मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात !
त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे विद्यार्थी होते. माझे वडील सुहास भोळे ह्यांची शिकवणी घ्यायला स्वरवंदनामध्ये जायचे. त्या अनेक आठवणी ज्योत्स्नाबाई ह्यांच्या मनात शेवटपर्यंत जाग्या होत्या. गप्पांच्या ओघात, त्या मला सगळ्या आठवणी सांगायच्या. मुलाच्या शिकवणीच्या वेळी, घरात, गाणं, नाटक, ह्याविषयी कसलीही चर्चा चालायची नाही, तंबोरा, पेटी ह्याचे आवाजही नसायचे. त्यां नेहेमी म्हणायच्या, “उपेंद्र, तुझे वडील, चिंचोरे गुरुजी पक्के हाडाचे शिक्षक होते, त्याकाळी आमचे कुलवधू नाटक खूप जोरात होते, खूप दौरे व्हायचे. पुण्यातल्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही गुरुजींना आमंत्रण द्यायचो, पण ते म्हणायचे, “अहो, मी शिक्षक आहे, शिकवणे एवढेच माझे काम आहे, नाटकाला कसा येऊ?” हं, एकदा मात्र, नगरला आमचा प्रयोग होता, तेव्हां चिंचोरे गुरुजी, त्यांचे गावी नगरमध्ये होते, त्यादिवशी मात्र, गुरुजी प्रयोगाला आवर्जून आले, इतकंच काय, प्रयोग संपल्यावर, विंगेत येऊन चिंचोरे गुरुजींनी आमचं कौतुकही केलं” !
मी त्यांना एकदा म्हणालो, “अहो, आपले चिरंजीव सुहास, स्कॉलरशिप परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, आपण माझ्या वडिलांना चांदीच्या भांड्यातून पेढे दिले होते, ते चांदीचे भांडे आजही आमच्या घरी उपयोगात येते, विशेष म्हणजे दरवर्षी गुढी उभारतांना काठीवर आपण दिलेले ते चांदीचे भांडे ठेवले जाते आणि त्याभोवती रेशमी वस्त्र नेसवले जाते”! मी सांगितलेली ती आठवण ऐकून ज्योत्स्नाबाई पुन्हा जुन्या आठवणीत शिरल्या !
ज्योत्स्नाबाई ह्यांचे जावई ब्रिगेडियर विजय खांडेकर हे सुद्धा माझ्या वडिलांचे विद्यार्थी, मला त्यांचाही सहवास मिळाला होता, हे माझे अहोभाग्य !
मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार ज्योत्स्नाबाई ह्यांना जाहीर झाला, त्यादिवशीही आमची गप्पांची मैफल त्यांचे घरी वरच्या मजल्यावरजमली होती !
आज अकरा मे, वंदनीय ज्योत्स्नाबाईंची आज जयंती आहे, त्यांचे पवित्र स्मरण कायम मनात आहे, “बोला अमृत बोला” गाणं म्हणणाऱ्या ज्योत्स्नाबाई नेहेमीच अमृतमय बोलायच्या,
— उपेंद्र चिंचोरे
Leave a Reply