचा चेहरा हरवला आहे, असे म्हणतो तेव्हा पत्रकारितेची भूमिका नजरेसमोर असते. डिजिटल मीडियाचा देशपातळीवर आणि प्रादेशिक भाषांमधूनही मोठा विस्तार होतो आहे. त्यामध्ये सर्वच वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या वेबसाइट्स आहेत. मराठीत न्यूज पोर्टल्सची संख्या झपाट्याने वाढते आहे, परंतु ती स्थानिक पातळीवरची आहेत. स्थानिक पातळीवर प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची संख्याही लक्षणीय आहे. मराठीतल्या या सगळ्या प्रसारमाध्यमांचा विचार केला, तर प्रसारमाध्यमे प्रचारमाध्यमे झाली आहेत. देशात नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा काळ सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील माध्यमातून एकेका जातिवंत पत्रकाराला खड्यासारखे बाहेर काढण्यात आले. त्यांच्या नोकऱया हिसकावून घेण्यात आल्या. मराठीमध्ये तसे लोण आले नव्हते, परंतु येण्याची चिन्हे दिसत होती. संबंधित घटक तशा संधीच्या शोधात होते. आणि करोनाकाळाने तशी संधी उपलब्ध करून दिली. करोनामुळे राज्यभरातील हजाराहून अधिक पत्रकारांना नोक-या गमावाव्या लागल्या. त्यातही पुन्हा अनेक पुरोगामी पत्रकारांना लक्ष्य करून प्रवाहाबाहेर ढकलण्यात आले.

करोनाकाळ सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच महाराष्ट्र टाइम्सने आपली कोल्हापूर, अहमदनगर आणि जळगाव आवृत्ती बंद केली. त्याशिवाय टाइम्स समूहाने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. सकाळ माध्यम समूहाने सकाळ टाइम्स हे आपले इंग्रजी वृत्तपत्र बंद केले. त्याशिवाय समूहामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कपात केली. टाइम्स समूहाने मिरर हे वृत्तपत्र बंद केले. हिंदूने मुंबई आवृत्ती गुंडाळली. अशी भली मोठी यादी करता येईल. सगळ्याच मोठ्या समूहांनी पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचारी कपात केली. त्याशिवाय पगारातही कपात केली. मार्च 2020च्या चौथ्या आठवड्यात लॉक डाऊन सुरू झाला. याचा अर्थ मार्च 2020 या महिन्यापर्यंतचा व्यवसाय सगळ्यांनी नीटपणे केला होता. अडचणी आल्या त्या मार्चनंतरच्या काळात. तरीसुद्धा काही वृत्तसमूहांनी मार्च महिन्याच्या पगारापासून तीस टक्क्यांपासून पन्नास टक्क्यांपर्यंत पगार कपात केली. याविरुद्ध कुणीही आवाज उठवू शकले नाही, कारण नोकरी टिकली, हीच तुमच्यावर मेहेरबानी आहे असे वातावरण तयार करण्यात आले होते. पगार कपात होऊ दे, नोकरी तर टिकली असे समाधान मानण्यावाचून  पत्रकारांपुढे पर्याय उरला नाही. पत्रकार आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत सुमारे पाच ते दहा वर्षे मागे गेले. एकीकडे महागाई प्रचंड वाढत असताना पगार मात्र अनेक वर्षे मागे गेले.

मराठी पत्रकारितेचा चेहरा 

मराठी पत्रकारितेचा चेहरा हरवला आहे, असे म्हणतो तेव्हा आपल्यापुढे मराठी पत्रकारितेचा दैदिप्यमान इतिहास आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. तिथून मराठी पत्रकारितेचा प्रवास सुरू होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ‘केसरी’ने लोकांना स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे काम केले. त्याचवेळी समाजप्रबोधनाचे काम करणाऱया वृत्तपत्रांची संख्याही मोठी होती आणि मराठी पत्रकारितेमध्ये प्रबोधन पत्रकारितेचा प्रवाह सशक्त होता. त्याचमुळे स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांसमोर उद्दिष्ट काय, हा प्रश्न आला नाही. समाजाला रूढी, परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्याची भूमिका वृत्तपत्रांसमोर होती, त्यादृष्टीने वृत्तपत्रे ही विचारपत्रे बनली आणि त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.

सत्यशोधक पत्रकारिता 

मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात सत्यशोधक वृत्तपत्रांनी बजावलेली कामगिरी महत्त्वाची आहे. ब्राह्मणेतरांची स्वतंत्र पत्रे निघणे गरजेचे आहे, असे महात्मा जोतीराव फुले यांचे मत होते. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतर पत्रकारितेला चालना मिळाली. उच्चवर्णियांच्या हाती असलेली वृत्तपत्रे बहुजन समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, या भूमिकेतून कृष्णराव भालेकर (1850-1910) यांनी ‘दीनबंधू’ हे पत्र पुणे येथून एक जानेवारी 1877 रोजी सुरु केले. पुढे आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते चालवता आले नाही, त्यामुळे 1880 साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांच्या स्वाधीन केले. लोखंडे यांनी हे पत्र मुंबईहून बरीच वर्षे चालवले. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मृत्युनंतर (1897) त्याची परवड झाली व ते बंद पडले. ‘दीनबंधू’प्रमाणेच ‘दीनमित्र’ हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. मुकुंदराव पाटील यांच्या संपादन आणि लेखनामुळे हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वर्षे चालवले. मुळात 1888 मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात ‘दीनमित्र’ सुरु केले. 1892 मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले. त्यांचे दत्तकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी 23 नोव्हेंबर 1910 रोजी ते साप्ताहिक पुन्हा सुरु केले होते.

ब्राह्मणेतरांची वृत्तपत्रे अपरिहार्य अशा गरजेतून जन्माला आली. ब्राह्मणेतर पक्षांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करेपर्यंत त्यांनी धार्मिक व सामाजिक प्रश्नांना अग्रक्रम दिला. सनातनी, कर्मठ विचारांशी व ब्राह्मण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरस्कार करणाऱया पत्रांशी या पत्रांचा सतत संघर्ष घडत असे. उदा. ‘केसरी’ व ‘भाला’ यांसारख्या पत्रांनी ब्राह्मणेतर पत्रांशी संघर्ष केला. शेतकरी, कष्टकरी वर्गाचे शिक्षणाचे प्रश्न मांडले; परंतु कालांतराने या पत्रांतून ब्राह्मण्याविरोधाला प्राधान्य मिळू लागले. ही पत्रे बंद पडली तरी ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाची चळवळ सुरु राहिली. ब्राह्मणेतर पत्रांनी अस्पृश्यांच्या प्रश्नावर जेवढा भर द्यावयास हवा होता, तेवढा दिला नाही, ही त्यांची मर्यादाही लक्षात घ्यावी लागते. तरीही त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि बहुजनांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे ठरतेच. अस्पृश्यांच्या लढ्याला प्राधान्य वा पाठिंबा देण्याची भूमिका ब्राह्मणेतर पत्रांनी घेतली नाही, त्यातूनच दलित पत्रकारिता उदयास आली.

महात्मा फुल्यांच्या काळापासून किंवा 1857 च्या बंडानंतर राजकीय स्वातंत्र्य आणि त्यासाठीचे राजकारण हेच मुख्य प्रवाही बनले आणि माध्यमांनी तेच उचलून धरले. या राजकारणाविरोधात बहुजनांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण म्हणजे देशद्रोही आणि इंग्रज धार्जिणे असल्याचा दावा केला गेला. स्वतच्या वाट्याला आलेली उपेक्षा आणि अन्याय यांना वाचा फोडण्यासाठी बहुजनांची माध्यमे असावीत, यासाठी अनेक वर्तमानपत्रे महात्मा फुले यांच्यानंतर आली. पण व्यापक अर्थाने बहुजनवादाची मांडणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेली वर्तमानपत्रे भारतीय माध्यम इतिहासात महत्त्वाची ठरतात. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकाऱयांकडून करून घेतले. मात्र ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या दोन्ही पत्रांचे संपादन त्यांनी स्वत: केले. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खऱया अर्थाने आवाज दिला. स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि समाज सुधारणा करणे, असे त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन उद्देश होते. बाबासाहेबांची पत्रकारिता यापेक्षा वेगळी म्हणजे मानवमुक्तीचा वसा घेतलेली होती. वरवरची समाजसुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. माणसाला माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केला.

विज्ञाननिष्ठ भूमिकेचा अभाव 

जोतिराव फुल्यांचा काळ वेगळा होता. कृष्णराव भालेकरांचा काळ वेगळा होता. ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील, ‘हंटर’कार खंडेराव बागल, ‘विजयी मराठा’ कारश्रीपतराव शिंदे यांनी पत्रकारिता केली तो काळ वेगळा होता. ब्राह्मण समाजाकडून बहुजनांची होणारी लुबाडणूक हा त्या काळातला ऐरणीवरचा विषय होता. समाज अशिक्षित होता. आज काळ बदललेला असला तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही. शिक्षणाचा प्रसार झाला. साक्षरता वाढली. मात्र शिक्षणामुळे शहाणपणा येतोच असे नाही आणि तेच आपल्या अवती-भवती दिसते. जो उच्चशिक्षित समाज आहे, तो अधिक प्रमाणात अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडला आहे. गरीब आणि अशिक्षित समाज अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडला असल्याचे चित्र प्रसारमाध्यमे निर्माण करतात. त्यात तथ्य आहेच. परंतु त्याहीपलीकडे पाहिले तर उच्चभ्रू वर्ग मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडल्याचे दिसेल. आणि दिवसेंदिवस तो अधिकाधिक गुरफटत चाललाय. सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी गणपती दूध प्यायल्याची जी अफवा पसरवण्यात आली होती, त्यावेळी दुधाच्या वाट्या घेऊन गणपती मंदिरासमोर रांगेत उभे राहिलेल्यांमध्ये कुणीही गरीब नव्हते. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय होते. या घटनेलाही दोन तपे झाली. देशभर बुवा-बाबांचे प्रस्थ वाढले तो काळ अलीकडचा आहे. अनेक बुवा-बाबा अनैतिक व्यवहारांच्या आरोपांवरून तुरुंगात गेले आहेत. तरीसुद्धा भोंदू लोकांच्याकडे जाण्याकडे लोकांचा ओढा दिसून येतो. अशा भोंदू बुवा-बाबांविरोधात प्रसारमाध्यमे भूमिका घेत नाहीत, उलट प्रसंगपरत्वे त्यांच्या प्रसिद्धीचे काम करतात. आजच्या काळात प्रसारमाध्यमांनी म्हणजेच पत्रकारांनी अधिक विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनण्याची गरज आहे. परंतु एकूणच विज्ञाननिष्ठ भूमिकेचा अभाव मराठी पत्रकारितेमध्ये तीव्रतेने जाणवतो. उलट वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे दावे करणा-या उत्पादनांच्या पानपानभर जाहिराती छापल्या जातात. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.

राजकीय पक्षपाती 

मराठीतील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला तर, सगळ्यांकडून एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे बाजारकेंद्री! राजकीय भूमिकेचा विचार केला तरीही सगळा मामला गोलमाल आहे. एखादे वृत्तपत्र प्रस्थापितविरोधी भूमिका घेऊन उभे आहे, असे ठामपणे म्हणता येत नाही. काही प्रसंगांमध्ये सरकारविरोधी भूमिका घेतली जाते, परंतु त्यात सातत्य नसते. सरकारविरोधी भूमिकेचा देखावा करतानाही सरकारमध्ये काम करणाऱया व्यक्तिंसंदर्भातील भूमिका मात्र संशयास्पद असते. राजकीय बातम्यांच्याबाबतीतही निर्भेळणा गायब झाला आहे. राजकीय बातम्यांना हितसंबंधांचा वास येत असतो. अनेक राजकीय बातम्याही पेड न्यूजच असतात. त्यामुळे प्रत्यक्षात घडलेली राजकीय बातमी कुठली, पेरलेली बातमी कुठली आणि प्रचारतंत्राचा भाग म्हणून जाहिरात दराने पैसे भरून दिलेली बातमी कुठली हे समजत नाही. आपला समाज अजून तेवढा वृत्तपत्र साक्षर झालेला नाही, त्याची दिशाभूल करण्याचे पद्धतशीर प्रयत्न वृत्तपत्रे करीत असतात.

ग्रामीण पत्रकारिता 

खरा भारत खेड्यात आहे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. कारण भारत हा खेड्यांचा देश होता आणि वेगाने नागरीकरण होत असले तरी आजही खेड्यांचा देश आहे. भारतातील सत्तर टक्के लोक आजही खेड्यात राहतात. प्राचीन काळापासून भारतीय जीवनाचे खेडे हे प्रमुख केंद्र आहे. स्वातंत्र्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण होत सत्ता गावपातळीपर्यंत आली आणि गावाच्या विकासाचा अजेंडाही गावपातळीवर ग्रामसभांच्या माध्यमातून ठरू लागला. देशाच्या कारभारात अशा रीतीने खेड्यांचा प्रत्यक्ष सहभाग सुरू झाला. सत्तेचे केंद्र दिल्लीत असले तरी त्याची खरी ताकद गल्लीत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे म्हटले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्र हेही कृषिप्रधान राज्य आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या या राज्याची दोन तृतियांश लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताहेत. नागरीकरणामुळे खेडी बदलताहेत. तिथल्या माणसांची जीवनशैली बदलत आहे. या बदलांचे प्रतिबिंब प्रसारमाध्यमांमध्ये उमटते का ? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळत नाही.

बहुतेक वृत्तपत्रे प्रमुख शहरांमधून राजधानीच्या आणि विशेषत जिह्याच्या ठिकाणाहून प्रसिद्ध होतात. त्यांना बातम्या पुरवणारे जे स्त्राsत आहेत, त्यातला एक प्रमुख स्त्राsत म्हणजे ग्रामीण भागातील वार्ताहर किंवा बातमीदार. आधी जिल्हा वृत्तपत्रांचे तालुका किंवा महत्त्वाच्या गावांच्या ठिकाणी वार्ताहर होते, परंतु साखळी वृत्तपत्रांनी जिल्हा आवृत्त्या सुरू केल्यानंतर खपवाढीची स्पर्धा तीव्र बनली आणि त्यातून गावोगावी वार्ताहरांच्या नेमणुका होऊ लागल्या. प्रारंभी बातम्या देण्यापुरते असलेले हे वार्ताहर जाहिरात प्रतिनिधी म्हणूनही काम करू लागले, नंतरच्या काळात वृत्तपत्रांच्या गरजेमुळे जाहिरात हा त्यांचा प्राधान्यक्रम बनला. पूर्वीपासून त्यांना जाहिरातींचे टार्गेट दिले जात असे, परंतु कोविड काळानंतर त्याचे प्रमाण वाढले आहे. वार्ताहराचा परफॉर्मन्स त्याने दिलेल्या चांगल्या बातम्यांच्या आधारे नव्हे,तर जाहिरातींच्या प्रमाणावर मोजला जाऊ लागला आहे. जे जाहिराती गोळा करू शकत नाहीत त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळेही बातमीची चांगली दृष्टी असलेले अनेक वार्ताहर पत्रकारितेच्या प्रवाहाबाहेर गेले आहेत.

