पूर्वीच्या काळी प्रवास म्हणजे केवळ कामापुरता केला जायचा. पायी अथवा बैलगाडीने एका जागेतून दुसऱ्या जागी जाणं एवढंच होतं. मजल दरमजल केलेल्या या प्रवासात एक वळकटी, तांब्या, घोंगडी आणि सोबतीला बहु उपयोगी असा सोटा. प्रवास फक्त दिवसा करायचा आणि संध्याकाळी एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळाबाहेर मुक्काम. तीर्थक्षेत्राला जाणं हा जीवनातला मोठा आणि किंबहुना शेवटचा आणि लांबचा प्रवास.
निखळ आनंद मिळवण्यासाठी सहल आणि प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी कुणी घराबाहेर पडत नसत. कालांतराने तंत्रज्ञान विकसित झाले, प्रवास करण्याची अनेक साधनं विकसित झाली आणि पर्यटनाला चालना मिळाली.
आज जगाच्या एक कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात रोज लाखोंच्या संख्येने पर्यटक विमानं, बोटी आणि इतर साधनांचा वापर करून जातात. आज घरबसल्या जगाच्या पाठीवर कुठे जायचं, कसं जायचं आणि काय बघायचं हे बघता येतं. माणसाची पर्यटनाची आवड आज काही अब्ज रुपयांची उलाढाल करणारा आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देणारा व्यवसाय बनला आहे.
कुठल्याही अडथळ्याशिवाय आणि निखळ आनंद देणारं पर्यटन हे तर सगळ्यांनाच हवंय. त्याचबरोबर असं पर्यटन खिशाला परवडणारं पण असलं पाहिजे.
पण हे साध्य करायचे तरी कसं? कुशल नियोजन ही याची पहिली पायरी. हा प्रवास कोण, कुठे आणि केव्हां करणार आहे हे आधी ठरवायला पाहिजे. एकट्याने करायचा म्हणजे सोलो ज्यामध्ये साहसी खेळ सुद्धा खेळता येतात. जोडीने करायच्या प्रवासात मधुचंद्राला निघालेल्या जोडप्यांचा देखील समावेश होतो. वयोवृद्ध फक्त तीर्थक्षेत्रांना भेटी देत नाहीत तर इतर ठिकाणीही जाण्यास उत्सुक असतात. समविचारी लोकांच्या गटाने प्रवास करायचा अनुभव आणि नियोजन वेगळे. या सर्व प्रकारच्या प्रवासाला लागणाऱ्या नियोजनाबद्दल विस्ताराने बघूया.
यासाठी पहिला पर्याय आहे, सहल आणि यात्रा आयोजन करणाऱ्या संस्था म्हणजेच ट्रॅव्हल एजंट. या संस्था वर उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या प्रवास इच्छुकांना मार्गदर्शन करून सहलीला नेतात. यांनी स्वतः वेगवेगळ्या स्थळी जाऊन अनुभव घेतलेला असतो. तिथल्या स्थानिक पातळीवरच्या लोकांशी संपर्क आणि व्यावसायिक बांधिलकी असते. त्याचबरोबर अशा संस्थांमध्ये टूर गाईड म्हणजेच मार्गदर्शक असतात जे आपल्या सोबत प्रवास करतात आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. यात राजकीय परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये योग्य ती उपाययोजना करणे आणि पर्यटकांना सुखरूप परत आणणे ही जबाबदारी या सहल आयोजित करणाऱ्या संस्थेवर असते. कुठे जायचे, कसं जायचं, काय बघायचं हे पूर्व नियोजित असत. त्यात जास्त बदल करता येत नाही. तसेच बहुतेक सहली या काही माणसांचा गट तयार करून नेलेल्या असल्याने वेळेचं बंधन काटेकोरपणे पाळायला लागतं.
दुसरा पर्याय सर्व प्रकारची माहिती गोळा करून स्वतः सर्व नोंदणी, आयोजन करणे. यात थोडा जोखमीचा भाग असतो. जर राजकीय परिस्थिती उद्भवली किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवली तर नवख्या ठिकाणी सर्व उपाययोजना स्वतः कराव्या लागतात. वृद्ध व लहान मुलं सोबत असणाऱ्यांना त्रास सहन करावा लागू शकतो आणि जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. पण यात वेळेचं बंधन कमी असतं आणि आपल्या सोयीनुसार रोज बदल करता येतो.
सहलीसाठी कुठे जायचे हे ठरवण्यासाठी, वैयक्तिक आवड, काही ठरवलेलं ध्येय, एखाद्या गोष्टीचा अभ्यास ही कारणं असू शकतात. या सोबतच ऋतू आणि हवामान याचाही विचार करावा लागतो. मग तो देशांतर्गत किंवा परदेशातील प्रवास असू दे. आपण ज्या ठिकाणी जाणार तिथलं हवामान आपल्याला मानवेल का? तापमान किती असेल? कपडे कुठले घ्यावे? याचा विचार करणं गरजेचं आहे. काही वेळेला वृत्तपत्रात खूप स्वस्तात सहलीची जाहिरात येते त्यावेळेला तो पर्यटनासाठी ऑफ सिझन असू शकतो. प्रतिकूल वातावरणात आपण जुळवून घेऊ शकलो नाही तर पैसे खर्च होऊन देखील आनंद मिळत नाही आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून कुठे आणि कधी जायचं या दोन प्रश्नांची उत्तरे एकमेकांशी निगडित आहेत.
या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी माहितीचे मायाजाल म्हणजे इंटरनेटचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. ज्यांना प्रवासाची आवड आहे आणि प्रवासात बरेवाईट अनुभव आले आहेत अशा लोकांनी स्वानुभवावरून काही वेबसाईट म्हणजे संकेतस्थळं विकसित केली आहेत. ज्यावर घरबसल्या सर्व माहिती फोटो आणि व्हिडियो सकट बघता येते.
यामधे ट्रिप ॲडवाईजर (www. Tripadvisor.com) हे एक बहुपयोगी आणि निःशुल्क असं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळांवर देश त्यातील शहर आणि त्यातील प्रेक्षणीय स्थळे, तिथं कसं जायचं काय बघायचं याची माहिती दिलेली आहे. ज्यांनी ही माहिती वापरून या ठिकाणी भेट दिली आहे त्यांनी आपला अनुभव फोटोसकट दिला आहे. आपला अनुभव सांगतानाच त्याला कमी अधिक गुण दिले आहेत. यात हल्ली विमानाची तिकिटे काढणे आणि हॉटेलच्या खोल्या राखून ठेवणे ह्या सोयीसुद्धा आहे. आज जगात रहाण्याची सोय आपल्या गरजेनुसार आणि खर्च करायच्या तयारीनुसार करता येते. पंचतारांकित हॉटेल ते साध्या खोल्या असलेल्या लॉजमध्ये आगाऊ खोल्या राखून ठेवण्याची सोय घरबसल्या होऊ शकते. त्यापेक्षाही वेगळा अनुभव हवा असल्यास आणि एखाद्या ठिकाणी जाऊन तिथल्या संस्कृती, खानपान याचा जवळून अनुभव घ्यायचा असल्यास होमस्टे सुद्धा उपलब्ध आहेत. यात नावाप्रमाणेच एखाद्या घरातली जास्तीची खोली एक किंवा दोन व्यक्तींना रहाण्यास उपलब्ध करून दिली जाते. या स्थानिक रहिवाश्यांबरोबर राहून तिथले पदार्थ चाखून, तिथली संस्कृती अधिक चांगल्या रीतीने कळते. (www. homestay.com आणि airbnb.com) आज जवळपास सर्वच जण क्रेडिट कार्ड वापरतात. कामानिमित्त आणि हवापालट म्हणून पर्यटन करतात. हे करत असतात जर क्रेडिट कार्डावर तिकिटे, हॉटेल आणि इतर खरेदी केली असता, क्रेडिट कार्डावर काही पॉईंट्स किंवा गुण मिळतात. तसेच वेगवेगळ्या विमान कंपन्या प्रवास केल्यावर काही गुण देतात. याचा योग्य वापर केला असता पुढच्या प्रवासात सवलत मिळते. बऱ्याच राज्यातील आणि देशातील पर्यटन विभाग पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक सवलतींचा वर्षाव करत असतो. याचा फायदा घेता येतो. यात वाचलेले पैसे आपल्या आवडत्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी करता येतो. अशा अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि योग्य वेळी तिकिटे खरेदी केली तर पर्यटन किफायतशीर, आनंद देणारं आणि सुखद आठवणी देणारं ठरू शकतं.
-अभय फाटक
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply