कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका
“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.
वाढत्या जागतिकरणामुळे परदेशी व्यक्तींशी दळणवळण, संपर्क, सहवास वाढत चालला आहे. ज्या देशात आपण जाणार आहोत तेथील रीतीरिवाज, खाण्यापिण्याचे शिष्टाचार याबद्दल जाणून घ्यावे. परदेशात आपण बेशिस्तीने, अजागळपणे वागलो, तर केवळ व्यक्ती म्हणून आपल्यावरच ठपका येत नाही तर आपली संस्था आपला देश यांचीही बदनामी होते.
आय.बी.एम. या सुपसिद्ध अमेरिकन कंपनीत काम करण्यासाठी चेन्नईतले काही अभियंते जानेवारी महिन्यात अमेरिकेत गेले. जानेवारी महिना हा कडाक्याच्या थंडीचा हे माहीत असूनसुद्धा अंगातल्या केवळ एका पातळ शर्टनिशी तिथे पोचले. तेव्हा विमानतळावर उतरताच तिथल्या व्यवस्थापकाच्या सेक्रेटरीला आधी सर्वांना बाजारात घेऊन जाऊन गरम कपड्यांची तजवीज करावी लागली. गोष्ट १९७८५ सालची, या सेक्रेटरीने मला २०११ साली कालच घडल्यासारखी सांगितली, ती ही धन्य त्या अभियंत्याची अशा सुरात! आपल्या लोकांविषयी प्रथमदर्शनीच असे मत बनावे हे खासच भूषणावह नाही.
आपल्याला इंग्रजी बोलताना नकळत हिंदी शब्द मिसळून (बस्?, अरे, यार, मतलब इ.इ.) बोलण्याची सवय असते. परदेशी लोकांशी बोलताना ते कटाक्षाने टाळावे. तसेच त्यांच्याशी सावकाश व स्पष्ट बोलावे. त्यांनाही तसे बोलायची विनंती केल्यास त्यांचे बोलणे सहज समजू शकते. आपले बोलणे दुसर्याला समजू देण्याची जबाबदारी आपली स्वत:ची असते.
आजकाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात एकाच वेळी निरनिराळ्या देशातील लोकांशी संवाद साधावा लागतो अशा वेळी त्यांच्या देशाती वेळेप्रमाणे त्यांना शुभेच्छा देऊन संभाषणाची सुरवात करावी. अशा मिटींग्जसाठी लागणारी पूर्वतयारी व आधी कबूल केलेले काम पूर्ण केलेले असावे.
आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्यांना चांगल्या बोलण्या वागण्याचे पशिक्षण देणे गरजेचे आहे.
— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०
Leave a Reply