वृत्तपत्रांच्या बदलत्या प्राधान्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील बातम्यांची पाने कमी झाली आहेत. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या बातम्यांचे स्वरूपही खूप साचेबद्ध बनलेले दिसते. मंत्र्यांचे दौरे, पोलिस स्टेशनला नोंद झालेले गुन्हे, राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, नेत्यांच्या वाढदिवसांचे कार्यक्रम अशा ठराविक स्वरुपाच्या बातम्या दिसतात. शिवाय जाहिरातदार व्यक्ती-संस्थांच्या बातम्या असतात. शेतीमालाच्या दरासाठीची आंदोलने होतात, त्याला प्रसंगपरत्वे स्थान मिळते. जिह्याच्या किंवा राज्याच्या ठिकाणच्या निर्णय घेणाऱया सत्ताकेंद्रापर्यंत ग्रामीण भागाचे खरे प्रश्न त्यामुळे पोहोचतच नाहीत. शहरातील गटार तुंबले किंवा एक दिवस पाणी आले नाही तर मोठमोठ्याने बोंबाबोंब केली जाते. नागरिकांचे हाल झाल्याचे वृत्तांत छापले जातात. टँकरभोवती जमलेल्या गर्दीचे फोटो छापले जातात, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांचे पाण्यासाठी सतत हाल होतात, त्याचे प्रतिबिंब वृत्तपत्रांमधून कधीच दिसत नाही.  काही वृत्तपत्रांचे संपादक वार्ताहरांच्या मासिक किंवा त्रैमासिक बैठका घेऊन मार्गदर्शन करतात. अलीकडे या बैठकांमधून प्रामुख्याने जाहिरातींचे उत्पन्न कसे वाढवायचे, याचेच मार्गदर्शन होते. ज्या राजकीय नेत्यांच्या सहकारी, शिक्षण संस्था आहेत ते मोठे जाहिरातदार असतात. त्यांच्याच बातम्या प्राधान्याने पाठवण्यास सांगितले जाते. त्यामुळे वृत्तपत्रांमधून जे त्यातल्या त्यात समतोल राजकीय चित्र येत होते त्यावरही गंडांतर आले आहे. फक्त जाहिरातदारांच्या बातम्याच प्राधान्याने छापल्या जातात.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सगळीकडे लँड माफिया वाढले आहेत. जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात सुरू आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात एजंट नावाची नवी जमात तयार झाली आहे. शेतजमिनी कवडीमोल किंमतीने बळकावल्या जात आहे. पवनचक्की कंपन्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. स्थानिक पुढारी कंपन्यांना सामील होऊन जमिनी बळकावत आहेत. या कंपन्यांच्या दादागिरीमुळे खेड्या-पाड्यांतील स्वास्थ्य बिघडत चालले आहे. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु त्याची नोंद पत्रकारितेने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. उलट हे लँड माफिया हा नवश्रीमंत वर्ग आहे आणि तोच प्रामुख्याने जाहिरातदार आहे. त्यामुळे त्यांचे कारनामे प्रसिद्ध करण्याऐवजी त्यांचे गौरवीकरण केले जाते. जाहिरातीसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या पुरवण्या प्रसिद्ध केल्या जातात. नेत्यांच्या वाढदिवसाला त्यांच्याकडून मोठमोठ्या जाहिराती घेतल्या जातात. कोविडनंतरच्या काळात तर या वर्गाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम वृत्तपत्रांनी केलेले दिसते.

खरे तर लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने अहिंसकरितीने केले जाणारे उपोषण, आंदोलन व सत्याग्रह यांच्या बातम्या प्रकर्षाने मांडायला हव्यात. परंतु आजच्या पत्रकारितेमध्ये अहिंसक मार्गाने केली गेलेली आंदोलने, बातमीमूल्य हरवत चालले आहेत की काय असे वाटते. याउलट विध्वंस, मारझोड, तोडफोड, राडा, जाळपोळ, दंगे करणाऱया व्यक्ती व संघटनांना वारेमाप प्रसिध्दी मिळताना दिसते. लोकशाही व्यवस्थेवर आघात करणाऱया हिंसक आंदोलनाला वारेमाप प्रसिध्दी व शांततामय मार्गाने व अहिंसक रीतीने सत्याग्रह व आंदोलने करणाऱयांना प्रसिध्दीची उपेक्षा नशिबी येते, हा एकप्रकारे लोकशाहीवर आघात आहे आणि पत्रकारितेसाठी तो आत्मघातकी रस्ता आहे. लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाण्यास अशा बातम्या पूरक ठरतात व चुकीचे संदेश देतात हे लक्षात घेतले जात नाही.

पत्रकारिता बहुमुखी व्हावी

पत्रकारितेने आजच्या काळात अधिक बहुमुखी व्हायला पाहिजे. शोधपत्रकारिता केलीच पाहिजे, परंतु काळाच्या पातळीवर झालेले बदल विचारात घेऊन पुढची पावले टाकली पाहिजेत. आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव आणि प्रसार वाढला आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होतोय. वृत्तवाहिन्यांचा आवाज आणि गलबला अधिक आहे, त्यामुळे त्यांचा तत्कालिक प्रभावही जाणवतो. परंतु त्यांच्या मर्यादाही आहेत आणि त्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये समोर आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गोंगाटात मुद्रित माध्यमांचा आवाज क्षीण झाल्यासारखा वाटत असला तरी, आजच्या काळात खरी जबाबदारी आहे ती मुद्रित माध्यमांवरच.

न्या. मार्कंडेय काटजू प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी माध्यमांसंदर्भात एक निरीक्षण नोंदवले होते आणि त्यावेळी त्यासंदर्भात उलटसुलट चर्चाही झाली होती. न्या. काटजू म्हणाले होते, ‘भारतातील प्रसारमाध्यमांमधील बहुतांश पत्रकारांची बौद्धिक पात्रता खूपच निम्नस्तरावरील आहे. बहुतांश पत्रकार खूपच चाकोरीबद्ध आहेत, त्यामुळेच माझे त्यांच्याविषयीचे मत विपरीत आहे. स्पष्ट सांगायचे, तर या पत्रकारांना अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्रातील सिद्धांत किंवा साहित्य, तत्त्वज्ञान यांचे फारसे ज्ञान असेल, असे वाटत नाही. त्यांनी या विषयांचा अभ्यास केला असेल, असेही वाटत नाही. भारतीय माध्यमे जनतेच्या हिताविरोधातच भूमिका घेत असल्याचे दिसून येतात. सामान्यांच्या वास्तवातील समस्यांचे मूळ आर्थिक घडामोडींमध्ये आहे. देशातील  मोठ्या प्रमाणात जनता भयावह दारिद्र्यात आहे, महागाईची समस्या, आरोग्याचे प्रश्न, बेरोजगारी अशी आव्हाने आहेत. मात्र, प्रसारमाध्यमे जनतेचे लक्ष मूळ समस्यांवरून इतरत्र वळवताना दिसतात.’

काटजू यांच्या या म्हणण्यामध्ये त्यावेळीही काही चुकीचे नव्हते आणि आजही काही चुकीचे नाही. कोणत्याही विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास असलेल्या पत्रकारांची वानवा सगळीकडे दिसून येते. सगळेच येते म्हणजे नीटपणे काहीच जमत नाही, अशी सर्वसाधारण स्थिती आहे. तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र वगैरे लांबच्या गोष्टी आहेत. साहित्य-कला-संस्कृतीबाबतही घोर अडाणीपण दिसून येते. खरेतर  मराठी पत्रकारांचे साहित्यक्षेत्रात फार मोठे योगदान आहे. अनेक पत्रकारांनी साहित्यात दैदीप्यमान कामगिरी केलेली आहे. कथा, कादंबऱया, नाटक, काव्य, ललितलेखन अशा क्षेत्रात अनेक मराठी पत्रकारांची नावे प्रसिद्ध आहेत. ग. त्र्यं. माडखोलकर, न. चिं. केळकर, प्रबोधकार ठाकरे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, आचार्य प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण साधू, माधव गडकरी, विद्याधर गोखले, विजय कुवळेकर, उत्तम कांबळे, महावीर जोंधळे, भालचंद्र देशपांडे, जयंत पवार अशी मोठी नामावली देता येते. अलीकडच्या काळात साहित्य आणि पत्रकारितेचा हा धागा तुटत चालला आहे. पत्रकारिता आणि साहित्याचा संबंध तुटत चालल्यामुळे पत्रकारिता रुक्ष बनत चालली आहे. साहित्य-कला-संस्कृतीच्या संदर्भात अनेक महत्त्वाची विधाने होत असतात, खंडन-मंडनाचे राजकारण होत असते. परंतु वार्तांकन करणाऱया  वार्ताहरांना ते समजत नसल्यामुळे त्यातले काहीच छापून येत नाही. अशा कार्यक्रमांमध्ये ‘व्हिज्युअल’ मटेरिअल नसल्यामुळे वृत्तवाहिन्या त्यांची दखल घेत नाहीत. या क्षेत्रातून जाहिरातींचे उत्पन्न मिळत नसल्यामुळे मुळातच तेथील बातम्या छापण्याबाबत उदासीनताच दिसून येते.

एकूणच काळ बदलत आहे. जगभरात माध्यमांमध्ये तांत्रिक बदल झपाट्याने होताहेत. मराठीतही ते होताहेत. परंतु मराठी पत्रकारिता तांत्रिक बदल स्वीकारण्याबाबत काळाच्या बरोबर आहे. प्रसारमाध्यमांची मूळची भूमिका हरवली आहे, परिणामी पत्रकारितेतला आशय गायब झाला आहे. खप आणि उत्पन्नाचा आलेख चढता असल्याचे चित्र दोन वर्षांपूर्वीपर्यंत होते. परंतु कोविड काळात सगळेच चित्र बदलून गेले. वृत्तपत्रांमुळे करोना पसरतो, अशा प्रकारची एक बातमी प्रसारित झाल्यामुळे लोकांनी वृत्तपत्र घेणे बंद केले. शहरात अनेक सोसायट्यांनी वृत्तपत्रे बंद केली. त्याचा मोठा फटका वृत्तपत्रांना बसला. लॉक डाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे जाहिराती बंद झाल्याच होत्या. वितरण बंद, जाहिराती बंद अशा परिस्थितीत वृत्तपत्रे चालवणे कठीण बनले होते. हळुहळू परिस्थिती सुधारली आहे. परंतु आता सर्वसंबंधित घटकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आर्थिक गणिताची जुळवाजुळव हा आधीसुद्धा प्राधान्याचा विषय होता, परंतु तेव्हा पत्रकारितेबाबतही संवेदनशीलता होती. आता पत्रकारिता दुय्यम बनली आहे. आर्थिक उत्पन्न मिळवणे, वाढवणे आणि अस्तित्व टिकवणे एवढेच प्रसारमाध्यमांचे उद्दिष्ट आहे. स्वाभाविकपणे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे पत्रकार नकोसे झाले.

पत्रकारितेच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या अनेकांनी वेगेवेगळे मार्ग शोधले. मिळेल त्या क्षेत्रात मिळतील त्या पगारावर नोकऱया स्वीकारल्या. या काळात टिकून राहणे सगळ्यांसाठी महत्त्वाचे होते आणि आहे. बहुतेकांना पत्रकारितेच्या बाहेरचे काही येत नसल्यामुळे कुणी कुणी आपल्या ऐपतीनुसार इथेच जम बसवण्याचा प्रयत्न केला. न्यूज पोर्टल सुरू केली. स्थानिक पातळीवर जाहिराती मिळवून कसातरी तग धरून राहण्याचा प्रयत्न केला. हे करतानाच नव्या संधीचा शोधही सुरू ठेवला. अशा अनेक पत्रकारांच्यापुढे अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. अनेकजण मध्यमवयीन आहेत. गृहकर्जे काढली आहेत. त्यांचे हप्ते सुरू आहेत आणि नोकऱया गेल्या आहेत. त्यामुळेही परिस्थिती कठीण बनली आहे. एकूण पत्रकारांसमोर संकटांची मालिका आहे. वृत्तपत्रांसमोरही अस्तित्व टिकून राहण्याचे आव्हान आहे. सगळेच परिस्थिती सुधारण्याची वाट पाहात आहेत. परंतु प्रत्यक्षात पत्रकारिता कड्याच्या टोकावर उभी आहे. तिने आपला पत्रकारितेचा धर्म टिकवून ठेवला नाही, तरी तिचा दरीत कोसळून मृत्यू अटळ आहे आणि पत्रकारितेचा धर्म टिकवताना आर्थिक हितसंबंध जपले नाहीत तरीसुद्धा दरीत कोसळून मृत्यू अटळ आहे.

— डॉ. विजय चोरमारे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..