नवीन लेखन...

कैलास दर्शन – भाग 2

ठरल्याप्रमाणे खानसाहेबांकडून कार्यभार घेतला. त्यांना निरोप दिला आणि आम्ही खुलताबादल जायला तयार झालो. देशपांडेंनी गाडी मागवली. एक जुनाट जीप गाडी आली.

“देशपांडे अहो ही गाडी? एखादी चांगली कार विभाग प्रमुखाला मिळत नाही का?”

“साहेब तशा पूलमध्ये दोन अॅम्बेसडर कार आहेत. पण त्या मुख्य अभियंत्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यांच्या फॅमिलीला शॉपिंगला जायचे आहे आणि एक गाडी मुलांना शाळेत सोडायला जाणार आहे.”

“अरे मग त्यातली एक द्यायची. मुलांना सोडायला जीप नाही का चालणार?”

“छे छे साहेब तेत्यांच्या पदाला शोभणार नाही.”

“मग मी जीपने जाणे शोभेल वाटते? असो. मला त्या प्रतिष्ठेशी काही घेणे देणे नाही. शक्य असते तर मी पायी किंवा सायकलने जाईन. ती जीप परत करा. आपण एस्.टी. ने जाऊ, काय तास दोन तासाचा प्रवास आणि पुन्हा कधी त्या पूलच्या गाडीच्या मागे लागू नका.” या सरंजामी वृत्तीचा कधी लोप होणार आणि आपले लोक या खोट्या बडेजावातून कधी बाहेर पडणार ते मला कळेना, फुकटच्या बडेजावापेक्षा खऱ्या कामाकडे आपण कधी लक्ष देणार? असो. आम्ही म्हणजे मी, जाधव आणि देशपांडे असे खुलताबादला दुपारी पोहोचलो. खुलताबाद विश्रामगृहात पोहोचलो. तिथल्या विभागीय अभियंत्यांना निरोप दिला होता. ते पण आले. आम्ही एस.टी. ने आलो हे कळल्यावर त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले.

“साहेब मला कळवायचे मी माझी गाडी पाठवली असती.

“खडसे, (त्यांचे नाव) अहो त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काही नाही.

शिवाय तुमच्या गाडीची एक चक्कर विनाकारणच झाली नसती का?

“फुकट कशाने साहेब? आमचे मुख्य अभियंता कार्यालयाकडे नेहमीच काहीतरी काम असते ते केले असते.”

“ठीक आहे, धन्यवाद, जपानी तज्ज्ञांचा अहवाल तुम्ही बघितला असेलच ना?”

“हो पण खानसाहेबांनी ते आपले काम नाही म्हणून सांगितले त्यामुळे आम्ही काही केले नाही.’

“त्यांना वाटले हे पुरातत्त्व खात्याचे काम आहे तसे ते खरेच आहे. पण हे आपल्या मराठवाड्यासाठी फार महत्त्वाचे काम आहे आणि औरंगबादला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देणारे असल्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला हातभार लावायला पाहिजे. जपानी तज्ज्ञांनी त्यांच्या अहवालात खूप कामे सुचविली आहेत आणि त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक बाजाराचा, खर्चाचा साहित्य सामुग्रीचा विचार करुन आर्थिक मदत किती करावी याचा अंदाज मागितला आहे. आपण या अहवालातील सर्व बाबी तपासू आणि त्याचा व्यावहारिक अंदाज करुन त्यांना देऊ शकू असे मला वाटते.”

“हो नक्कीच, प्राथमिक अंदाज आपण नक्कीच देऊ शकतो.”

“ठीक आहे चला तर मग.” आम्ही त्या अहवालानुसार एकेका लेण्याची अगदी सूक्ष्म पहाणी केली. त्यातील सर्वसाधारण बांधकामाची वेगळी यादी केली. काही विशेष प्रकारची कामे की जी फक्त पुरातत्व विभागाकडून होण्यासारखी विशेष कलाकुसरीची म्हणून करावी लागतील आणि त्याच्या खर्चाचे अंदाज पत्रक करणे मुष्किल होते, ते वेगळे केले. संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंतच आमचे निरीक्षणाचे काम होऊ शकले. कारण थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडला आणि लेण्यात प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे उरलेले काम आम्ही उद्या सकाळी लवकर सुरु करायचे आणि आता विश्रामगृहावर परत गेल्यावर सर्व साधारण कामांचा आढावा आणि अंदाजपत्रक करायचे असे ठरवले. खुलताबादला मुक्काम करणे त्यासाठी अपरिहार्य होते.

खुलताबादचे विश्रामगृह वेरुळ लेण्याच्या डोंगरावरच एका बाजूला उंचावर होते. निजामशाही वास्तुकला आणि पाश्चिमात्य वास्तुकला यांचे ते गंगाजमनी मिश्रण होते. थोडेसे बोजड वाटणारे. परंतु त्याला तळघर असल्यामुळे तळमजला चांगला आठ दहा फूट उंच होता आणि तळमजल्यापर्यंत जायला चांगल्या पंधरा वीस लांब रुंद पायऱ्या चढाव्या लागत होत्या. या एकंदर रचनेमुळे ते विश्रामगृह फार छान दिसते. पायऱ्या चढून आल्यावर समोरच्या व्हरांड्यातून दिसणारे दरीचे दृश्य आणि सभोवारचा दूरवर पसरलेला परिसर अत्यंत रमणीय दिसत असे. मला ते विश्रामगृह फार आवडले. निजामाच्या काळात ते खुलताबादच्या सुभेदाराचे मुख्य ठाणे होते म्हणे.

आल्यावर आम्ही बराच वेळ आजच्या कामाची चर्चा केली. रात्री जेवण झाल्यावर विश्रामगृहाच्या समोरच मोठी गच्ची वजा मोकळी जागा होती. तिथे खुर्ध्या टाकून थंडगार हवेचा आणि रात्रीच्या नीरव शांततेचा आस्वाद घेत थोडावेळ गप्पा मारत बसलो. अशा गप्पांमध्ये हमखास येणारा विषय म्हणजे अशा जुन्या पुराण्या वास्तूभोवती रवल्या गेलेल्या व या चोत्या कथा कहाण्या विशेष करुन भुताखेतांच्या, मी खडसेंना विचारले.

“खडसे साहेब इथे मुक्काम करायला मला आवडेल पण इथे काही भटकती रहे वगैरे वावरत नाहीत ना? म्हणजे सुभेदाराचे किंवा कुणा नर्तकी बिर्तकीच्या रुणझणत्या पैजणांचे आवाज वगैरे?”

“छे छ: घाटेसाहेब तसे इथे काही नाही. तुम्ही अगदी बिनधास्त रहा. शिवाय भी बशीरभाईला म्हणजे इथल्या खानसामाला बाहेरच्या व्हरांड्यातच पथारी टाकायला सांगतो. म्हणजे तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही, अहो एकटेपण आणि रिकामे मन ही भटकती हुई रूहे यांचे खास अड्डे।”

“हो तेही खरंच आहे म्हणा, बरे खडसे साहेब, जाधव आणि देशपांडे कुठे रहातील? तुम्ही कुठे जाल?”

“जाधव आणि देशपांडेना शेजारीच आऊट हाऊस आहे तिथे एक सुट देतो. मी माझ्या घरी जाईन. इथून जवळच माझे क्वार्टर आहे.’

“म्हणजे मला एकटयालाच भटकत्या राहच्या ताब्यात देऊन तुम्ही सटकणार असे दिसते. म्हणजे माझे काही खरे नाही आज.”

सगळे आम्ही हसायला लागलो, अशा हास्यविनोदात गप्पागोष्टी झाल्या. मग आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. बशीर भाईने मला रात्री लागले तर म्हणून पाणी आणून दिले. काही हवे नकोयाची चौकशी केली आणि म्हणाला.

“साहेब मी इथे बाहेरव्हरांड्यातच झोपणार आहे. खडसे साहेबांनी सांगितलंय मला तसं काही लागलं तर आवाजघा. इथं बेलचं बटनही आहे त्याचा आवाज व्हरांड्यातही होतो.’

‘अरे बशीरभाई आता मला काही लागणार नाही आणि तुम्हीपण इथे झोपण्याची जरुरी नाही. तुम्ही तुमच्या घरी गेलात तरी चालेल.” त्याचे घर आवारातच पण थोडे लांब होते.

“अच्छी बात है साब जैसी आपकी मजी,”तो निजामी थाटाप्रमाणे मला सलाम करुन गेला मी थंड पाण्याने आंघोळ केली. बाराही महिने आणि कुठेही गेलो तरी रात्री झोपण्यापूर्वी मी आंघोळ आणि ती ही थंड पाण्यानेच करीत असे. पाणी अगदी बर्फासारखे असले तरी. दिवसभराचा शीण गेला. मी झोपायची तयारी केली. मला दिलेला सूट व्ही.आय.पी. सूट होता. भली थोरली खोली. मधोमध लांब रुंद नक्षीकामाचा बिछाना. त्याला मच्छरदाणी लावलेली. निजामी थाट, पण खिडक्या बंद. मी खिडक्या उघडल्या. सुंदर स्वच्छ थंडगार हवा आत आली. खूप प्रसन्न वाटले. मी झोपायचे कपडे घातले आणि ताणून दिली. एक माझे बरे होते. मला पडल्या पडल्या झोप लागते.

रात्री कधीतरी मला जाग आली. हिवाळ्याच्या दिवसात कधी कधी टॉयलेटला जावेसे वाटते म्हणून. मी उठलो टॉयलेटला जाऊन आलो आणि उघड्या खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर अगदी टिपूर चांदणे पडले होते. पिठासारखे म्हणतात ना तसे, आता या चांदण्याला टिपूर का म्हणतात कोण जाणे! पिठासारखे हे विशेषण कदाचित पिठोरी पासून आले असावे. तसे टिपूर हे त्रिपुरी पौर्णिमेपासून आले नसेल ना? छोडो! तो भाषा तज्ञांचा विषय. आपल्याला काय घेणे देणे? मनात कधी काय विचार येतात कोण जाणे. त्या आल्हाददायक चांदण्याचा खिडकीतून दिसणारा नजारा जरा बाहेर जाऊन अनुभवावा म्हणून मी सूटमधून बाहेर व्हरांड्यात आलो आणि समोरच्या लांब रुंद पायऱ्यांच्या शेवटावर उभा राहिलो. ते चांदणे आता अधिकच मोहक वाटू लागले. थंडीच्या दिवसातला गारवा, प्रदूषण विरहित स्वच्छ हवा, दूरवर दिसणारे विहंगम दृश्य, याने मी भारावून गेलो. स्पेलबाऊंड झाल्यासारखा जागीच थिजलो! बाहू पसरले आणि डोळे मिटून त्या वातावरणाशी एकरुप झालो. वाटले एखाद्या विहंगासारखे पंख पसरुन इथून झेप घ्यावी आणि हा सर्व परिसर मनसोक्त डोळ्यात साठवावा.

टायटॅनिक सिनेमातली प्रणयी जोडी जशी जहाजाच्या सुकाणूवर उभी राहून हात पसरुन अथांग समुद्र आणि भन्नाट वाऱ्याची अनुभूती अनुभवते तसा मी ते टिपूर चांदणे आणि त्या अति प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेऊ लागलो. एकेक पायरी उतरत जणू तरंगत तरंगतच मी खाली उतरलो. समोरच्या टेरेसच्या कठड्याला रेलून मैलोन मैल दूर पसरलेला आसमंत त्या टिपूर चांदण्यात न्हाऊन निघालेला पाहू लागलो.

(क्रमश:)

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..