खूप छान पाऊस पडत होता. आज कॉलेजमध्ये अभ्यासाची इच्छा कोणाचीच नव्हती. मुले वर्गात बसली होती खरी परंतु वाट पहात होती की कधी प्रोफेसर येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करण्याची परवानगी देतात.
प्रोफेसर आले खरे. ते ही गाणे गुणगुणतच. मुलांनी एकमेकांकडे पाहिले. प्रोफेसरच्या हातात पांढऱ्या कागदांचा गठ्ठा होता. त्यांनी हे कागद कशासाठी आणले असतील असा विचार मुले करत होती. प्रोफेसर सर्वांकडे पाहून प्रसन्न हसले. बाहेरच्या पावसाकडे पाहून आणखीन खुलले. त्यांनी मुलांना सांगितले “आज अभ्यास नको. आज आपण एक खेळ खेळूया.” एवढे बोलून त्यांनी प्रत्येक मुलाला एक कागद दिला.
मुलांनी पाहिले, प्रत्येक कागदावर शाईच्या एका काळ्या ठिपक्याशिवाय काहीच नव्हते. सगळे कागद मुलांना वाटून झाल्यावर प्रोफेसर म्हणाले “आता सर्वांनी या कागदावर तुम्हाला काय दिसते आहे ते थोडक्यात लिहायचे आहे.” मुलांनी पुन्हा निरखून पाहिले. प्रत्येकाच्या कागदावर फक्त एक काळा ठिपका होता.
सर्व मुलांनी विचार करुन आपले निरिक्षण आपापल्या कागदावर नोंदविले. सगळ्यांचे कागद गोळा करुन प्रोफेसरने एक एक कागद वाचायला सुरुवात केली. सगळ्याच मुलांनी काळ्या ठिपक्या विषयी लिहिले होते. कोणी त्याचा रंग, कागदावरची त्याची पोझिशन वगैरे लिहिले होते. कोणी त्याचा डायमिटर लिहिला होता. याला एकही विद्यार्थी अपवाद नव्हता.
सगळे कागद वाचून झाल्यावर प्रोफेसरने मुलांकडे पाहिले. ते म्हणाले “या कागदांवरुन आज मी तुमचे ग्रेडिंग करणार नाही. मात्र मी तुमचे लक्ष गोष्टीकडे वेधणार आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाने आपापल्या निरिक्षणात काळ्या ठिपक्याविषयी लिहिले आहे. वास्तविक तो ठिपका चिमुकला आहे. त्याच्या भोवतीचा शुभ्र कागद मात्र खूप मोठा आहे. मला आश्चर्य वाटते की तुमच्यापैकी एकानेही त्या कागदाविषयी का लिहिले नाही !
आयुष्य असेच असते. आपल्या सुंदर आयुष्यात असे काळे ठिपके असतात. कोणाला तब्येतीचा त्रास असतो तर कोणाला आर्थिक चणचण असते. कोणाची मुले चांगली निघत नाहीत तर कोणाचे आई वडील मुलांना योग्य मार्गदर्शन करत नाहीत. थोडक्यात काय, तर आपल्यापैकी प्रत्येकाला अशा काळ्या ठिपक्यांचा सामना आयुष्यभर करावा लागतो. आपण मात्र केवळ आणि केवळ त्या काळ्या ठिपक्यांचा विचार करत रहातो. पांढऱ्या कागदाकडे म्हणजेच आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे आपण मनापासून कधीच पहात नाही. केवळ काळ्या ठिपक्यांचे दुःख करत बसतो.
वास्तविक जीवन सुंदर आहे. त्यात बरेच काही करण्यासारखे आहे. ही सौंदर्य स्थळे आपल्याला शोधता आली पाहिजेत. काळ्या ठिपक्यांकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे. योग्य वेळी त्यांचाही समाचार घेता आला पाहिजे. हेच मी तुम्हाला आज सांगू इच्छित होतो. मला खात्री आहे की तुम्ही सगळे आज एक वेगळा विचार घेऊन येथून जाल. आपापल्या आयुष्याचा पुन्हा एकदा नव्याने विचार कराल. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातली आनंदाची, सुखाची स्थळे सापडायला लागतील असा माझा विश्वास आहे.”
पावसाचा ओला दिवस भेकड न जाऊ देता प्रोफेसरने एक वेगळी दृष्टी मुलांना दिली. मुलांनाही जाणवले की आपण प्रत्येक गोष्टीकडे बघताना सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे. काळ्या ठिपक्यांची मिजास चालू दिली नाही पाहिजे, जीवनातला आनंद शोधला पाहिजे.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply