ज्या प्रश्नी मन कोंडून जाते
त्याला आधी स्मरावे
ज्याच्या त्याच्या घरी जाऊनी
गोडाने मन भरावे
उतरुनी त्याच्या अंतकरणी
तो जगूनी माणूस झाला
घळी राहुनी बोध घेऊनि
गुरू देखिला दास संतुष्ट झाला….
अर्थ–
ज्या प्रश्नी मन कोंडून जाते, त्याला आधी स्मरावे, ज्याच्या त्याच्या घरी जाऊनी, गोडाने मन भरावे
(मनात कोणा विषयी शंका असेल, कोणाबद्दल खात्री नसेल तर ते पहिले त्या व्यक्तीशी बोलावे, इतर कोणाशी बोलून अजून पिळ देऊ नये. पूर्वग्रह निर्माण होतो तरी त्याला संवादाची साथ दिली तर सगळं काही सुसंवादात बदलू शकते. मित्र आजकाल भेटत नाही, मेसेज वाचत नाही, मदत करत नाही किंवा अमुक व्यक्तीने मला फसवलं अशा प्रकारची वादळं सोशल मीडियावर उठवण्यात काही अर्थ नसतो, त्यापेक्षा त्या व्यक्तीला भेटून मनातलं बोललं तर शंका मिटतील आणि मागून बोलण्याचा ठपका ही लागणार नाही.)
उतरुनी त्याच्या अंतकरणी, तो जगूनी माणूस झाला, घळी राहुनी बोध घेऊनि, गुरू देखिला दास संतुष्ट झाला.
(एखाद्याला इतकं आपलंसं करावं की आपण त्याच्या बाबतीत चुकलो तरी त्याचा परिणाम हा वितुष्ट होण्यात बदलू नये. कोणाकडून काय घ्यावे याला योग्य नियोजन असायला पाहिजे. त्यासाठी आधी तुम्हाला काय हवंय हे लक्षात येणे जास्त महत्वाचे. नाहीतर कोणत्याही कार्यक्रमाला वेळ जात नाही म्हणून उगाच जाऊन बसणे याने काहीच साध्य होत नाही उलट आपण सगळीकडेच दिसतो पण त्यातून इतरांना आणि स्वतःला मिळत काहीच नाही. समर्थांनी घळीचा उपयोग हा योग्य रीतीने केला, त्यासाठी लागणारे नियोजन हे परिपक्व होत आणि म्हणूनच समर्थ दासबोध यासारखे विलक्षण आणि गरजेचे लिखाण त्या ठिकाणी होऊ शकले. आपल्याला काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे याचे नियोजन करणे आवश्यक असते आणि तसे झाले तर दास संतुष्ट होण्यात काही उणीव रहात नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply