साधारणत: चार-एक वर्षांपूर्वी कुटुंबासहीत काश्मिरला जाण्याचा योग आला होता. सोबत माझे मित्र श्री. मधू साठे आणि संजय प्रभुघाटे आणि या दोघांच्याही फॅमिली होत्या. एकूण दहा जण होतो आम्ही.
तेंव्हा काश्मिरातलं वातावरण आताच्या एवढं खराब नसलं तरी टेन्स होतंच. अंधार पडायच्या आत हाॅटेलवर परतणं तेंव्हाही अनिवार्य होतंच परंतू ती सुचना कोणी गांभिर्याने घेत नव्हतं, आम्हीही घेतली नाही. आपण मुंबईत फिरतो तसे आम्ही सकाळ-संध्याकाळ श्रीनगरच्या रस्त्यावर फिरायचो, खरेदी करायचो, खायचो-पियचो. काश्मिरला जाताना जी भिती होती तीचा लवलेशही दोन दिवसांनंतर राहीला नव्हता..आणि आमच्या या बिनघोर वागण्याला कारण होता माजीद, माजीद हुसेन..!
माजीद. एक सामान्य काश्मिरी मुसलमान. माजीदची साथ आम्हाला श्रीनगरचा हवाई अड्डा ते परत हवाई अड्डा असे एकूण १० दिवसाची होती. या दहा दिवसांत याची आमच्यावर घारीसारखी नजर होती, ती ही आम्हाला जाणवू न देता..आम्ही कुठे जातोय, आम्ही कोणाशी बोलतोय किंवा आमच्याशी कोण बोलतं याच्यावर त्याचं चोख लक्ष होतं. तसा पैसे मोजून आमच्यासोबत घेतलेला तो एक गाईड कम ड्रायव्हर..! पण आमच्या केअर टेकींगची जबाबदारी त्याने पैशांकडे न बघता, न सांगताच उचलंली होती..
या दहा दिवसांत आम्ही माजीदशी खुप गप्पा मारल्या. या सर्व गप्पांमधून आम्हाला जाणवलं ते त्याचं आपल्या देशाविषयीचं प्रेम आणि या देशामुळेच त्याला रोजी-रोटी मिळते याची त्याला असलेली जाणीव. काश्मिरात येणारे पर्यटक हे बहुसंख्य काश्मिरीं लोकांचं उदर निर्वाहाचं साधन आहे आणि याची त्याला आणि इतरही फेरीवाले, दुकानदार, हाॅटेलवाल्यांशी बोलताना जाणवलं.
माजीदचं म्हणणं होतं की पाकीस्ताविषयी नाही, तर भारताबद्दल आत्मियता आणि प्रेम असलेले काश्मिरी बहुसंख्येने आहेत परंतू विखुरलेले आणि पोटार्थी असल्याने त्यांना त्यांचा आवाज नाही. आपल्यासारखे ते ही राजकारण्यांना आणि राजकारणाला विटलेले आहेत. परंतू बहुसंख्येने असले तरी पोटाच्या मागे फिरत असल्याने त्यांना एकजूटीने आवाज उठवता येत नाही आणि आवाज ‘काढता’ही येत नाही. आपल्याला नाही का सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर ओम पुरी, आपल्या पैशावर माजलेले तिन्ही खान, केजरीवाल, संजय निरुपम, दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम आणि आता ड्रम गर्ल या साऱ्या मुठभर नाजायज औलादींना चपलांनी तुडवून तुडवून मारावं असं वाटतं परंतू तसं करता येत नाही म्हणून हात चोळीत बसण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही, तसंच आहे हे. आणखी एक, आपण कायद्याला घाबरून गप्प बसतो आणि ते अतिरेक्यांना..!!
माजीदने आम्हाला जे चार वर्षांपूर्वी सांगीतले तेच काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहेबुबा मुफ्ती यांनी अतिरेकी बुरहान वाणी याच्या एन्काऊंटरनंतर काश्मिरात उसळलेल्या (खरं तर उसळवलेल्या) हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर अलिकडेच केलेल्या एका भाषणात सांगीतलं. मेहेबुबा मुफ्ती म्हणाल्या की,’पाकीस्तानच्या बाजुने घोषणा देऊन धार्मिक भावना भडकावून हिंसाचार करणारे ५-१० टक्क्यांपेक्षा जास्त नसावेत मात्र एकगठ्ठा असल्याने त्यांची संख्या मोठी वाटते..!” माजीदनेपण हेच सांगीतलं होतं.
जाता जाता एक क्लायमॅक्स सांगतो आणि थांबतो. गुलमर्गच्या मुक्कामात एका संध्याकळी माजीद म्हणाला, “चलीए, मै आपको एक साहब से मिलाता हूं”. बाहेर सर्वत्र बर्फ आणि फटे थंड वातावरण आम्ही तिघे निघालो. माजीद आम्हाला जवळच्याच झाडीत सपलेल्या एका खोपटवजा धाब्यावर घेऊन गेला. तिथे त्यांने आमची भेट एका प्रोढ इसमाशी करून दिली. या माणसाचं नांव राजासाब..! आम्ही गेलो होतो ते त्याचं धाबा-कम-घर होतं. त्याच्याशी झालेल्या गप्पांतही त्याने माजीदचीच भावना बोलून दाखवली. मॅगी खाऊन झाली, दोन वेळेस चहा घेऊन झाला आणि आम्ही जाताना त्यांने जे सांगीतलं त्याने आमची थंडी पार पळाली..!
हा राजासाब पुर्वीश्रमीचा टेररीस्ट होता. सरकारचं इनाम होतं त्याच्या डोक्यावर. काश्मिर आझाद होईल या आशेने त्याने आतंकी कारवायात भाग घेतला होता परंतू काही वर्षातच त्याला हे सर्व पाकीस्तान प्रायोजित कारस्थान असल्यातं समजलं आणि त्याचा भ्रमनिरास होऊन तो सरकारला शरण गेला. सरकारनेही त्याचं जागा आणि व्यवसाय सुरू करायला भाडवल दिलं. आम्ही बसलेलो त्याचा धाबा त्याला सरकारने दिला होता. खुप खुष होता आणि सुखीही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अनेक तरूण गैरसमजाने त्या मार्गाने गेले. त्यातले बरेचजण पोलीस कारवाईत गोळ्या खाऊन मेले तर इतराना इच्छा असुनही पाक अतिरेक्यांच्या धाकामुळे परत येता येत नाही..
काश्मिरची भावना ही आहे. धर्म आणि पाकीस्तान यांच्या नादी लागलेल्यांची संख्या अत्यल्प आहे. बहुसंख्यांना ते भारताचा अविभाज्य भाग आहेत याची जाणीव आहे. त्यांना भारताविषयी प्रेम आहे आणि त्यांना इथेच राहायचं आहे..मुठभर काश्मिरी राजकीय नेते आणि पाकीस्तान स्पाॅन्सर्ड सो काॅल्ड धार्मिक नेते त्यांना तसं करू देत नाहीयत..आता त्यांना आपल्यात सामिल करून घेण्याची जबाबदारी आपली आहे.
माजीद गेले चार वर्ष आमच्या संपर्कात आहे. सणा-वाराला आवर्जून शुभेच्छा देतो आम्हाला. तिकडे जे चाललंय त्याच्या बातम्या सांगून कळवळतो..आम्हीही आमच्या परीने त्याला धीर देतो..तेथील अशांत आणि अनिश्चित परिस्थीतीमुळे त्याचं तीन वर्षांपूर्वी बोणारं लग्न लांबत गेलंय ते अजुनही झालेलं नाही..आपल्याशी नाळ जोडू इच्छीणारे असे अनेक माजीद आहेत..आता जबाबदारी आपली आहे..!
मला ठाऊक आहे, माझं मत अनेकांना पटणार नाही, यावर वाद-संवाद होतील, काश्मिरी पंडीतांचा विषय निघेल परंतू जे मी पाहीलं, अनुभवलं आणि मनाला भिडलं ते चार वर्षांच्या कालावधी नंतर सध्याच्या पार्श्वभुमीवर तुमच्याशी शेअर करावसं वाटलं म्हणून लिहीलं..
कधी काश्मिरला जाणं झालं तर माजीदला जरूर भेटा. हा ‘माजीद’ तुम्हाला रस्त्यावर, दुकानात,शिकाऱ्यात किंवा हाॅटेलात असा कुठेही भेटेल. अट एकच, त्याला ओळखायचं आणि त्याच्याशी बोलायचं..!!
— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply