ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचा जन्म १९३० सालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण या गावी झाला.
कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या काळाचे साक्षीदार असणार्याक राजा मयेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात पाचशेहून अधिक कलाकृतींमध्ये काम केले होते.
राजा मयेकरांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण या गावातच झाले. त्यांचे वडील तानाजी मयेकर मुंबईत ‘युनियन मिल’मध्ये कर्मचारी होते. राजा यांची शिक्षणाची ओढ बघून पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना मुंबईमध्ये आणले. काही दिवसातच त्यांची आई इतर चार भावंडांना घेऊन मुंबईत आली. हे सर्व डि-लाईल रोडच्या हरहरवाला चाळीत भाड्याच्या खोलीत राहायचे. करी रोडच्या म्युनिसिपाल्टीच्या मराठी शाळेत मयेकरांचे नाव घातले गेले. याच ठिकाणी त्यांना लोकनाट्याचा सूर गवसला.
राजा मयेकरांचे कलागुण लक्षात घेता त्यांचे वर्गशिक्षक त्यांना शालेय वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यास आग्रह करत. त्याकाळी वेशभूषा, अभिनय यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार्यास स्पर्धकांच्या वाजतगाजत मिरवणुकी निघत. त्यामुळे या मिरवणुका बघण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. त्या गर्दीत हरहरवाला चाळीचे रहिवासीही असायचे. त्यांनी राजा यांना स्पर्धकांच्या गर्दीत पाहिले होते. त्यामुळे राजा मयेकर चांगला अभिनय करतात, हे चाळीतील सांस्कृतिक मंडळाच्या सभासदांच्या लक्षात आले. त्यांनी मयेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बसवलेल्या बालनाट्यांतून कामे दिली.
मयेकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी खऱ्या अर्थाने रंगभूमीवर पाऊल टाकले ते कृष्णराव गणपत साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळेच. मुंबईत ते राहत असलेल्या चाळीत शाहीर साबळे यांचे येणे-जाणे असत. चाळीतील बहुतांश लोकांची भाषा ही पश्चिम महाराष्ट्रातील होती. त्यात मयेकर यांचं मराठी अस्खलित आणि शुद्ध, शाहीर साबळे यांना राजा यांची भाषा आवडे. मयेकर यांनी एका मुलाखतीत सांगताना उल्लेख केला होता की, “माझं अस्खलित मराठी ऐकून शाहीर साबळेही चाट पडायचे. ‘कोकण्याचं पोर कसं बामनावानी बोलतंय बघा’ असं अभिमानाने बोलायचे.” यामुळेच साबळे यांनी कृष्णकांत दळवी व राजा मयेकर यांना सोबत घेत ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली. या माध्यमातून मयेकर यांनी केलेल्या लोकनाट्यातील भूमिकांमधून त्यांना एक कलाकार म्हणून खरी ओळख मिळाली. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना ते शाहीर साबळे यांचा उल्लेख आवर्जून करत असत. सहाव्या इयत्तेनंतर मयेकरांना शिक्षण आणि हरहरवाला चाळीतले घर सोडावे लागले. त्यावेळी त्यांच्या वडिलांची तब्येत खूपच खालावली होती. त्यानंतर राजा आपल्या आई-वडील आणि भावंडे यांच्यासह डिलाईल रोडवरच्या वाण्याच्या चाळीतील भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. घरचे भाडे भरता यावे कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून ते डिलाईल रोडलाच पेपरची लाईन टाकू लागले. एका फोटोग्राफरच्या दुकानात नोकरीदेखील केली. रात्री लोकनाट्यातून कामे करू लागले. आपले शिक्षण थांबलेय, ही खंत त्यांनी स्वत:ला कामात गुंतूवून कमी केली. लोकांचे प्रश्न मांडण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या लोकनाट्यातून केले. जिद्दीने गावागावात जाऊन कार्यक्रम केले तरीही त्यांना लोकप्रियता मिळवायला तब्बल १५ वर्षे संघर्ष करावा लागला.
राजा मयेकर यांनी काम केलेले ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’,‘असूनी खास घरचा मालक’, ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’, ‘श्यामची आई’, ‘धांदलीत धांदल’, ‘भावबंध’, ‘बंबदशाही’, ‘झुंझारराव’ ही त्यांची गाजलेली नाटके. लोकनाट्य करता करता मयेकरांची पाऊले व्यावसायिक रंगभूमीकडे वळाली. १९७२च्या सुमारास त्यांनी ‘राजा मयेकर आणि पार्टी’ची स्थापना केली. ते सांगत, माझं हजरजबाबी बोलणं आणि संवादाभिनयाची आगळीवेगळी शैली यामुळे मला ‘लोकनाटयाचा राजा’ असा शिक्का माझ्यावर लागला. पण मला ते मान्य नव्हतं. शेवटी सच्च्या, संवेदनाक्षम अभिनेत्याला, कलावंताला आपल्या क्षमतेपेक्षा कमी लेखलेले अथवा एखाद्या ‘इमेज’मध्ये जखडणे योग्य. म्हणून मी ‘राजा मयेकर आणि पार्टी’ची स्थापना केली. नंदकुमार रावते दिग्दर्शित ’गुंतता हृदय हे’ या नाटकासाठी मयेकरांना ‘सोमजी मास्तर’च्या या भूमिकेसाठी ‘चिंतामणराव कोल्हटकर’ पुरस्कार मिळाला होता. पाठोपाठ ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘दशावतारी राजा’, ‘धांदलीत धांदल’, ‘चाकरमानी’, ‘वस्त्रहरण’ अशा कितीतरी नाटकांतून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नाटक समीक्षण मयेकरांविषयी म्हणत, रंगमंचावर राजा मयेकरांचा सर्वांगसुंदर अभिनय पाहताना आम्हाला प्रश्न पडतो की, या कलावंतांच्या अंगात हाडं आहेत की नाहीत? शरीराच्या लवचिकतेचा वापर भूमिकेचा आयाम वाढवण्यासाठी करणारा हा अभिनेता श्रेष्ठ आहे.
दरम्यान, त्यावेळचे दूरदर्शनचे डायरेक्टर ल. गो. भागवत त्यांच्या उपस्थितीत मुंबई दूरदर्शनचे उद्घाटन झाले. श्रीलंकेच्या बंदरनायके या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्यासमोर‘रूपनगरची मोहना’चा प्रयोग सादर झाला. यात मयेकरांनी वठवलेली भूमिका बंदरनायकेंना आवडली. त्यांनी मयेकरांचे भरभरून कौतुक केले व मयेकरांचे दूरदर्शनमध्ये संधी मिळाली. त्यांचे ‘हास परिहास’, ‘गजरा’, ‘गप्पागोष्टी’ या मालिकांमधून मयेकर घराघरांमध्ये पोहोचले. लता मंगेशकरांना मयेकरांचे अभिनय, आवाज, मुक्तनाट्यातील हजरजबाबी अभिनय हे सर्व गुण आवडायचे. या सर्व गुणांवर खूश होऊन त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या ‘नायकिणीचा सज्जा’ या चित्रपटात मयेकरांना भूमिकालो मिळवून दिली. यातून मयेकरांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यांनी लालबागमध्ये ‘कलाकार स्टुडिओ’ नावाचा फोटो स्टुडिओ सुरू केला.
१९५० ते ६० या काळात मराठी आणि हिंदीत भरपूर आशयघन चित्रपट आले. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर यांच्यासारखे गुणी कलावंत चित्रपटसृष्टीने दिले. त्यावेळेला आकाशवाणीचे प्रस्थ होते. आकाशवाणीवर काम करणे हे प्रतिष्ठेचे समजले जायचे. घरोघरी दूरदर्शन सुरू झाल्यावर मालिकांचा जमाना आला. पण मयेकर सांगत, “मी मात्र जास्त रमलो ते केवळ रंगभूमीवर.” मयेकर यांनी आपल्या ९० वर्षांच्या आयुष्यात लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपटसृष्टी या सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विनोदाची पातळी कधीही घसरू न देता त्यांनी केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते.
राजा मयेकर यांचे १५ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले.
राजा मयेकर यांच्या कलाकृती.
लोकनाट्य : यमराज्यात एक रात्र, आंधळ दळतय, रूपनगरची मोहना, हळू बोला घोड हसलं, एक्याची वाडी, कोयना स्वयंवर, नशीब फुटके साधुन घ्या, बापाचा बाप, ग्यानबाची मेख.
नाटक : गुंतता हृदय हे, आई, धांदलीत धांदल, एकच प्याला, संशयकल्लोळ, बेबंदशाही, श्यामची आई, झुंजारराव.
चित्रपट : धाकटी बहीण, स्वयंवर झाले सीतेचे, अर्धांगी, नवरे गाढव असतात, वहिनी, येडे का खुळे, धमाल गोष्ट नाम्याची, भालू, झंझावात, कळत नकळत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply