कधी वाटते,
कोसळता पाऊस व्हावे,
रपरप पडत धरणीला,
सर्वकाळ बहरत ठेवावे,—
कधी वाटते
उसळणारा दर्या व्हावे,
विशाल रूप बघणार्यांना,
चकित करून सोडावे,—
कधी वाटते
लख्खकन आभाळी चमकावे, प्रचंड मोठी वीज होऊनी,
पृथ्वीला भारावून टाकावे,—
कधी वाटते
घनगर्द अरण्य व्हावे,
भयभीत आकार पाहुनी,
इतरांनी गर्भगळीत व्हावे,—
कधी वाटते,
झुळझुळणारा झरा व्हावे, आपल्याच धुंदीत मस्तमौला, सगळीकडे थेंब लुटावे,—
कधी वाटते,
वळसेदार नदी व्हावे, गावाला कुशीत घेऊनी,
त्याची प्रेमळ आई बनावे,—
कधी वाटते,
गगनांगणी मेघडंबरी व्हावे, विविधरंगी पंचमी खेळत,
धरेवरील सृष्टीला न्याहाळावे,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply