तसं पाहिली तर त्या कागदपत्रांत काय अर्थ होता? आजच्या हिशेबात तो माणूस, त्याच्या निष्ठा, त्याची कार्यपद्धती जशी काळाच्या ओघातनिष्प्रभ झालेली होती. तसंच त्या कागदपत्रांच. त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती.
सी.व्ही. वारद गेले. सुन्न झालो. चार ओळींची बातमी होती. फारशी कुणी दखल घेतली नव्हती. काळाच ओघात विसला गेलेला एक माणूस. बातमी वाचली नसती तर कदाचित कळलही नसतं. आहेत की नाहीत.
काहीच आगापिछा नसलेला हा मनस्वी माणूस दोन-तीन वर्ष सेंट जॉर्जेस इस्पितळात वास्तव्य करुन होता. आपल्या विकलांग देहातील व्याधींशी निकराने झुंजत होता. धुगधुगी अजून कायम होती. त्या अंधाऱ्या खोलीतील त्यांच्या कॉटखाली पत्राच्या जाडजूड दोन-तीन ट्रंका होत्या. तीच त्यांची संपत्ती, काय होत त्यांत? एकदा मला त्यांनी ती ट्रंक उघडून दाखवली. जुनी कागदपत्रे, बॉम्बे रिजनल काँग्रेस समितीने केलेले ठराव, बापूजी, जवाहरलाल, इंदिराजी यांचबरोबर काढलेले फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं, लोकसभेतील कामकाजाचे अधिकृत वृत्तांत, लिहिलेली पत्रं, आलेली उत्तरं.
तसं पाहिली तर त्या कागदपत्रांत काय अर्थ होता. आजच्या हिशेबात तो माणूस, त्याच्या निष्ठा, त्याची कार्यपध्दती जशी काळाच्या ओघात निष्प्रभ झालेली होती. तसंच त्या कागदपत्रांच. त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती. त्याच महत्वं कळणार नव्हतं. ती कागदपत्रं फक्त वारद या व्यक्तीसंबंधी नव्हती. तो एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख कागदपत्रांद्वारे उभा राहत होता. त्याच महत्व मानल तर खूप होत. नाही तर काहीच नव्हतं. वारद यांनी ना वारस ना रुढ अर्थाने काही संस्था उभ्या करुन ठेवल्या. एक वादळी व्यक्तिमत्व स्वत:चं संस्था बनलं. मुंबईच जीवन व्यापून राहिलं. ज्या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटल्या त्यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक केलं. मोठमोठया गर्विष्ठ, उर्मट लोकांना नमवल आणि स्वत:बरोबरच आपल संस्थान बरखास्त केलं.
काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी महात्मा गांधींची सेवा केली. जवाहरलाल नेहरुना मुंबईत असताना कधी सोडल नाही. राजीव गांधींचा जन्म झाला त्यावेळी ते हॉस्पिटलात उपस्थित होते. इंदिराजी जेव्हा मुंबईत येत तेव्हा ते त्यांना भेटत, हातात आपला कागद कोंबत. त्यात स्वत:साठी कधीही काही त्यांनी मागितले नाही. राष्ट्रध्वजाचा अभिमान अतिशय जाज्वल्य. त्यासाठीच त्यांनी आपल आयुष्य वाहिल. अनेक खटले भरले. अनेक अधिकारी, पुढारी यांचा पाठपुरावा केला. राष्ट्रध्वज कसा वापरावा याची आचारसंहिता तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. तशी लोकसभेच्या इतिवृत्तात कायमची नोंद आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांच राष्ट्राला उद्देशून भाषण होतं. ती एक प्रथाच नेहरुंच्या काळात सुरु झाली होती. पुढेही चालू राहील. पण मूळ कल्पना वारद यांची. तसा ठराव त्यांनी स.का. पाटील बीआरसीसीचे अध्यक्ष असताना संमत करविला. त्याची प्रत नेहरु यांना पाठविली आणि सातत्याने पाठपुरावा केला.
राज्यातील राज्यपालांचे राजभवनावर स्वतंत्र ध्वज असत. राष्ट्रध्वजाशिवाय कुठलाही ध्वज असू नये, अशी चळवळ एकहाती त्यांनी उभी केली आणि राज्यपालांचे इतर मानमरातब कायम राहिले तरी त्यांचा ध्वज मात्र खाली उतरला.
पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणजे वारद यांच्या दृष्टीस दसरा-दिवाळी. सकाळी पांढरा कुडता आणि पायजमा घालून ते हातात काठी घेऊन मुंबईत फेरफटका मारायला बाहेर निघत. मग कुणी उलटा ध्वज लावला, कुणी चुकीची सलामी दिली. कुठे फाटलेला ध्वज लावण्यात आला याची पध्दतीशीर नोंद त्यांच्या वहीत व्हायची आणि संध्याकाळी मुंबई पोलीस कमिशनरांना अहवाल जायचा. त्याच्यावर कारवाई व्हायची. त्यांनी केलेल्या केसेस या देशात सर्वत्र प्रमाण मानल्या जायच्या. राष्ट्रध्वजासाठी इतकं काम वर्षानुवर्ष न थकता करणारे वारद एकमेवच.
त्यांच्या तडाख्यातून आयएएस अधिकारी, मंत्री, आमदारसुध्दा सुटले नाहीत. एका अधिकाऱ्याने आपल्या व्हिजिटिंग कार्डावर तीन सिंहाची राजमुद्रा छापली. तडक त्याच्याविरुध्द वारद कोर्टात गेले आणि अशा प्रकारे राजमुद्रेचा वापर करता येणार नाही, असा कोर्टाचा निकाल आला. मोटारींवर कोणता ध्वज लावावा, कोणता दिवा लावावा याबाबतही त्यांनी नियम करायला लावले. राष्ट्रध्वज हा सर्वात उंचावर लावला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा.
विविध व्यापारी कंपन्या राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रध्वज यांचा आपल्या खाजगी उद्योगासाठी गैरवापर करीत. त्याविरुध्द त्यांनी प्रथम आवाज उठवला. एका थर्मास कंपनीने जवाहर थर्मास काढला आणि त्यावर नेहरूंच चित्र छापलं. वारद यांनी हजारो थर्मास रद्द करायला लावले आणि राष्ट्रपुरुषांचा व्यापारी कामासाठी उपयोग होऊ नये म्हणून कायदा झाला.
वारदांच सर्वात आवडत लक्ष्य होतं. बीएसटीचे बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर. टोपी घालून काम करावं असा नियम. तो बहुतेक पाळत नाहीत. वारद बसमध्ये शिरुन नाव लिहून घेत आणि तक्रार करीत. वारद लांबून दिसले तरी बस कंडक्टर, ड्रायव्हर, पोलीस आपली खिशातील टोपी काढून डोक्यावर चढवत.
आता वारद यांच्यासारखी धाक वाटावीत, अशी निस्पृह माणंस फारशी राहिली नाहीत. पण त्यांनी घालून दिलेले नियम ते नसतानासुध्दा किमान मुंबई शहरात पडलेली सवय म्हणून का होईना पाळले जातील असे वाटतं.
त्यांच्या अमूल्य कागदपत्रांच काम झालं असेल, असा विचार मनात येऊन अस्वस्थता येते.
—————————————————————————————-
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 10 फेब्रुवारी 1994
Leave a Reply