माझा जन्म साताऱ्यातील एका खेडेगावचा. एक वर्षाचा झाल्यावर पुण्यात आलो. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं व्हायचं. या गावी जाण्यामुळे खेड्यातील जीवन जवळून पाहिलं. शहरातून काही दिवसांसाठीच गावी जात असल्याने आमच्या वयाची मुलं आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पहायची आणि मोठी माणसं ‘आली बामणाची पोरं’ म्हणायची.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ग्रामीण जीवन अनुभवताना काही गोष्टी मनावर कोरल्या गेल्या. पहाटे कंदील घेऊन एखादा पिंगळा येत असे. उजाडल्यावर वासुदेव घरोघरी ‘दान पावलं’ म्हणत सुपातून त्याच्या झोळीत धान्य घेत असे. उन्हं वरती आली की, एखादा मुसलमानाचा पोरगा सायकलीवर येऊन केसांवर फुगे देत असे. कधी पोतराज डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन यायचा. सुपामध्ये धान्य घेऊन गरागरा फिरवायचा.
दुपारी जेवणं झाल्यावर बाया माणसं ओट्यावर येऊन बसल्या की, ‘सुया घे पोत घे’ म्हणत काचेची पेटी घेतलेली बाई येत असे. तिच्याकडून लहान मुलांना वाळे, एखादा ताईत, काळ्या मण्यांची मनगटी अशा गोष्टी धान्याच्या किंवा भूईमुगाच्या शेंगांच्या बदल्यात घेतल्या जात असत. अशाच दुपारी कधी साड्या, चोळीच्या खणांचं गाठोडे घेतलेला शिंपी येत असे. सायकलवरून एखाद्या गारीगारवाल्याची फेरी गावात आली की, लहान मुलं त्याच्यामागे पळत जायची. पाच, दहा पैशाला ती आईसकॅण्डी मिळायची.
आता पस्तीस चाळीस वर्षांनंतर यापैंकी कोणीही राहिलेलं नाहीये. गावात आता चिटपाखरूंही येत नाही. ते दिवसही गेले आणि तो अमूल्य आनंदही गेला….
शहरात देखील अशीच फिरुन पोट भरणारी माणसं होतीच. सकाळी वासुदेव यायचा. फक्त त्याला धान्याच्या ऐवजी पैशाची अपेक्षा असायची. नाथ संप्रदायातील भस्म फासलेले गोसावी फिरायचे. हातातील चिमट्याचा ते आवाज काढायचे. त्यांना पाहून भीती वाटत असे. दुपारी बोहारीण कपड्यांच्या गाठोड्यासह फिरायची. एखादा दहीवाला डोक्यावर पसरट हंडा घेऊन गल्लोगल्ली फिरायचा. दुपारी चारनंतर सायकलवरून सामोसे विकणारा प्रत्येक वाड्यासमोर थांबत थांबत जायचा.
काही वर्षांनंतर ह्यांचं फिरणं हळूहळू कमी झालं आणि शहरातून व उपनगरातून अॅल्युमिनियमच्या मोठ्या पेटाऱ्यातून खारी, टोस्ट विकणारे बिहारीबाबू दिसू लागले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून गल्लोगल्ली फिरताना यांना मी पाहिलेलं आहे. काहींनी सायकलला तो पेटारा बांधलेला असे. काहीजण डोक्यावर पेटारा घेऊन फिरत.
बिल्डींगच्या खाली यायला कुणी आवाज दिला की, तो पेटारा जमिनीवर ठेवत असे. तो उघडला की, त्यामध्ये चार कप्पे केलेले दिसत. एकात टोस्ट, दुसऱ्यात खारी, तिसऱ्यात बटर, चौथ्यात नानकटाई भरलेली असे. तराजू काढून तो पावशेरच्या वजनाने जे काही हवं असेल ते देत असे. ही हिंदीच बोलणारी माणसं प्रत्येकाशी आपुलकीने वागत. माझ्याकडे येणारा खारीवाला दोन मजले चढून वरती येत असे. आठवडाभर तो दिसला नाही तर मलाच चुकल्यासारखं वाटत असे. तो ओळखीचा झाल्यामुळे कुठे वाटेत दिसला तर थांबून बोलत असे.
पावसाळ्यात ही बिहारी माणसं त्यांच्या कुटुंबीयांकडे गावी जात असत. पावसाळ्यानंतर पुन्हा यांचं फिरणं सुरु होत असे. कोरोनाचं संकट आलं आणि हे सगळे फेरीवाले त्यांच्या गावी गेले. लाॅकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय संपुष्टात आला.
कदाचित आतापर्यंत त्यांनी दुसरा व्यवसाय सुरु केलाही असेल. शहरात अजूनही कुठे अशी फिरणारी माणसं दिसत नाहीत. आता शहरात व उपनगरात पाॅश बेकऱ्यांची दुकानं चौकाचौकात झालेली आहेत. त्यामुळे हे खारीवाले परत आले तरी त्यांच्याकडून खरेदी करण्याची मानसिकता आताच्या पिढीत राहिलेली नाही….
काळानुरूप काही गोष्टी बदलत जातात, तसंच ही पेटारा घेऊन हिंडणारी माणसं देखील आता फक्त आठवणीतच राहतील…
– सुरेश नावडकर २०-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply