नवीन लेखन...

कारखाना

पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्‍या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्‍यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्‍ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती.

रस्ता मात्र झोपलेल्या अजगरासारखा गच्च होता. येणारा-जाणाराची वर्दळ कमीच होती.गावाकडून बगीररोडानं येणारी मोटरसायकल दिसत होती.धुरळा उधळीत येत होती.पँटशर्टातली एकच व्यक्ती गाडीवर होती.मसुबाला वळण घेत ती गाडी नजरेच्या आवाक्यात येत होती.रस्त्यावरच्या बुचाडाजवळ ती थांबली.गाडी स्टँडवर लावून ती व्यक्ती हातात काहीतरी घेऊन येताना वस्तीवरच्या लोकांनी पाहयलं.

“आमचे सर आल्येत..आमचे सर आल्येत”  – सदाची पोर्गी वरडत गेली तव्हा कळल.
वस्तीवरची लोक जमा व्हायला लागली.गावाचे मास्तर आल्येत म्हटल्यावर वस्ती जागी झाली.
“या गुरूजी या .” धोतराचा पदर सावरीतच पांडबा पुढं झाला.दोनचार पडल्याले चिपाड उचलून बाजूला करत होता.

”ये पोरी सतरंजी आण. तिकडं लपती कशाला.आज शाळात गेली न्हाय म्हणून आलं दिसतय गुरूजी. त्यान्लाबी लई दट्टया असत्यूय वरून.’ पांडबा अंदाज बांधत होता.भीताडाला उभी केलेली बाज आडवी केली.गुरूजी जवळ येत होते.तसे पांडबाची गरबड वाढली होती.तोपर्यंत पोरीन सतरंजी आणून दिली.पांडबान झटकली.बाजावर आणून टाकली.गुरूजीकडे इशारा “बसा गुरूजी बसा.’लई दिसा येण केल वस्तीला.ये पोरी बघतीस काय.पाणी आण की तांब्याभरून.आन्‌ ऐक , तुझ्या मायीला म्हणाव.च्या टाक कप-दोन कप ”- पांडबा समजावत होता.गुरूजीनी कागद काढले .पेन घेतला अन लिहू लागले पांढर्‍याफट्ट कागदावर सूर्यप्रकाश पडत होता.पांडबाचे डोळे दिपत होते.मिचमिच्या डोळयाने पांडबा गुरूजीकडं पाहू लागला.तसे गुरूजी त्याला म्हणाले.

‘तुमचं पुर्ण नाव”
”पांडू नारायण जाधव”
”वय”
”चाळीस-पंचेचाळीस करा”
गुरूजींनी जात न विचारताच तशीच लिहली
”का हो गुरूजी कशाला पाहिजी हे सारं?”
”ते सर्वेंक्षण असतय शासनाच.आपलं लिहून न्याव लागतय.आम्हाला.”
‘व्हय का ? असुद्या , असुद्या.’
‘ किती माण्सयत घरात सगळी. लहान मोठी ?’
‘लहानी चार आन्‌ मोठी तीन.’आम्ही दोघं नवरा-बायको आन म्हातारी एक.सात करा.’
‘जमीन कितीय ?’
‘आता कशाचीय जमीन ?’  -पांडबा हतबल झाल्यासारखा झाला होता.
‘म्हणजे ?’
‘ ती पलीकडं तरटीच्या डव्हाकडं सतरा गुंठे होती ती आन्‌ ही तेवीस गुंठे ..’पांडबाने वाक्य मधीच तोडलं.
”एक एक्कर म्हणा की”
”आता कशाची एक एक्कर
मग ?”

”काल दिले ना कागद करून.’
‘म्हणजे ! ‘ गुरूजी कुतूहलाने विचारत होते.
‘ सगळया वस्तीचा ठराव झाला.त्या सनगराला कारखाना काढायचाय.’
‘कसला ?’

‘साखर कारखाना काढायचाय म्हणतूय.सहकारी. आम्हाला पाच हजार रूपये एकरानी  पैसे दिले. परत खुटागणिक एकजण नवकरीला घितूय म्हणाला.त्याच्या लईमोठया शाळायेत. दूधाच्या डेर्‍यायत.पेट्रोलचे पंप का फंप काय म्हणतेत त्येय.एकेक पोर्ग चिटाकल तरी बास झालं ना.काय ह्या शेतात ? त्येबी बरडाच . कुसाळबी नीट यायनात. बाजरी कमी आन्‌ कुर्डू वाढलाय नामी अशी गत.ठेवूनतरी काय व्हायचयं. आमच्या त्‌ पाचवीलाच उसतोड आलीय पोरांचतरी कल्याण व्हईल.”

”मंग आता मजूरी करू का ?’- गुरूजी स्वत:च्या गालाला हात लावत बोलेले.

‘आम्ही येव मजूर आन त्येव मजूर.पोरांना आरक्षण नाही.शिक्षण नाही.नोकर्‍या नाहीत.जे पुढं गेले त्ये मागच्याला विचारीत न्हायीत.मरणादारी का तोरणादारी अशी आमची अवस्था.म्हणून सगळयानी चकाट सगळया रजिस्टर्‍या दिल्या काल.मोकळे खट्ट झाले.”

‘न्हाय म्हणजे मला काय यातल करायचय पण सहज विचारतो.कारखान्याच्या नावावर दिल्या का वैयक्तीक मालकाच्या?

“वैयक्तीक दिल्या काही.काही त्याच्या बायकांपोरांच्या नावावर आन काही जणांच्या कारखान्याच्या नावावर…”

‘तुमची ?’
”आमची काय , आमची दिली त्याच्या बायकोच्या नावावर”
”व्हय का ”

“का काही धोका व्हयील का काय? दोन तीनशे एकर जमीन दिलीय लोकांनी एवढे लोक हैत ना. परत मोठमोठे नेते-पुढारी येणारेत उद्घाटनाला.ती काय कालच बोर्ड लागलाय.तिथं पलीकडं त्ये रचलय ना तिथं. मंत्र्याच्या हातानी भूमीपुजन व्हणारेय.”

“बss रं ! म्हण्जी आता ऊसतोडीला जाण्यापेक्षा कारखान्याचा मालकच झालात म्हणायच तुम्ही.काय नाव म्हणालात कारखान्याचं?”
“काहीतरी कर्परा का काय दिलय जणू .”
“इथ नदीच्या नावावर ठेवलयं म्हण.आपून कहयाला हया भानगडीत पडायच.आमचा त्यो भावकीतला पोर्‍या.पमा. जरा शिकला सवरल्याला.हिंडतू फिरतू इकड तिकडं त्योच पुढं व्हवून करतोय सम्दं.”
” पाच हजार एकरानी म्हंजी जरा कमीच भाव झाला न्हाय काय ?”

“हाय कमीच जरा.पण पोर्ग नवकरीला लागलं.त्यालाबी भरावा लागले आस्ते त्ये वाचले ना.”
“पुढचंबी पाव्हा लागल ना काहीतरी.म्हातारपणाला व्हणारेय का हयो कुटाळ धंदा.तुम्ही कसं पोर्‍ह शिकविता रोजाचा पैका घट्ट . परत आठवडयाला सुट्टी. दिवाळीत सुट्टी.उन्हाळयात सुट्टी.”

गुरूजींनी रंग ओळखला अन्‌ चर्चा आटोपती घेण्याचा प्रयत्न केला.पांडबा फूल मोसममधी होता. काल खरेदीच्या टायमाला च्याऊ-म्याऊ झाल होत. पुरता भारीला होता.त्यामुळं त्याच्या डोक्यातली हवा काही केल्या उतरत नव्हती. वेळ वाढतोय हे पाहून  पांडबान तशी हाक दिली.

” आरं ऊक्काळलाका न्हायी चहा. लवकर आटपा की !” “गुरूजी आता जेवूनच जावा.” – बाजावर टेकत गुरूजीला बोलला

“न्हायी अजुन बर्‍याच घरांना भेटी द्यायच्यात.सर्व्हे लवकर सादर करायचाय.सुमन आली नाही तुमची शाळेत दोन तीन दिवसापासून शाळेत.” थोडा वेळ थांबून गुरूजीनी विषय काढलाच.

‘हयोच राडा होता ना दोन तीन दिवस.कुणी आता येईल उद्यापासून.’

कधी नव्हे एवढया पांढर्‍याफट्ट रंगाच्या गाडया वस्तीला धुळ उधळीत येवून गेल्या होत्या.पांढर्‍या फट्ट कपडयाची पांढरी माणसं कावळ्यासारखे इकडून तिकडं वस्त्यांवर हिंडताना दिसली होती.वातावरण तसं बनवल होतं.गावातले गावपुढारी हाताखाली धरले होते.त्यांना झेड्.पी.,पंचायत समिती,बाजार समित्या,नाहीतर सरपंच सोसायटयाचं गाजर दाखविलं होते.त्ये खूष होते.रात्री -अपरात्री बोलून घेतले होते.काही विरोध करणारे मॅनेज केले होते.रोटी , बोटी अन्‌ नोटाच्या बळावर हे घडत होतं.साखर कारखान्याच काम उद्याच सुरू होतय अस प्रत्येकालाच वाटलं. स्वप्नही पडत होते.वाहनांची वर्दळ वाढणार होती.छोटे-मोठे उद्योग वाढणार होते.सगळे लोक खुशीत दिसत होते.टीका करणारावर गुरकून माघारी बोलत होते. बाया-बापडया , पोर्‍ह – सोर्‍ह सगळयांचा एकच विषय होता. कर्परा सहकारी साखर कारखान्याचा .गुरूजींनी चहा घेतला. पांडबानंबी चहाचे घोट घेतले.नरडयाखाली उतरवले.गुरूजींना म्हणयाचं होत मनात क्षणभर विचारही आले.जर साखर कारखाना नाही झाला तर तुमच्या जमीनी परत मिळतील काय ? ही तुमच्या बापजादयाची  इस्टेट . तुमची ओळख कुणी हिरावून तर घेणार नाही ना.याचा तुम्हाला काही मेळ आहे का ? तुमचे माणसं हाताशी धरून तुम्हाला दगा-फटका होऊ शकतो.तुम्ही तसा लेखी करार केलाय का पण गुरूजींनी तोंड आवरलं. काही न बोलताच ते निघू लागले. पांडबामात्र गुरूजींच्या धुसर होणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे टक लावून पाहत राहीला.मागे वळून गुरूजींनी पुन्हा आठवण करून दिली. “तेवढं मुलीला पाठवा उद्यापासून नियमित शाळेत .”

पांदीच्या बाजून वळणा-वळणाची वाट जाते.केकताडाचे अड्डेच जणू ते.बाजूला त्यांचे अणकुचिदार काटे टोचण्यासाठी टोकत होते .बेशमीचे झाड तर एवढे होते की वाट काढायलासुध्दा जागा नव्हती. अधुनमधून गाजरगवतातून जागा करून जाव लागायच.सगळी रान तणकाटान जुळली होती.मशागती कमी पडायला लागल्या होत्या की काय कोण जाणे ! गुरूजी चालत होते. गाडीजवळ जात होते.चावी चाचपत होते . गाडीवर टांग मारून नाहीसे झाले.समाजाला शिक्षण देणार्‍या शाळेत.

आज त्या गोष्टीला सात-आठ वर्ष झाले असतील.पांडबा शिर्राच्या बाजारला निघाला होता.मागून पांढरीफट्ट कार हॉर्न वाजवीत येत होती.पांडबा पाठीमाग वळून पाहू लागला. गाडीच्या काचा बंद होत्या.आतला माणूस काही दिसत नव्हता.पण जरा हळूच गाडी आलीय म्हणाल्यावर आपल्या ओळखीचीच कुणाचीतरी गाडी असेल असे त्याला न जाणे वाटलेच.इथून शिर्रापर्यंत लिप्ट मिळाली तर बर होईल असं मनात वाटलं देखील .

आशाळभूतपणे तो गाडीकडे पाहू लागला.
“काय पांडबा कुणीकडं ?”- गाडीची काच खाली घेत आतली व्यक्ती बोलली.

पांडबाला नवल वाटल.गाडीतली माणसं मोठी.श्रीमंत.आपल्या गरीबाला कशाला हाक मारतील.असं मनाशीच पुटपुटला.गाडी अधिकच जवळ आल्यान आतली व्यक्ती  टपकळपणे दिसली.

” ओळखल का नाय ? “ती व्यक्ती पांडबाला जवळची वाटत होती.पण विस्मृती झाली की काय म्हणून डोक खाजवलं

“बस बस.बाजाराला जायच वाटतं”

‘ हूँ ss निघालोय .म्हण्ल होउन जाईन कामात काम.’-पांडबा सांगायला लागला.

“म्हण्जी ?.”

” आज तहेशीलीवर मोर्चा हायी.पण म्या नाय ओळखिल तुम्हाला.”
” मी तुमच्या गावात नवकरी केली.बरेच दिवस.प्राथमिक शाळेला नव्हतो का ? सर्वे करायला यायचो.तुमची मुलगी शिकली राव माझ्या हाताखाली.”

“व्हय,व्हय आता आलं ध्यानात.हल्ली मला असंच होतय बघा.ध्यानात त्‌ असतय पण ध्यानातबी येत न्हाय. बरं कसे कायेत तुमचे पोर्‍ह बाळं?’

‘बरेयत सगळे.आता बीडलाच गेलोत र्‍हायाला.पोरांची बी सोय लागती.नोकरीला जायला काय आता गाडी घेतलीय.चार-दोन आमचे जोडीदार सीटावारी आणायचे.डिझेलच भागतय.’

‘शाळासाठी गेलात व्हय.’
‘ हूँ..काय म्हणत होता कसला मोर्चाय. ?’
‘काय धोका झाला बघा.’
‘ म्हण्जी ?’
‘साखर कारखान्याच्या मालकांन दिला ना धोका.’
‘ व्हय का ? मंग..’
‘लुबाडली सारी जमीन.नवकर्‍या गेल्या मातीत.अन्‌ शेर्स गेले मातीत.दिवसा लुटलंय आम्हाला.”
“मधी तर उद्घाटन झाल्त त्याचं.”

“मस्स झाल्त उद्घाटन.मंत्री-संत्री झाडून सारे पुढारी आल्ते.नरडं ताणूस्तर भाषणं दिल्ती.आठ दिसात काम सुरू करतोत म्हणत सगळ्यांनी मिळून जत्रा केली आमच्या रानांवर अन्‌ दुसरं काय ? उघड्यावर आलोत आम्ही.”

“मंग आता काय म्हणतोय तो.कारखाना झाला नाही त्‌ शेतकर्‍याची जमीन परत द्यावा असा कायदाय.”
“स्वत:च्या , बायकापोरांच्या नावावर करून घेतली जमीन त्यानं.  नाकब्लीला आलाय आता.द्यायची नाही म्हणतोय.दिवाळं निघालं म्हणतोय.काय करता येतय आता.लुटलं म्हणायचं दिवसा.”

“म्हणून मोर्चा काढलाय का काय ?”
“सगळे जमून देणारेयत निवेदन.म्हण्लं आपलं सगळ्याबरोबर र्‍हावा हजर.”
“मधी काहीतरी चाललं व्हतं ना माघारी द्यायचय.माघारी द्यायचय म्हणून.”

“आमचा म्होरक्या. चोरांवर मोर झाला. मोर्चा काढायला लावायला  त्योच.पैसे खाउन म्यानेज व्हणारा त्योच.आमच्या भांडवलावर त्याची झाली मांडी ओली. लाख -दोन लाख घेतले त्याच्याकडून झाला मिंधा.दिलं सोडून वार्‍यावर.सगळा खेळच बिघडलाय..”

“व्हय..”

“नितीमत्ताच र्‍हायली नाही. मधी आमच्या भावकीतल पोर्ग जमिनीसाठी भांडत होत.त्या पोराला त्यांनीच पुढं केल.कोण्त्यातरी समितीवर घेतल.त्येबी येड झालं खुश .जमिनी र्‍हायल्या की तशाच.कोणत्या धुंदीत वागत्येत लोकं कुणास ठाऊक. धा-पाच प्यायाला दिले की  भाळले त्याच्यावर.आजचा मोर्चा तसाच प्रकार व्हायचा.”

गुरूजी आता शहरात जावून सर झाले होते.सर गाडी चालवीत होते.मागे कान देउन ऐकत होते.माझ्या समोर हा प्रकार घडला. या गरीब लोकांचे संसार बघता बघता उघड्यावर आले याची त्यांना चुरचूर लागली होती.मनात अनेक विचार येत होते.पण आपण सरकारी नोकर आपल्याला काय करता येतय ? याच्यात नाही तर लढा, उभारला असता.उपोषण केले असते.शेतकर्‍यांची भाकरी त्यांना मिळवून दिली असती.सारं जीवन कसं साचेबंद झालय याचा विचार केला अन गुरूजी मनातल्या मनात शांत झाले.अस्वस्थता पुन्हा वाढत होती. बाजारकर्‍यांची वर्दळ वाढली होती.जनावराचे टेंम्पो भरून बाजाराला येत होते.थोडे अंतर कापून गेले की तहसिल येणार होती. स्टेंरीगवर हात फिरवत गुरूजी बोलते झाले.

“पांडबा, तुम्ही लढा तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल’.सगळे एक्या जागंवर या. कुणी फूटू नका.मोहाला बळी पडू नका.कोर्ट प्रकरण करा.नियमान तरी जमीन परत मिळायलाच पाहिजे.”
हे शब्द सरांचे एकले की पांडबाला हायसे वाटले.गुरूंजीवरच्या विश्वासापोटी शब्दावर  विश्वास बसला. आपली जमीन नक्की परत मिळेल आपला संघर्ष संपेल.अंधुकशी किनार आशादायी वाटली.पोरांबाळांचा घास तरी त्यांना मिळेल.असं उगीचच वाटून गेल.गाडी पुढे पुढे जात होती.तशी पांडबाला उतरण्याची घाई झाली होती.पण तरी गुरूजीबद्दल काहीतरी बोलाव म्हणून बोलला.

” गुर्जी ,या एकदा गावाकड.पुढच्या महिण्यात हरिनाम सप्ताह गावात.मोठमोठे महाराज येणारेत किर्तनाला.नावाजलेले गायक-वादक सम्दे येणारेत.वर्गणी-फिर्गणी सम्द झालय.”

“हो , येईन की मला बर्‍याच दिवसापासून यावा वाटतय.पण काही निमीत्त नव्हत येईल सप्त्याला.किती किती दिली वर्गणी.”

“माणसी हजार दिल्येत.”
” व्हय का !”
“परत लाल्याचे पैसे आले होते सरकारचे बँकीत.त्ये सम्द्यांनी सहया-आंगठे करून दिले सप्त्यावाल्याला.”
“बरं, मंग तर बरेच जमले असतील.”

“हूँ सगळा लाखातच खर्च म्हणायचा”
“परत त्ये कुपनावरचा गहू – तांदूळ कुणीच उचलला नाही.तो तसाच तिकडं वळती केलाय.मोठा सप्ता होणारेय.या बरका तुम्ही, तेवढयाच गाठी-भेटी व्हत्यात.”
“बरंय, येईन बरं.किर्तन ऐकेल मंग तर झालं.”

पांडबा चर्चा करत होता.तहसिल जवळ येतय का ते पाहत होता.न झालेल्या कारखान्याची जमिनी आता परत मिळती का काय अस झाले होत.स्वप्न डोळ्यासमोर दिसत होते.
” पोर्‍ह काय करत्येत आता.”-गुरूजींनी विषय काढला.
“मोठ जातय बांधकामावर”

“म्हंजी,शिकले न्हायीत का काय पुढं.”
” शिकले पण नोकरी काय लागली नाही जातेत आता थापी घेउन .कधी बिगारकाम करत्येत.कधी दुकानावर कामावर जातेत.पोट भरायचे म्हणल्यावर कराव लागतय काहीबी.”
“बरं बरं तहसिलजवळ उतरायच ना आता.”

“हूँ.बघतो ना कुणी मोर्चेकरी आल्येत का त्ये.आला असला तर तिथच त्यांच्यात थांबतो.ह्यो तिढा काय लवकर सुटन अस वाटत नाही.”

तहसिल जवळ आल होतं.गाडी थोडी उताराला लागली.रस्त्यावरच्या खड्डयात आदळली.पण गाडीचे सीट मजबूत होते.मउशार सीटावर माणूस आदळत नव्हत.परत आलेला घाम पार कमी झाल्ता.गा र वाटत होत.एसी चालू केल्यामुळ काचा बंद झाल्या होत्या.काचातून बाहेरच दिसत होतपण आतलं दिसत नव्हतं.न झालेल्या कारखान्याचा बोर्ड मात्र स्वप्नात आल्यासारखा भासत होता.गाडीचं ब्रेक कचकन दाबल गेल.एक दचका घेउन गाडी थांबली.दार उघडल गेलं.पांडबा गाडीतून उतरला.हात जोडून उपकार झाल्यासारखे वाकून निरोप घेतला.गुरूजीची गाडी भुर्रकन निघून गेली.नोकरदार गाडीत अन्‌ शेतीचा मालक उघडयावर अशीच गत झाल्ती.पण त्यांनी तरी आपल्याला लिप्ट दिली.आपली चौकशी केली म्हणून काहीसे दु:ख कमी झाले नसता बाकीचे साले तसेच कट मारून पुढे जातात अनेक प्रश्न मनात उपस्थित होत होते.

हळुहळू माणसं गोळा होत होती.एकमेकांशी चर्चा करत होती पांडबा त्या गर्दीत सामील झाला होता.घोषणा काय द्यायच्या याचा सराव होत होता.उन्मळून पडण्यापेक्षा इथ ताठपणे उभं राहणच बर असं वाटून गेलं.एक दोन नेहमीचेच कार्यकर्ते झगे घालून तयार होते.घोषणांचे फलक आणले गेले.कर्मचारी जिल्हयावरून पांढत्याफट्ट गाडयात येत होते. उतरत होते.आफिसात जात होते.पांडबाला मनात वाटल आपलं काट्ट शिकल असतं तर असच गेल असत हाफीसात.

मोर्चा निघाला.’आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. देणार कशा नाहीत? घेतल्याशिवाय राहणार नाहीत.एक , दोन,तीन,चार…’….परिसर दणाणून गेला होता. निवेदन दिल गेल.तुमच्या भावना मी वरीष्ठांपर्यंत पोहोचवतो.एवढे आश्वासन मिळाले.मागं पोलीस .पुढं पोलीस करत मोर्चा संपन्न झाला.

मोर्चा, निवेदन यातच दिवस गेला. बाजार संपला.पालं उठली. भाजीपाल्यावाले परत गेले.पांडबा भानावर आला. बाजार करायचा तसाच र्‍हायला. सूर्य डोंगरावर टेकला आता कसला मिळतोय बाजार ? या विचारांन डोक्यात प्रकाश पडला.गुलाल खांदयावर टाकलेले बैल परत जात होते.काही बैलाचे मालक बदलले होते.काहींचे ते तसेच होते काही बैल टेंपोत भरून चालले होते.तर काहींच्या नशीबी पायी चालणे आले होते.वाहनं माघारी घराच्या वडीनं निघाली होती. ही वाहनं निघून गेली की आपल्याला घरी जायला सुध्दा काही मिळणार नाही.पांडबाच्या मनात आले आता घर गाठलेलेच बरे. म्हणून तो रस्त्यावर आला. वाहनाला हात करत होता.पण गच्च भरलेल्या वाहनात पांडबाला कुणीच जागा देईना.

झाकड पडली होती. वाहनांचा उजेड भक्कदिशी पांडबाच्या अंगावर पडायचा.डोळे दिपायचे.भूंगे किलकिले डोळे करून आशाळभूतपणे वाहनांकडे पाहत होता.पण एकही वाहन उभे राहीले नाही.एकतर पांडबाच सीट त्यांना परवडणार नव्हतं.दुसरं म्हणजे त्यांच्याकड जागाच शिल्लक नव्हती.काय कराव ? काय कराव या विचारात पांडबा तसाच तडा-तडा पायी निघाला.घामाघूम होत चालतच होता. घराच्या वडीनं,पोर्‍ह अन्‌ लेकराबाळांत जाण्यासाठी…

विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड-4132449
मो.9421442995
vitthalj5@gmail.com

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..