ज्याच्या आत माझाच चा कहर
त्याच्या वागण्याला अर्थ नसतो फार
त्यांचे विचार जरी असती सुविचार
अहंकार वसती!!
अर्थ–
एका थोर पुरुषाने 2 तास कीर्तन केले, अगदी जीव तोडून कीर्तन केले. समोरचे रसिकभक्त अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. त्यांच्या प्रत्येक टाळीवर माना डोलवत होते. झालं, कीर्तन पार पडलं आणि नंतर रसिक त्यांच्या पाया पडायला येऊ लागले. त्यातल्या एका रसिक वृद्धाने त्यांना विचारले की आपण मगाशी कीर्तन करताना एका ओवीचा उच्चार केलात ती ओवी आपण कुठे वाचलीत? त्यावर ते बुवा हात जोडत म्हणाले की ती मी स्वतः लिहिलेली आहे.मला अशा ओव्या रचायची लहान पणापासून आवड आहे. त्यावर ते वृद्ध हसले आणि त्यांनी आपल्या खिशातून एक पुस्तक काढले आणि त्यातली ती ओवी त्या बुवांना दाखवली. त्यावर ते बुवा प्रचंड चिडले आणि त्यांनी तेथून तणतणत काढता पाय घेतला.
हे जग माझ्यामुळेच आहे, माझ्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे असे जेव्हा एखाद्या मनुष्याला जाणवू लागते त्यांनी लगेच अहंकारावर औषध घ्यायला सुरुवात करायला हवी. कीर्ती मिळवणे आणि अहंकाराने त्याचा डंका पिटणे यात प्रचंड फरक आहे. एखाद्याने काही चांगले कार्य केले, किंवा लिखाण केले तर त्यावर कौतुकाचे दोन शब्द नाही देता आले तरी चालतील पण त्याच्या कार्याला कमी लेखून आम्ही हे बालवयातच करायचो असे म्हणून त्याच्या नजरेत तरी स्वतःचे स्थान घालवू नका.
अहंकार नसण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्य उभे केले, त्यात कित्येक किल्ल्यांची नव्याने निर्मिती केली. पण त्यावरच्या एकाही दगडावर किंवा भिंतीवर स्वतःचे नाव लिहिले नाही. तसेच त्यांच्या कोणत्याही साथीदाराला कमी लेखले नाही. पण कलयुगातला माणूस मात्र माझे नाव जिथेतीथे कसे येईल यातच अडकलेला असतो. अशाने एखाद्याचे विचार जरी चांगले असले, कार्य जरी उत्तम असले तरी अहंकाराची भिंत त्या कर्तुत्वाला फुशारकी या गढूळ पाण्याच्या डोहात बुडवून मारते.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply