अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये विश्वंभर दास यांनी लिहिलेला हा लेख
‘वीस वर्षानंतर तुम्ही नाराज व्हाल अशासाठी की ज्या गोष्टी तुम्ही करू शकलात त्यापेक्षा तुम्ही काही गोष्टी करू शकला नाहीत यामुळे’ या उक्तीने मी माझे विचार मांडणार आहे.
जगात असं कुणीही नसेल की त्याला आयुष्यात काहीतरी मिळवावयाचे स्वप्न नसेल अगदी रस्त्यावरील भिकारी याचे देखील काही तरी स्वप्न असेलच. सध्याच्या परिस्थितीहून दिव्य भव्य असंच प्रत्येकाचं स्वप्न असतं व्यापारी वर्गाचं देखील परंतु जीवनात आपण ठरविलेल्या स्वप्नापेक्षा शेवटी दुसरंच काहीतरी हाती लागतं, अर्थात याची आपल्याला कल्पनादेखील नसते. प्रसिद्ध ख्रिस्तोफर कोलंबस नाही का निघाला होता भारतात पोहोचण्यासाठी जवळचा रस्ता शोधण्यासाठी परंतु पोहोचला मात्र अमेरिकेला.
माझे वडील आमच्या जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध हुषार व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांची इच्छा होती की, मी त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून एक उच्चशिक्षित उभरताहुवा व्यापारी व्हावे. साहजिकच माझ्या भविष्याबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा व त्यांच्या कामाचा सपाटा बघितल्यावर मला देखील वाटू लागले की आपण शिक्षित यशस्वी बिझनेसमन व्हावे परंतु नशिबात काही वेगळेच लिहिले होते. मी एस.एस.सी. परीक्षेत उत्तम गुण मिळवून पास झालो. जिल्ह्यातच नव्हे तर आमच्या विभागात मला त्यामुळे प्रसिद्धी मिळाली. माझ्या शिक्षकांच्या उत्तेजनामुळे व काही शुभेच्छुकांच्या आग्रहामुळे मी त्यावेळच्या हैद्राबादच्या उत्कृष्ठ अशा निझाम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व शेवटी बी. ई. (इलेक्ट्रानिक्स अँड कम्युनिकेशन) ही पदवी हैद्राबादच्या प्रसिद्ध उस्मानिया इंजिनियरिंग कॉलेजमधून मिळवली. त्यामुळे मला मुंबईला चांगली नोकरी देखील मिळाली.
आता तुम्ही मला सांगा की, मी यात माझ्या वडिलांना दुखावले नाही काय? ते नंतर काही काळाने असाध्य अशा आजाराने मृत्युमुखी पडलेत. माझा स्वाभिमान, माझ्या आत्म्याचा आवाज हे मी उत्तम व्यावसायिक होण्याच्या मार्गावरील धोंडेच नव्हते कां ठरलेत? परंतु आता विचार करू लागल्यावर मात्र पटू लागतं की मला मी वडीलांची इच्छा पूर्ण करता आली नाही व हे शल्य बोचत आहे.
माझे दुसरे स्वप्न अथवा महत्त्वाकांक्षा ही पहिल्या स्वप्नाहून जरा वेगळीच होती. माझ्या गावातील लोक त्यावेळी म्हणत असत की, आमच्या घरात लक्ष्मी व सरस्वतीचा वास आहे. कारण माझे वडील, आई व विधवा व मावशी हे केवळ उत्तम भजनेच म्हणत नसत तर सणासुदीला उत्तम लोकगीते देखील गात असत. शेवटी या वातावरणाचा व वंशपरत्वे असलेल्या उपजत गुणांचा परिपाक म्हणजे मला बालपणापासूनच गायनाची आवड निर्माण झाली. मी आमच्या गावात, शाळेत, कॉलेजमध्ये, होस्टेलमधील कार्यक्रमांमध्ये गाऊ लागलो, नाटकात भाग घेऊ लागलो. या जीवनप्रवाहात आपल्याला गायक व्हावयाचे आहे, किंवा नाटकातून कामे करावयाची हे ध्येय मला ठरविणे कठीण होते.
अखेरीस नशीब माझ्या मार्गात आडवे आले व नोकरीतील व्यस्तता, सांसारिक जबाबदाऱ्या यामुळे गायन व नाटकात कामे करण्याचे स्वप्न मागे पडले. नोकरीतून निवृत्त होईपर्यंत हे शक्य झाले नाही, परंतु निवृत्तीनंतरच्या १० वर्षात एका जिवलग मित्राला मदत करण्यात गेलीत. परंतु त्यामुळे तो केवळ गरीबीतून बाहेर पडला नाही तर त्याचा एक मुलगा इंजिनियर तर दुसरा एम.बी.ए. होऊ शकला.
मित्रहो, मी आता वयाची पंच्याहत्तरी गाठत आहे. गेल्या ४/५ वर्षापासून मी माझी गायनाची हौस भागवीत आहे. माझ्या अविरत प्रयत्नांमुळे मला आता हुरूप आला आहे. व माझा उत्साह देखील वाढला आहे. तो काही बक्षिसे व मानसन्मान प्राप्त झाल्यामुळे माझे अधुरे स्वप्न आता पूर्ण होऊ लागले आहे. मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रोटरी क्लब, इनरव्हील सर्कल क्लब, लायन्स क्लब, व्हेटरियन सिटीझन्स फोरम यासारख्या मान्यवर संस्थांकडून मानसन्मान मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही याला ध्येयपुर्ती म्हणू शकाल काय? परंतु या वयाच्या या अवस्थेत देखील धडपडतोय जीवनातील ही पोकळी कशी भरून काढावयाची या विचारांनी.
अर्थात नाटकात काम करण्याची गोष्ट मात्र मागे पडली आहे. कारण त्यासाठी प्रकृती स्वास्थ व आवश्यक असलेला सळसळता उत्साह आता कुठून आणायचा? त्याशिवाय एका थिएटरमधून दुसऱ्यात जाण्याची, एका ऑडिटोरियम मधून दुसरीकडे जाण्याची, एका नाटकवाल्याकडून दुसऱ्याकडे हिंमत नको काय?
गेल्या ३०/४० वर्षात नाटकात काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीच करता आले नाही ही अश्वत्थामी जखम मात्र सारखी ठसठसते आहे. परंतु मित्रहो, परिस्थितीच तशी होती! शेवटी एक छोटे वाक्य सांगतो, ‘जे आवश्यक आहे ते करा, त्यानंतर जे शक्य असेल ते करा आणि त्यानंतर अशक्य ते करा.’
-विश्वंभर दास
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply