अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. वि. शं. चौघुले यांनी लिहिलेला हा लेख
गेल्या काही दशकांत मराठीतील संतसाहित्याचा परामर्ष समीक्षक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत, तत्त्वज्ञ या सर्वांना आपापल्या परीने घेतला आहे. कोणतीही सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-आध्यात्मिक परंपरा सातत्याने सुरू असते. तिच्या प्रवाहात नवीन भर पडत असते; वाटावळणे घेत ती पुढे सरकत असते. काळाच्या ओघात तिच्यात नवी भर पडते. म्हणून परंपरेतील श्रेयसातून कालसुसंगत शाश्वत विचारांचा काळाच्या विशिष्ट टप्प्यावर शोध घ्यावा लागतो; पूर्व संचिताचं, पुनर्मूल्यांकन व्हावे लागते. दुसरे असे की, संतसाहित्याच्या अभ्यासाच्या, परिशीलनाच्या, मूल्यांकनाच्या अनेक पद्धती अस्तित्वात असतात सांप्रदायिक, चरित्रपर पारमार्थिक, ऐतिहासिक, संशोधकीय, तात्त्विक, भाषावैज्ञानिक, वाङ्मयीन आणि आस्वादक अशा विविध पद्धतींच्या आधारे संतसाहित्याचे मूल्यमापन आजवर केले गेले आहे. वस्तुतः कोणत्याही सांस्कृतिक वा चळवळीतील मुख्य घटक व्यक्ती. व्यक्तींना बनलेला समाज असतो.
वि. शं. चौघुले यांची प्रतिक्रिया अशी-
“संतपरंपरेतील मूल्यांनी कल्याणप्रद विचारांचा नव्या परिप्रेक्ष्यातून अर्थ लावणे, ही एकविसाव्या शतकातील विचार अभ्यासक, समाजधुरीण व अध्यापन व्यवसायातील घटकांची जबाबदारी ठरते. याचे मुख्य कारण म्हणजे कालसापेक्ष म्हणजे त्या काळातील वास्तवाचा असलेला प्रभाव.
संतांचे साहित्य आणि विचार धर्म, जात, पंथ, लिंग, भाषा, वाव आणि भूप्रदेशाच्या मर्यादां पलीकडील होत. शिवाय, परमकार्थिक संतांचे अंतकरण मानवी कल्यणाच्या भावनेने ओतप्रोत भरलेले होते.” (संत समाज आणि अध्यात्म, संधिकाल प्रकाशन, ठाणे -पृ. ९२, द्वितीय आवृत्ती, २०१५)
संत कबीर व महाराष्ट्रातील वैष्णव संत तुकाराम या दोन संतांचा तुलनात्मक विचार केला जातो. भारतीय संतपरंपरेतील मध्ययुगीन संतांनी प्रामुख्याने ईश्वरभक्ती हे आपले मुख्य उद्दिष्ट मानले होते. मात्र कालमान व व्यक्तिमत्त्वपरत्वे त्यांच्या विचारसूत्रांत कधी अधिक साम्य दिसून येते. हे साम्य कोणते?
कबीर-तुकारामांचे मूलगामी विचार धर्मनिरपेक्ष होते; मानवकल्याणाची आकांक्षा दोघांची होती. या दोन संतांनी बुवाबाजी व चमत्काराचा निषेध केला, धार्मिक आणि जातीय कट्टरतेचा निषेध केला. संत कबीरांनी धर्मनिरपेक्ष भूमिकेतून हिंदू-मुसलमान उपेक्षिले गेले. आपलेपणाचा धिक्कार केला. ते जातपात, परमेश्वरभक्ती करणारे नव्हते. संघर्ष वा तेढ निरामय जीवनात बाधा आणू शकते याचे भान कबीरांना होते. धर्मसमभावाचा आग्रह धरण्यापेक्षा कबीरांचा भार दंभस्फोटावर अधिक होता. धर्म व गुरुपरंपरेच्या श्रेष्ठत्वाच्या चर्चेपेक्षा अंतर्यामीच्या ईश्वराचा शोध घ्या, असे आवाहन हिंदू-इस्लाम ह्या धर्मातील लोकांना कबीरांनी केले. मंदिरात आणि मशिदीत परमेश्वराचा शोध धर्माच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांना कबीरांनी खाटिक म्हटले आहे –
साधो पाँडे निपुण कसाई ।
बकटि मारके भेडक धाय ।
दिलका दरद न आई ।।
मूर्तीत देव आहे असे सांगून भक्तीचा बाजार मांडणाऱ्या तथाकथित पंडितांचा, कर्मठ ब्राह्मणांचा आणि मुल्ला मौलवींचा कबीरांनी निषेध केला; (आंध्र कवी वेमना, कर्नाटकातील बसवेश्वर, या संतांनीही अनिष्ट जातिप्रथांवर कोरडे ओढले आहेत.)
एकूणच सर्व संत केवळ भक्तिमार्गी नव्हते, त्यांच्यातील काहींना पुरोगामी (आजचा शब्द) विचार मांडले. समाजउन्नयनाची कास त्यांनी धरली होती. पण दुर्दैवाने कबीर, तुकाराम, श्री वसवेश्वर आदींचे विचारसंचित उपेक्षिले गेले.
सर्व मध्ययुगीन संत केवळ ईश्वरभक्ती करणारे ते संत केवळ तत्त्वविचार सांगत नाहीत. कर्नाटकातील श्री बसवेश्वरांचे प्रबोधनपर कार्यसुद्धा अन्य संतांशी नाते जोडणारे आहे. त्यातील कबीर व तुकाराम या दोन संतांच्या काव्यातील विचारांत व शैलीतील साम्य लक्षणीय आहे.
बहुतेक संतांनी नामभक्तीचे समर्थन केलेही, त्याहीपेक्षा अंतकरणपूर्वक भक्ती करणाऱ्याला ते श्रेष्ठ संत मानतात. तुकाराम, कबीरांसारख्या संतांना अंतकरणशुद्धीला नवे परिमाण दिले. जर मन आतून मलिन झाले आहे तर बाह्यउपचारांनी ते शुद्ध कसे होईल?
न्हाए-धोए क्या भया । जो मन मैल न जाय,
मीन सदा जल में रहे। धोए बास न जाय
(कबीर म्हणतात – मनाचा मळ (मनाचे विकार) जर जात नसेल तर न्हाणे-धुणे कशाला हवे? सतत पाण्यात राहाणाऱ्या माशाचा वास कितीही धुतले तरी जात नाही.)
मध्ययुगीन भारतीय संतांनी गुरुमाहात्म्य आणि संतमहिमा वर्णिला आहे. आदर्श संत व आदर्श गुरु कसा असावा, याविषयी संतांनी मन प्रकटन केले आहे. संत कबीर व संत तुकाराम याला अपवाद नाहीत. धर्म, भाषा, पंथ, भूप्रदेश कोणताही असला तरी संतत्वाचे-सज्जनत्वाचे गुणधर्म समान असतात. सत्य, करुणा, दया, अहिंसा, आर्जव, मृदुत्व, यांच्या गुणसमुच्चय यातून संतत्व आकारास येते. संतांचे मार्गदर्शन भक्तीचा पारमार्थिक उन्नती करते. अशा संतांना संत एकनाथ जागले म्हणतात. संतांचे जागल्येपण (समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न ) नजरेआड केले गेले आणि समाजाच्या पारमार्थिक उन्नती बरोबरच समाजजागृतीला ढळ पोचला. कबीर तुकारामांनी धर्माचरणातील विसंगतीवर प्रहार केला.
आपलाच जन्मसिद्ध धर्म श्रेष्ठ आणि इतरांचा धर्म कनिष्ठ अशा भूमिका त्यांनी घेतल्या नाहीत. कबीर म्हणतात,
मैं कहता हौ आँखन की देखी,
तू कागद की लेखी रे.
जे प्रत्यक्ष अनुभवतो, जे डोळ्यांनी बघतो तेच महत्त्वाचे आहे; पण तुझ्या लेखी ते पुस्तक बडिवार आहे. त्यांनी धर्माचरणाला विसंगतीपर आणि तथाकथित पंडितांच्या दडपपशाहीला निकराने विरोध केला. अनुभूतिशून्य विद्वत्तेची व पांडित्याची टर उडवली. कर्मकांडांना, निरर्थकपणे माळा जपण्याला विरोध केला. अर्थशून्य पुस्तकी पोपटपंचीपेक्षा भक्तिमार्गातील अनुभवाला अग्रस्थान दिले; कारण कबीर, तुकारामांसारखे संतांचा आत्मविश्वास आणि निर्धार घोकंपट्टीतून अगर पोथीनिष्ठेतून निर्माण झालेला आत्मप्रत्ययाचे आणि आयुष्यातील खडतर अनुभवांचे बळ त्यामागे आहे.
पोथी पढि पढि जग मुवा,
पंडित भया न कोइ’ किंवा
मासि कागद छुयो नही’ या कबीरांच्या काव्यपंक्ती सुपरिचित आहेत. प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला वाचता येतात तोच खरा पंडित ही कबीरांनी ज्ञानी पंडितांची केलेली व्याख्या तुकारामांनी केलेल्या भगवद्भक्तीच्या व्याख्येशी मिळत्या जुळत्या आहेत.
संत कबीर आणि संत तुकाराम ह्या दोन्ही संतांचे विचार कालसापेक्ष नव्हते. विशिष्ट काळा पलीकडे जाऊन त्यांनी आपली मानवी कल्याणाची-जनहिताची भूमिका अभंगवाणीतून प्रकट केली. त्यांच्या कवितेचे मर्म यातच साठवलेले आहे.
— प्रा. वि. शं. चौघुले
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply