‘तो ना – अरे नग आसा नग!’
‘नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो.
आमच्या मालवणी मुलखात एक वकील होते. ते राजकारणात पडले, राज्यमंत्रीसुद्धा झाले. कुणाला कसा धडा शिकवायचा यात ते वाकबगार नग होते. त्यांचा एक जुना वादेली होता. वादेली म्हणजे दुश्मन. त्याच्याशी वकील मजकुरांचा जमिनीवरून जुना वाद होता. वर्षानुवर्षे कोर्टाच्या फेऱ्या सुरू होत्या. हे एवढे नावाजलेले वकील असून, तो त्यांना दमवत होता. शेवटी वकिलांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्यांनी गावातली चार नग पोरं जमवली आणि कायद्यात न सापडता आपल्या वादेल्याला कसा धडा शिकवायचा, याचा धडा त्या पोरांना दिला. जीवाचा कान करून पोरं ऐकू लागली
‘ह्या बगा- तेका धडो शिकवायचो म्हणजे शिकवायचो. घाबरायचा नाय उद्या संध्याकाळी त्याला निरोप द्यायचा- अर्जंट काम आसा, नारायणाच्या देवळापाठी भेट. बट डोन्ट बिकम व्हायोलन्ट. तुम्ही चौगांनी अगोदरच थय जावून हवायचा. वन मॅन विल बी विथ स्टिक. व्हेन ही विल एन्टर, ही विल डेफिनेटली आस्क – काय ब्वॉ?’ आपण काही बोलायचं नाही. जस्ट हिट हिज लेग
ॲण्ड रन अवे…”
वकीलसाहबांच्या दुश्मनाला पोरांनी अॅज इट मालवणी मराठी इंग्रजी धडा शिकवला. त्यानं पोलिसात तक्रार वगैरे केली; पण पोरांना समज देऊन लगेच सोडून देण्यात आलं. अशी पोरांनी चार-पाच वेळा समज खाल्ली; पण ती कधी व्हायोलन्ट न झाल्यामुळे, शेवटी वकीलसाहेबांना हवी होती ती जमीन वादेल्याने कॉम्प्रमाईज करून देऊन टाकली.
विजयी मुद्रेने वकील गावात फिरू लागले. वादेल्याला कुणी विचारलं, की ‘काय म्हादेवा-मेल्या पंद्रा वर्सा केस लडवलंस नि एवडी सोन्यासारी जमीन वकिलाक चुटकेसरशी देवून टाकलंस?’ तर वादेली काही न बोलता खांदे पाडून ओशाळवाणं हसत चालता होऊ लागला.
त्या जमिनीत 50 धरते माड होते. एकेक नारळ भोपळ्याएवढा आणि खोबरं म्हणजे गोड मिठाईसारखं. ते माड म्हादेवानं रक्ताचं पाणी करून वाढवले होते. जमीन गेल्याचं त्याला एवढं काही वाटलं नाही; पण माड गेले त्याचं दु:ख झालं. मात्र, तो कुठंच काही बोलला नाही. व्हायोलन्ट झाला नाही.
वकिलांच्या ताब्यात आलेल्या माडांवरचे नारळ अचानक गायब होऊ लागले. काय भुताटकी कळेना. त्या बागेतून ओल्या बाळंतिणीचं भूत अमावास्येच्या रात्री फिरत असतं, अशी आवई उठली. प्रतिपदेला नाराळ गायब. वकील हैराण झाले. पाळत ठेवली. पोलिसांत तक्रार केली. त्या पोरांना गस्त घालायला नेमलं. काही उपयोग झाला नाही. तीन वर्षांनी माडांच्या बागेसहित वकिलांनी जमीन पुन्हा म्हादेवाला त्याने सांगितलेल्या पडेल किमतीला देऊन टाकली आता तुम्ही मला विचारून नका- काय ब्वाँ? कशी काय?’ जरा इकडे कान करा. (वकीलसाहेबांना सांगू नका हां.) अहो अमवाशेच्या काळ्याकुट्ट काळोखात, उंच माडांवर, पालीच्या पायांनी आवाज न करता चढणं आणि 10-10 नारळांची पेंढी, मांजरीच्या दातांनी अलगद धरून बिनआवाजी खाली उतरवणं, त्या अख्ख्या पंचक्रोशीत म्हादेवाशिवाय कोणाच्या बापाला शक्य होतं का?
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply