“खामोशी “मधील “वो शाम कुछ अजीब ” आणि “अमर प्रेम” मधील “चिंगारी कोई भडके “! दोन्हींमध्ये खन्ना आहे ,किशोर आहे,वेळही जवळपास तीच-” मारवा ” वाली संध्याकाळ- उजेड राहील की काळोख पडेल या प्रश्नचिन्हातील!
नदीतील नाव आहे , कदाचित गांव आणि नदीही एकच असेल. (खात्री नाही ). एकीकडे शर्मिला तर दुसरी वहीदा – दोघीही “दग्ध ” !
आपापले भूतकाळ घेऊन या जोड्या (नावाला) एकत्र – पण अंतर्बाह्य विखुरलेल्या,नदीभर दुःखाच्या /विरहाच्या लाटा पसरविणाऱ्या.
नदी तिचं “वाहतं “दुःख कोणाला बरे सांगत असेल? रोज तिचं पाणी बदलतं, हेच तिचं उच्च दुःख असेल की आपण सगळे तिचं “डबकं “करायला टपून बसलोय हे?
नदी बोलत नाही, नदी गात नाही. पण तरीही तिचा प्रवाह आपल्या कानांच्या किनाऱ्यांवर आदळतो तेव्हा अशी उकललेली गाणी तयार होतात. गांवोगांवी नद्या असतील ही, पण ते किशोर/गुलज़ार आणायचे कोठून आणि कितीदा?
भूतकाळ हे असे फक्त “स्वतःचे “असतात -फक्त स्वतःचे ! आसपासच्यांना कधी ते दुरून दिसतात, कधी हलकेच स्पर्शून जातात , पण एखादा “रुहानी ” आवाज वाला किशोर त्यांना छेदून जातो , एखादा गुलज़ार त्यावरची खपली काढतो.
आणि प्रत्येकाच्या मालकीचे असे स्वतःचे भूतकाळ असतात, त्यावरचा धोंडा काढून आतील गुहेत शिरायचे नसते.
वाढत्या वयाबरोबर भूतकाळ वाढत जातो आपोआप! त्यासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. पंगतीमधील एकेक मंडळी वेळी-अवेळी ताट आवरून उठून जात असतात.आणि मागे उरतात वहिदा,गुलज़ार आणि शर्मिला.
केशवसुत म्हणतात तसे – ” आमुचा प्याला दुःखाचा ! डोळे मिटून प्यायचा !! ”
आपला भूतकाळ शेवटी आपण आपल्या बरोबर न्यायचा असतो.
तो मागे राहिला तर ——- ?
बाकीच्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त .
त्यापेक्षा आपण इतरांसाठी भूतकाळ होऊन जाणे जास्त सोपे !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply