नवीन लेखन...

काही चांगल्या सवयी

दरवर्षीप्रमाणे, दिवाळीत उटण्या-तेलांच्या जाहिराती बघताना माझी बहीण वैद्य पूर्वा फडके-सावईकर हिचाही लेख वाचला. आयुर्वेद, हा जनमानसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा, ही तिची तळमळ असते. त्यामुळे “‘अभ्यंग स्नान’ फक्त दिवाळीतच नव्हे तर ते आपलं रुटीन असलं पाहिजे; किमान या ऋतूत तरी आपलं आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून याचा अवलंब करावा” हे तिचे शब्द वाचताना खास करून मला माझ्या मुलींचं ‘बाळपण’ आठवलं.

त्या जन्मल्यापासून अडीच वर्षे दररोज आणि नंतर पाच वर्षांपर्यंत, आठवड्यातून किमान दोन दिवस केसांपासून पायांपर्यंत मी दोघींची तेल मालिश करत असे. आता ते महिन्यातून दोन-चारदा फक्त होतं; तरीही तिच्या लेखातून प्रेरणा घेऊन, आणि या सतत बदलत्या हवामानाची गरज म्हणून, पुन्हा अवलंबायचा प्रयत्न करते आहे.

याचे फायदे तर आम्हा तिघींनाही उत्तम लाभले आहेत. मुली पाच वर्षांच्या होईपर्यंत दुपारीही तासभर झोपायच्या. पोट साफ होणे, आणि भूक लागणे, याची तक्रारही कधी नव्हती. बाकी या बंगलोरच्या शुष्क हवेत थंडीत त्यांना वरून moisturizer लावावं लागायचं; पण कोरडी त्वचा असलेल्या काही मुलांना इथे प्रचंड त्रास होतो, तो आटोक्यात राहिला असावा.

सुरूवातीला निर्णय घेणं अवघड गेलंच!

बऱ्याच ‘नव्या आई-बाबांप्रमाणे’ आम्हीही आपली पारंपरिक पद्धत v/s मॉडर्न विचारसरणी, म्हणजेच तेल मालिश v/s बेबी लोशन्स या द्वंद्वात अडकलो होतो. आमचे आई-वडील विरुद्ध इथले बालरोगतज्ज्ञ, असा एक पेच होता; शिवाय मी विरुद्ध नवरा असा दुसरा! म्हणजे पहिली साहजिकच तेल मालिश आणि नो तेल मालिश ही कॅटेगरी होती. पण दुसरी म्हणजे ‘मुलींच्या हिताचं असेल ते काहीही’ v/s ‘मुलींना बाहेरचं (तेल/ क्रीम/ कोणतंही moisturizer) काहीही लावायची गरज नाही. त्या आपोआप सगळ्यासाठी immunity develop करतील’, ही दुसरी कॅटेगरी होती. साहजिकच आई म्हणून ‘आपोआप होईल तसं होऊ देणं’ माझ्याने बघवणार नव्हतं. त्यामुळे आपला आपला research करून माझ्या बौद्धिक क्षमतेनुसार मी निर्णय घेतला आणि त्यांना तेल मालिश करू लागले. याचं संपूर्ण श्रेय पुण्यातल्या अलाटे डॉक्टरांना मी देईन. डोक्यापासून पायापर्यंत नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची, आणि त्यांच्या कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायचं किंवा दुर्लक्ष करायचं, हे त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे “हे सगळं समजून उमजून तू करत असताना, एक आई म्हणून तुझा instinct जे सांगेल, ते अधिक महत्त्वाचं!” हे साठहून अधिक वर्षे अनुभव असलेल्या ऐंशी ते पंच्याऐशी वय असलेल्या त्या डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं, जेव्हा माझ्या पिल्ल्या जेमतेम एक महिन्याच्या आतल्या होत्या! त्यामुळे या दोघींना जपण्याची, सांभाळण्याची अत्यंत दक्षतेची अशी पहिली दोन वर्षे वैचारिक दृष्ट्या बरीच सोपी गेली. कारण माझ्या डोक्यातला सगळा गोंधळ नष्ट झाला होता, आणि यांची आई म्हणून समर्थपणे ‘मी या दोघींची जबाबदारी घेऊ शकते’, हा आत्मविश्वासही निर्माण झाला होता. असे डॉक्टर प्रत्येक जन्मदातीला मिळोत, असं नेहमी मला वाटतं.

असो, तर विषय होता त्वचेची काळजी घेण्याचा… आणि आमच्या बाबतीत ‘आंघोळीपूर्वी आणि झोपण्यापूर्वी तेल मालिश करायची आणि (इथल्या, बंगलोरच्या हवामानानुसार) हवा कोरडी असेल तेव्हा आंघोळीनंतर moisturizer लावायचं’ हे मी ठरवलं. पहिल्या काही दिवसांतच बाळांची मालिश करणं शिकून घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ स्वतःच्याही आंघोळीच्या रूटीनमधे हे बसवून टाकलं. हो! माझीही पाठ, कंबर, पाय, खांदे दुखायचे ना! आणि दोघींची स्वतः मालिश करून आंघोळ घालून माझे हातही दुखायचे.. पण माझं मीच सगळं करणार अशी जिद्द होती! अगदीच जमायचं नाही तेव्हा आईची मदत घेतलीही. पण तरीही मागे-पुढे व्हायचंच.. निदान स्वतःकडे दुर्लक्ष तरी नाही झालं! कारण आईकडून पहिला मंत्र मिळालेला होता की, “मुलींमुळे आपलं जेवण राहिलं, तब्येतीकडे दुर्लक्ष झालं, हे बिलकूल होऊ द्यायचं नाही. तुझं (शारीरिक आणि मानसिक) आरोग्य उत्तम असेल तरच तू मुलींना नीट सांभाळू शकशील!”

असो, तर या स्वेदनाचे आम्हा तिघींनाही उत्तम फायदे लाभले. इतर वाढीबरोबर दोघींची झोप, भूक, हवामानातले बदल स्वीकारण्याची क्षमता उत्तम राहू लागली. तेलमालिश केल्याने रक्ताभिसरण उत्तम राहातं.

पाय आणि डोक्याला मालिश केल्याने उष्णतेचे विकार होत नाहीत आणि केसांचंही आरोग्य राखलं जातं.

बेंबीत तेलाचे थेंब सोडल्याने पोट साफ राहातं. आणि नाकात तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब सोडल्याने नाक साफ राहातं, ऍलर्जी आटोक्यात राहाते.

पुढे अडीच वर्षांच्या झाल्यानंतर शाळेत जाऊ लागल्या, तशी मात्र सर्दी तापाची इन्फेक्शन्स घेऊन येऊ लागल्या. पण आता तरी हेच वय आहे exposureचं आणि immunity develop करण्याचं, त्यामुळे मी तरी या दोघींना अगदी गरज पडेल तेव्हाच सर्दी तापावरची औषध दिली. सोबत वाफ देणे, गुळण्या करायला लावणे, ओव्याचा शेक/वाफ/धुरी देणे, तसंच वेगवेगळ्या तेलांचाही वापर विविध प्रकारे वापर करून, एकूणच अशा supporting घरगुती methodsवर जास्त भर दिला. या माझ्या निवडीमुळे थोडा जास्त संयम दाखवावा लागला खरा, पण त्यांच्या आंतरिक मजबुतीसाठी हे योग्य आहे या धारणेने मी हे करत गेले.

आता कोरोनाच्या काळात तर सकाळी दररोज गुळण्या करणे, आणि खाली खेळायला किंवा बाहेर कुठे जावंच लागलं, तर आल्यावर त्यांचा बाबा रात्री वाफही घ्यायला लावतो. यांना हे सवयीचं असल्यामुळे कोरोना काळात “हे काय नवीन?” किंवा वैताग, भीती अशी या गोष्टींची त्यांना वाटली नाही. अजून एक म्हणजे या सवयींमुळे असावं, दोघींचा patience आपोआप develop होत गेला. ताबडतोब बरं वाटलंच पाहिजे, किंवा आत्ता आपल्याला काहीतरी होतंय म्हणजे काहीतरी भयंकर होऊ घातलंय, आणि अशावेळी सगळं घर आपल्या भोवती असलंच पाहिजे; असा थयथयाट करण्यापेक्षा;  उपाय चालू आहेत आणि कालावकाशाने सगळं नीट होणार आहे, ही मानसिकता तयार होते.

दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते. आणि इतरही काही मुलांना पाहता, हा माझा अनुभव सांगतो की, हे जेव्हा आपण त्यांच्याशी स्पष्ट बोलतो, त्यांना कळतंय या भूमिकेतून समजावून सांगतो, तेव्हा हे सगळं आपल्या life-cycleचा भाग आहे, हे मुलं छान समजून घेतात. एवढंच नाहीतर आजारपणात चिडचिड रडारड न करता आपल्याशी cooperate सुद्धा करतात.

जुळ्यांच्या आजारपणात सोशिकतेने आम्हाला (स्वतःला जपत) दोघींनाही एकाचवेळी सांभाळून घ्यावं लागतं.

पुढच्या लेखात या संदर्भातले बरेच मजेदार (सजेदार) किस्से शेअर करीन.. तोपर्यंत तुम्ही तुमचे अनुभव सांगा!

— प्रज्ञा वझे घारपुरे.

2 Comments on काही चांगल्या सवयी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..