काळ बोले कळ काढुनी
कळकळ तेवढी रहावी बाकी
तळमळ सोडुनी कार्य करावे
भरून जावी टाकी!!
अर्थ–
“माझी अवस्था काय आहे काय सांगू जगाला… मन, जीवन सगळे काही दुःखाने भरून गेले आहे. माझ्यावर जी वेळ आल्ये ना ती कोणावरही येऊ नये.” हे असे बोलणाऱ्या व्यक्तींना हे असेच बोलायचे असते म्हणून ते होत रहाते. हेच जीवनात सुखद काही घडले तर ते आपण जास्त काळ घेऊन पुढे जातो का?
एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो.
दुःख किती बाळगावे यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मी आनंदी कसा राहू शकतो हे ताडले तर कित्येक दुःख ही केवळ धुक्या सारखी असतात हे लक्षात येईल. यातूनच बाहेर पडण्यासाठी केवळ प्रारब्धास दूषण न लावता कार्य वाढवावे, कामात झोकून द्यावे, ज्यांच्या बरोबर राहून आनंद मिळतो अशा व्यक्तींच्या सोबत रहावे आणि अशा एखाद्या व्यक्तिमुळे दुःख झालं असेल तर स्वतः बरोबर रहावे.
हळहळ होणे स्वाभाविक असते, शेवटी मनुष्य काही भगवंत नाही, पण त्यात होरपळून जाणे हा गुण माणसाला निसर्गाने दिलेला नाही. तेव्हा हळहळ- तळमळ करून घेण्यापेक्षा पुढे चालत राहिले, कार्य करीत गेले की आनंदाचं रिकामं झालेलं टाकं पुन्हा भरायला वेळ लागणार नाही. शेवटी छत्रपती होण्यासाठी कित्येक वर्षे वाट पहावी लागली, पण नुसती वाटच पाहिली असती तर तो आनंद मिळाला नसता, त्याला जोड होती अपार कष्टांची अन कित्येक दुःखांना दिलेल्या आहुतींची.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply