सोलापूरच्या उमा चित्रगृहाच्या बाहेर भलं थोरलं पोस्टर ! “जंजीर ” आणि “दिवार ” मधील अंगार ओकणारा अमिताभ वेगळ्याच वेशभूषेत ! त्याने घातले होते, त्याला ” पॉलीनेक ” म्हणतात हे कालांतराने वालचंदला असताना समजले. हिंदी चित्रपटसृष्टीतील यच्चयावत “हूज हू ” मंडळी एका पडद्यावर !
सुरुवात शांत,रोमँटिक अमिताभच्या दर्शनाने- चक्क कविता करताना आणि गुणगुणताना ! लगेच महाविद्यालयात ” मैं पल दो पल का शायर हूँ ” असं क्षणिक तात्पुरतं कवी जीवन स्वीकारणारा ! हे सगळंच विलोभनीय आणि गुरफटून टाकणारं मायाजाल. याही रूपात तो आवडला- विरही /उत्कट प्रेमी, नंतरचा ” मी कविता करणं सोडलंय, तो शायर कधीच मेलाय ” म्हणणारा कडवट व्यावसायिक. या माणसाच्या हाताला अदृश्य परीस चिकटलाय – हात लावील त्या भूमिकेचं सोनं, निव्वळ सोनं (अगदी अलीकडच्या “पा “, “ब्लॅक “, ” सरकार ” पर्यंत ! ) त्याची रेंजच कोड्यात टाकणारी – विस्मयकारी !
सोबतीला शशी कपूरचं जिंदादिल प्रेम आणि शेवटी ऋषी-नीतू जोडीचं अवखळ/धसमुसळं प्रेम ! सगळ्या रोमान्स छटा एकाच वेळी अनुभवल्या. अशा चौकटीबाहेरचे ” कस्मे वादे ” आणि “सिलसिला ” हे अमिताभचे त्यानंतरचे चित्राविष्कार ! पण तोपर्यंत या डोमेन मध्ये (ही )अमिताभ फिट्ट बसला.
” मैं हर एक पलका शायर हूँ ” वाल्या सच्च्या साहीरला खय्याम ने सुरेल कोंदण दिले. काश्मीरची नयनरम्य पार्श्वभूमी कथेला नजाकत देऊन गेली.
असाच काहीतरी विचार आज मनात आला- ही कलावंत मंडळी निवांतवेळी मागे वळून नक्कीच बघत असणार. त्यांना काय “जुनं ” आठवत असेल? आज नीतू सिंग ला “कभी कभी ” चा तो “थ्रो बॅक” ऋषी आठवत असेल? अमिताभला सध्या एकांतवासात असलेली धूसर पुसट राखी ( त्याच्या कवितांची दिवानी) आठवत असेल? देवाघरी गेलेला शशी कपूर सिमी गरेवाल ला आठवत असेल कां ? आत्ता आत्ता निवर्तलेल्या खय्यामला या चित्रपटानंतर लगेचच निधन पावलेला साहीर कितीवेळा शब्दांसकट स्मरला असेल ?
उमा चित्रगृहाच्या पडद्याला या कलाकारांच्या काही आठवणी असतील? तेथील भिंतींवर आदळलेली सुरावट, संवाद, पार्श्वसंगीत वेगळं करून सांगता येईल?
युंही – ” कभी कभी मेरे दिलमे खयाल आता हैं !”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply