पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना हातगाडीवर टाईपांचे खिळे जुळविलेल्या गॅली प्रिंटींग प्रेसवर घेऊन जाणारे हातगाडीवाले हमखास दिसायचे. त्यावेळी कंपोज एकीकडे तर प्रिंटींग दुसरीकडे होत असे. त्यावेळची मासिकं, पाक्षिकं, वर्तमानपत्रं इत्यादी सर्व कामं टाईपांचे खिळे जुळवून केली जायची. शिसे धातूचे टाईप तयार करणाऱ्या टाईप फाऊंड्री देखील खूप होत्या.
पुरुषांबरोबर कंपोझिटर स्त्रियाही, ठराविक साच्यामध्ये मजकूर कंपोज करायच्या. त्याचं मग प्रुफ काढून शुद्धलेखन पहायलं जायचं. त्या दुरुस्त्या झाल्यावर जाॅब प्रिंटींगला जात असे. ही फारच किचकट अशी पद्धती होती.
पुण्यातील सदानंद प्रकाशनकडे कथाचित्रांची कामं करताना त्यांचं कपोझिटर युनिट मी पाहिलेलं आहे. तिथं मासिकं व दिवाळी अंकांची काम होताना सर्व पायऱ्यांचं मी निरीक्षण केलं.
कालांतराने ऑफसेट प्रिंटींग सुरु झालं. मजकुराच्या ब्रोमाईडच्या पट्या काढून लेआऊट केला जाऊ लागला. त्यांच्या निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करुन प्लेट केली जायची. ती प्लेट मशिनवर चढवून सुबक छपाई होऊ लागली.
१९८४ साली मी ‘दै. महाराष्ट्र’ वर्तमानपत्राचं काम करीत असताना टाईपसेटींगच्या ब्रोमाईड पट्यांचे रबर सोल्युशनने पेस्टींग करुन पानांचे लेआऊट मी केलेले आहेत. नंतर त्याच्या निगेटिव्ह पाॅझिटिव्ह होऊन प्लेट्स केल्या जात असत. हे प्रिंटींग पुणे विद्यार्थी गृहातील प्रेसवर होत असे.
काही वर्षांनी तंत्रज्ञानात अजून प्रगती झाली व काॅम्प्युटरवरुन डायरेक्ट प्लेट होऊ लागली. दिवसभराचं काम तासाभरात होऊ लागलं. सुरुवातीला कलर प्रिंटींगची मशीन्स ही टू कलरची असायची. नंतर फोर कलर मशिनरी आल्यावर प्रिंटींग अचूक व कमी वेळात होऊ लागलं.
पूर्वी रंगीत छपाईसाठी दिल्ली, मुंबईलाच नामवंत प्रेस होते. काहीजण चांगल्या छपाईसाठी सिंगापूरला जाऊन जाॅब छापत होते. हळूहळू भारतातील प्रत्येक राज्यात आधुनिक प्रिंटींगची मशीन्स आली आणि क्वाॅलिटीचं काम सहज होऊ लागलं.
तंत्रज्ञान वाढत गेलं. शहरात अनेकांनी प्रिंटींग प्रेस सुरु केले. स्पर्धा वाढली. पुण्यात ‘मुद्रा’ हा भानुविलास टाॅकीजसमोरचा व सदाशिव पेठेतील विनायक आर्ट्स या प्रेसवर चांगलं काम करुन घेण्यासाठी नंबर लागू लागले.
काहींनी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये प्रिंटींग प्रेस सुरु केले. गुलटेकडी, धायरी, कोथरूड, येरवडा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात छपाईची कामं होऊ लागली.
आमच्याकडे येणाऱ्या कामांमध्ये कुणाला प्रिंटींग करुन द्यायचं असेल तर पेपरगल्लीतले प्रिंटींग प्रेस ठरलेले होते. सुरुवातीला ट्रेडल मशीनवर देखील कामं करुन घेतली आहेत.
एकदा बण्डा जोशी यांचं ब्रोशर पेपर गल्लीतल्या रामदास नावाच्या प्रिंटरला छापायला दिलं. त्यानं मॅजेंटा रंगासाठी ब्लॅकच्या सेपरेशनची प्लेट वापरली, त्यामुळे साहजिकच संपूर्ण जाॅब जांभळ्या रंगाचा झाला. नशीब, त्याने चूक मान्य केली व पूर्ण जाॅब पुन्हा छापून दिला.
एका ब्रोशरचे कामाचेवेळी अतिशहाण्या प्रिंटरने मशीनला जे पाणी सोडले जाते, ते अधिक प्रमाणात सोडले. साहजिकच आर्ट पेपरचा मशीनमधून बाहेर आल्यावर ओलसरपणामुळे पापड झाला. त्याने स्वतः केलेली चूक मान्य केली नाही. त्या जाॅबला तिथेच सोडून मी तो दुसरीकडून छापून घेतला.
एका मुखपृष्ठाच्या प्रिंटींगचा जाॅब कामाच्या गर्दीमुळे रात्री दहा वाजता मशीनवर चढवला गेला. प्रुफ व कलरस्कीम पहाण्यासाठी मी ताटकळत उभा होतो. प्रुफ पाहिलं आणि मला घाम फुटला..कलरस्कीम परफेक्ट होती. मात्र मुखपृष्ठाच्या शीर्षकामध्ये व्याकरणाची मोठी चूक झालेली होती. मी प्रेसच्या मालकाला विनंती केली व जाॅब उतरवायला लावला. सकाळी प्लेटमेकरकडे जाऊन दुरुस्ती केली व नवीन प्लेट्स पाठवून ती छपाई पूर्ण केली.
एका ब्रोशरचे काम करताना प्रेसवाल्याच्या विनंतीवरून ज्याचा जाॅब होता, त्याच्याकडून अॅडव्हान्स मागितला. तो मिळायला उशीर झाल्यामुळे मधल्या मधे माझी पंचाईत झाली. शिवाय मला बोलणी देखील खावी लागली.
कसबा पेठेत एक मोठा प्रिंटींग प्रेस आहे. त्यांच्याकडे डिझाईन दिल्यावर पुढची सर्व प्रोसेस, म्हणजे पेपर, प्रिंटींग, लॅमिनेशन, इत्यादी. तिथे केली जाते. त्यांच्याकडील एका कामासाठी त्यांनी कमी जीएसएमचा पेपर वापरल्यामुळे मालकाशी वाद झाला. तेव्हापासून पेपर आपणच द्यायचा, ही मी खूणगाठ बांधली.
प्रशांत भारतालच्या मध्यस्थीने प्रतिमा प्रेसचे मालक, ठोंबरे यांची ओळख झाली. त्यांचा प्रेस आहे, कोथरुडला. तो लांब असला तरी त्यांच्याकडे एकदा काम सोपविल्यवर, कधीही काळजी करावी लागली नाही. अनेक प्रकाशनाची त्यांनी दर्जेदार कामं करुन दिलेली आहेत. मशीनवर जाॅब लावण्याआधी त्यांचा मला फोन येत असे. अशा तळमळीनं काम करणारी माणसं आता दुर्मिळ झाली आहेत.
आनंद लाटकर हे मला माहीत होते, मात्र प्रत्यक्ष कामासाठी मी त्यांना खूप उशीरा भेटलो.. त्यांच्याकडून पुस्तकांची कामं करुन घेताना त्यांनी मला मित्रत्वाच्या नात्यानं सहकार्य केलं!!
आता स्पर्धेमुळे प्रिंटींगप्रेसवाल्यांना कामाशिवाय बसून रहावे लागते. पूर्वी सारखी मासिकं, दिवाळी अंक आता राहिलेली नाहीत. अठरा तास चालणाऱ्या मशीनला आठ तासांचे देखील काम मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या वर्षी व आताही लाॅकडाऊनमध्ये प्रिंटींग प्रेस, प्लेट मेकींग, डीटीपीवाले, बाईंडर, फोल्डर्स सर्व बंद आहेत.
काल शनिवार असल्याने दक्षिणमुखी मारुतीला जाताना अप्पा बळवंत चौकातील डिएसकेच्या बिल्डींगकडे पाहिलं तर त्या फाटकावर भलं मोठं कुलूप दिसलं. ज्या बिल्डींगमध्ये ओळीने छपाईची कामं चालू असतात, सदैव प्रिंटींगच्या शाईचा घमघमाट सुटलेला असतो, कुठे स्क्रिन प्रिंटींग तर कुठे मग प्रिंटींग चालू असतं. कुठं बाईंडिंग तर कुठे फोल्डिंग चालू असतं. काही ठिकाणी परफोरेशन मशीन चालू असतात तर काही ठिकाणी पेपरचे गठ्ठे कटींग मशीनवर कट होत असतात. तेथील शंभरेक दुकानातून सकाळपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम चालू असतं. त्या पाचशेहून अधिक माणसांची रोजीरोटी त्यावरच चालू असते.
या लाॅकडाऊनमुळे आता या ठिकाणी चिटपाखरूही दिसत नाही. ही सगळी माणसं घरात बसून आता कंटाळली असतील. कोरोना जाईलच, पण यांना कामावर आल्यावर काम असेल का?… शक्यता कमीच.. त्यासाठी त्यांना वाट पहावी लागेल… काही महिन्यांनंतर हळूहळू तिथं मशीनचा खडखडाट ऐकायला मिळेल, शाईचा सर्वत्र घमघमाट सुटेल. तोपर्यंत तूर्तास फक्त वाट पहाणेच, आपल्या हातात आहे.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
६-६-२१.
Leave a Reply