कधी मारावा कोणा डोळा
कधी करावा कानाडोळा
कधी मिटावा एक डोळा
जगण्यासाठी
कुणा ऐकावे कुणा बोलावे
कुणा उगाच जाणुनी घ्यावे
आपले कौतुक न करावे
स्वतःहुनी…
अर्थ–
कधी मारावा कोणा डोळा
कधी करावा कानाडोळा
कधी मिटावा एक डोळा
जगण्यासाठी
(कोणाशी अतिशय मनापासून बोलतो, तर कोणाशी थोडे अंतर ठेवून, हे कोणी सांगायला हवे का आपल्याला? तर नाही त्याची जाण आपली आपल्यालाच व्हावी लागते. कुणास मदत करावी किंवा कोणाला दूर ठेवावे, लक्ष न द्यावे हे प्रत्येकाने त्याच्या बुद्धीने आणि अनुभवाने ठरवायचे असते. पण हे सगळं करीत असताना आपलं आयुष्य खर्ची घालवू नये. आपल्याला जे हवे आहे ते ध्येय मिळवण्यासाठी चालत राहावे इतर गोष्टींना एका डोळ्याने पाहून दुसर्याने न पहिल्यासारखे केले तर विरक्ती साध्य होते नाहीतर प्रवाहात भले भले पट्टीचे पोहणारे सुद्धा वाहून जातात.)
कुणा ऐकावे कुणा बोलावे
कुणा उगाच जाणुनी घ्यावे
आपले कौतुक न करावे
स्वतःहुनी…
(कुणाचं काय ऐकावं हे स्वतः ठरवावं, चारचौघात भेटलेला कोणी उगाच आपलं घोड जाऊद्या पुढं करीत असतो त्याला चिकित्सक पणे काही विचारायला जाऊ नये नाहीतर, पुढचा बराच वेळ तुम्हाला कान देऊन ऐकावे लागेल. एखाद्या समारंभाला गेलं किंवा चारचौघात गेलं की मी कसा हुशार आहे, मी हे केले मी ते केले, मला हे बक्षीस मिळाले, मला अमुक गोष्ट मिळाली असे उगाच स्वतःचेच कौतुक करणाऱ्याला अहंकारी म्हणून ओळखले जाते.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply