नवीन लेखन...

काजळ भरलेले डोळे (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये अरूणेंद्र नाथ वर्मा यांनी लिहिलेली ही कथा.


ती जणू बोलायचं म्हणून बोलत होती. खूप क्षीण आवाजात मिसेस तिवारीने मनोजला म्हटले, ‘कोमा ताले वू’ आणि आपला नाजूकसा उजवा हात त्याच्यासमोर केला. मनोज चकित झाला. त्याच्या एवढंही लक्षात आलं नाही की फ्रेच भाषेत ओळख करून देताना/घेताना ‘हाऊ डू यू डू’साठी वापरलेल्या वाक्याचं उत्तर त्या भाषेत द्यावं, कमीत कमी ती नाजुकसा, कृश हात हातात तरी घ्यावा. त्याच्या गप्प राहण्याचा वेगळाच अर्थ लावून यावेळी मिसेस तिवारींनी जर्मन भाषेत विचारलं, “आस्प्रेचे किन इंग्लिश. एस्ट एस ओ के इच ड्युश स्प्रेचे’ (मला इंग्रजी येत नाही. जर्मनमध्ये बोलू का?) मनोजचा लहानपणापासूनचा मित्र धीरज तिवारीने सांगितलं होतं की, त्याने खूप प्रयत्न करूनही त्याची पत्नी इंग्रजी शिकू शकली नाही. एवढंच काय तिला भोजपुरी सोडून खडी बोली हिंदीमध्ये बोलणंही अशक्य होतं. परंतु मिसेस तिवारी फ्रेंच आणि जर्मनमध्ये बोलतील, हे त्याला माहिती नव्हतं. आपल्या पत्नीला अतिशय कोमल स्वरात त्याने समजावून सांगितलं. “हा मनोज, माझा बालपणचा मित्र. याच्याशी आपल्या भाषेत (भोजपुरी) आरामात बोलू शकशील.’ आता मिसेस तिवारी मोठे मोठे डोळे करून त्याच्याशी बोलू लागली आणि बघतच राहिली. जणू एखाद्या अस्पष्ट चित्रात प्रवेश “करून आपली एखादी खूप आवडती गोष्ट ती शोधीत होती. जी कुठे तरी हरवली होती.

धीरजने मनोजकडे बघितलं आणि कुजबुजत म्हणाला, “घ्या, आता ही परत आपल्या जगात हरवली. बस्स एवढेच क्षण आपल्या वहिनीची भेट (उपहार) समजून लक्षात ठेव.” मग त्याने पत्नीजवळ उभ्या असलेल्या नर्सला खूण केली. तिने मिसेस तिवारींचा हात पकडून तिला सांभाळली आणि तिच्या व्हिलचेअरचं तोंड आतल्या खोलीकडे वळवलं.

खरं तर मनोज कोणत्याही भाषेत मिसेस तिवारींशी बोलण्यासाठी स्वत:ला तयार करू शकला नव्हता.

धीरजने त्याला सांगितलं होतं की त्याच्या पत्नीला असाध्य मानसिक रोग झाला आहे, एक चांगली गोष्ट म्हणजे ती आक्रमक होत नसे. मौन आणि आत्ममग्नतेच्या पिंजऱ्यात ती स्वत:ला बंद करून घ्यायची आणि मग अनेक महिने त्यातच बंद राहायचं कोणी पिंजऱ्याचं दार उघडून तिला बाहेरच्या दुनियेत आणायचा प्रयत्न केला तरी ती अणूंच्या महापुरात बुडून जायची. परंतु अचानक कधी तरी चंद्राच्या क्षय आणि वृद्धी होणाऱ्या कलांप्रमाणे तिच्या मनात शुक्ल पक्ष उगवायचा तेव्हा मग ती चिवचिवणाऱ्या चिमणीसारखी जो कोणी समोर येईल त्याच्याशी बोलण्याला आतुर असायची. एखाद्या झऱ्यासारख्या वाहणाऱ्या तिच्या बोलण्याला कोणाच्या स्वीकृतीची प्रतीक्षा नसायची.

बोलायला सुरुवात केली की बोलतच राहायची. ऐकणाऱ्याला ती तासन् तास सांगायची की तिचे पती खूप मोठा माणूस होते. तरीही पतीचे नाव तिच्या जिभेवर यायचं नाही. “ते तर गगनविहारी आहेत. ते आकाशात खूप फिरतात. त्यांना कुठे जमिनीवर राहायला आवडतं?’ इथपासून बोलणं सुरू होतं ते किती तरी वेळ चालूच राहायचे. की धीरज खूप मोठे विद्वान होते.

आपल्या कामासाठी जगात अनेक ठिकाणी जात होते. कधी कधी आपल्या गतीमध्ये यायची तेव्हा सांगायची की, लंडन, पॅरिस, दुबई आणि हाँगकाँगहून धीरज तिच्यासाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेऊन आले होते. परंतु हे सगळं ती धाराप्रवाह भोजपुरीत सांगायची. खडी बोली ओळखल्या जाणाऱ्या हिंदीत बोलण्याचं तिला आकर्षण नव्हतं की ती जे काही बोलते आहे ते समोरच्याला समजत आहे की नाही. ती आपल्याच तंद्रीत असायची आणि आता ऐकणारे कुठे राहिले होते. फक्त नर्स आणि मानसरोग विशेषज्ञ. मानसरोग विशेषज्ञसुद्धा रोज नव्हे, तर आठवड्यातून एकदा तपासायला यायचे की कधी कधी अचानक पूर्वसूचना न देता. कोसळणाऱ्या पावसासारखी तिची आक्रमकता लक्ष्मणरेषेच्या आत आहे की अतिक्रमणाच्या जवळ आहे.

धीरजने तिच्या मानसिक स्थितीबद्दल मनोजला सांगितलं होतं परंतु विस्तृत विवरण केलं नव्हतं. मनोजने मिसेस तिवारीबद्दल आपल्या मनात जशी कल्पना केली होती तशी मिसेस तिवारी अजिबात नव्हती. मनोजच्या फ्रेममध्ये धीरजच्या पत्नीचा जो फोटो पाहिला होता त्यामध्ये डोक्यावर पदर घेतलेली एक कृशकाया प्रौढ महिला होती.

फिकट गव्हाळ रंगाच्या त्वचेवर अजून सुरकुत्या पडल्या नव्हत्या परंतु त्याची चाहूल लागली होती. कपाळावर मोठी बिंदी, तिला ती बहुधा टिकली म्हणत असेल, डोळ्याबद्दल विचार करताच मनोज काळाच्या नदीमध्ये जवळजवळ अर्धशतक दूर वाहत गेला.

एवढ्या वर्षांपूर्वी त्याने ज्या षोडशी नववधूला बघितलं होतं तिचा चेहरा आता आठवत नाही. एक अस्पष्ट अशी झलक फक्त बघायला मिळाली होती. त्या छोट्याशा झलकेमध्ये लक्षात राहिले ते फक्त दोन घाबरलेले, काळजी करणारे डोळे, काजळाच्या रेषेतून डोकावणारे, घाबरलेल्या पक्षांसारखे दोन डोळे त्याच्याकडे बघण्यासाठी क्षणभरच उघडले होते आणि लगेच झुकले होते. हे तेव्हा शक्य झालं जेव्हा मनोजच्या बालमित्राने, बारावीतील सहपाठी धीरजने आपल्या नवविाहित पत्नीला खूप आग्रह केला की कपाळावरून खाली सरकलेला पदर थोडा वर करून माझ्या सर्वांत जवळच्या मित्राला तुझ्या चेहऱ्याची एक झलक दाखव. ‘अगं, हा मनोज माझा अगदी जवळचा मित्र आहे.

मला भाऊ नाहीये त्यामुळे माझा भाऊ आणि तुझा दीर हाच आहे. त्याच्या घरीसुद्धा मला त्याच्या भावाचा दर्जा मिळाला आहे. याच्यासमोर एवढे लाजायला नको आणि संकोचही नको.” त्या नव्या नवरीला धीरजने.आपल्या भोजपुरी भाषेत समजावलं होतं. खूप प्रेमाने समजाविल्यावरही ती ग्रामीण बाला कोणा अपरिचित माणसासमोर आपल्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करून उभं राहाण्याचं धैर्य करू शकली नाही. त्या छोट्याशा भेटीत जो प्रभाव पडला होता त्यामध्ये फक्त ते घाबरलेले, संकोचलेले दोन डोळेच फक्त राहिले होते. क्षणभर बघितल्यावरही मनोज त्यामध्ये डोकावू शकला नाही.

मनोज त्यादिवशी खूप अस्वस्थ झाला होता. किशोरवयीन मनोजला आपल्या मित्राची नवी नवरी बघायची कितीही उत्सुकता असली तरी त्याला हे चांगलं ठाऊक होतं की त्या ग्रामीण परिसरात नवऱ्याच्या मित्रासमोर नववधूच्या सौंदर्याचं प्रदर्शन अनपेक्षित नव्हे तर वर्जित होतं परंतु धीरजने तिचा संकोच बाजूला केला, तरूण धीरजला आपल्या प्रिय मित्राच्या पत्नीची ओळख करून घ्यायची होती. मनोजला माहिती होतं, या इच्छेमागे धीरजची हीन भावना होती, आणखी काही नाही. त्याला चांगलं सुशिक्षित पालकांसमोर आपल्या आईचं निरक्षर असणं धीरजला लज्जास्पद वाटायचं.

शाळेत शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वात शहरी मुलामा नसणं त्याला सलायचं. जर कधी शाळेतील मित्रांसमोर ते आले तर त्याला भयंकर संकोच वाटायचा. तो बारावीत आल्यावर त्याच्या घरच्या लोकांनी त्याचा विवाह करायचा हट्ट धरला होता. तो अधिकच संकोचला. हा अवेळचा विवाह टाळण्यासाठी त्याने चांगली युक्ती योजली परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट टिंगल करायला शस्त्र मिळालं. विवाहाचे वेळी मिळालेली नवी कोरी रॅली सायकल घेऊन तो शाळेत गेला तेव्हा तो आणि सायकल दोन्ही वर्गामध्ये उपहासाचे विषय बनले . त्यावेळी मनोजने त्याला आपल्या वर्गमित्रांच्या उपहासाची कटुता दूर करण्यासाठी समजावलं होतं का त्यांना टोचणारी खरी गोष्ट आहे तुझी प्रतिभा.

वर्गमित्रांच्या ईयेचं कारण लग्नात मिळालेली सायकल नव्हे, तर परीक्षेत मिळणारे तुझे मार्कस् आहेत परंतु स्वत:च्या पत्नीबद्दल धीरजच्या मनात किती कुंठा होती, याची जाणीव त्यावेळी मनोजला झाली नाही.

धीरज आणि मनोज शाळेत सहावीपासून बारावीपर्यंत एकत्र होते. धीरज ग्रामीण भागातून आला होता. त्याचं गाव उत्तरप्रदेशच्या एका मोठ्या गावाच्या सीमेपासून चार-पाच किलोमीटर दूर होतं. त्याचे वडील प्रायमरी शाळेचे हेडमास्तर होते. पाचव्या इयत्तेपर्यंत त्याच शाळेत शिकल्यानंतर सहावीत प्रवेश घेण्यासाठी त्याला शहरातील सरकारी माध्यमिक शाळेत यावं लागलं. दररोज एका जुन्या सायकलवरून चार-पाच कि.मी. अंतरावरील शाळेत येणाऱ्या साध्या, सरळ धीरजला त्याच्या शहरी वर्गमित्रांनी खूप त्रास दिला. परंतु मनोज एका सन्माननीय मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. तो कधीच आपल्या या गरीब मित्राला त्रास देण्यात सहभागी झाला नाही. हेच त्यांच्या दोस्तीमधलं रहस्य होतं. पुढच्या पाच वर्षांत ते खूप जवळचे मित्र झाले. हायस्कूलमध्ये दोघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, मनोजने त्याच विद्यालयात इंटरमिडिएटचं शिक्षण सुरू ठेवलं. परंतु धीरजच्या वडिलांच्या महत्त्वाकांक्षेचे क्षितिज हायस्कूलपर्यंतच मर्यादित होतं. त्यांची इच्छा होती की मुलाने गावातील त्यांच्याच शाळेत लहान वर्गांना शिकवावं. बाप-मुलांच्या ओढाताणीमध्ये मुलाला विजय मिळाला. कारण हायस्कूलमध्ये तो प्रथम श्रेणीत पास झाल्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती. बारावीतही त्याला प्रथम श्रेणी मिळाल्याने पुन्हा एकदा बाप-बेट्यामध्ये जोरदार भांडण झालं. धीरजने स्पष्ट सांगितलं की यापुढे तो इलाहाबाद विश्वविद्यालयात पुढचे शिक्षण चालू ठेवील. जोपर्यंत त्याची शिष्यवृत्ती आणि ट्यूशन चालू राहतील.

वडिलांच्या धमक्या त्याला घाबरविण्यात आणि हताश करण्यात अशयस्वी ठरल्या. आपल्या संपत्तीतून त्याचं नाव कमी करण्याच्या धमकीबद्दल मनोजला सांगताना त्याला हसू आलं. तो म्हणाला, “वडील ज्या दोन-तीन एकर जमिनीच्या उत्पन्नातून माझं आणि माझ्या दोन लहान बहिणींचं शिक्षण चालू ठेवू शकले नाहीत त्यातून माझं नाव कमी करून केवढे उपकार करणार आहेत, त्यांना काय माहिती?” शेवटी धीरजच्या वडिलांनी माघार घेतली. परंतु एकुलत्या एक मुलाचा दोनशे किलोमीटर दूर शिकायला जाण्याचा विषय निघताच त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर सुरू व्हायचा. त्याने वडिलांची पर्वा करणं सोडलं होतं.

परंतु तो आईला दुखवू शकत नव्हता. वडिलांनी मुलाची दुखरी नस पकडली आणि पत्नीला बरोबर घेऊन त्याच्या विवाहाचे षडयंत्र रचलं. शिकायला बाहेर जाण्यापूर्वी आईने त्याला एक अट घातली, जाण्यापूर्वी त्याने विवाह करावा. विवाहासाठी आई-वडिलांनी ज्या मुलीची निवड केली होती ती अतिशय सुंदर मुलगी होती. तिचा फोटो दाखवून त्यांनी हेच सांगितलं. परंतु ती जवळजवळ अशिक्षित होती आणि तिचा गाव शहरापासून खूप दूर होता. ही माहिती आपल्या हट्टी मुलापासून लपविण्यात ते यशस्वी झाले. आईवडिलांना पूर्ण विश्वास वाटत होता की उच्च शिक्षणाच्या ध्येयाने वेडा झालेला त्यांचा मुलगा कदाचित आईच्या ममतेची बेडी तोडू शकेल, परंतु पतीची प्रतीक्षा करणाऱ्या त्या षोडशीच्या प्रेमाची बेडी त्याच्या पायात पडेल. अशाप्रकारे इंटरमिडिएटच्या परिक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत धीरजचा विवाह झाला. शहरातील त्याच्या वर्गमित्रांना त्याची चेष्टा करायला एक जबरदस्त संधी मिळाली.

इलाहाबादला जाऊन शिष्यवृत्ती आणि ट्यूशनच्या आधारे धीरजने प्रथम श्रेणीत बी.एसस्सी. पूर्ण केले. यावेळी तो गावी आला तेव्हा मनोजसुद्धा खडकपूरहून आला होता. आय.आय.टी.ची परीक्षा पास झाल्यावर तो तिकडे गेला होता. आपल्या शहरात मनोजशी झालेली ती शेवटची भेट होती. मनोजला तो म्हणाला, “आईला कितीवेळा नकार दिला परंतु यावेळी तिला गवना (नवरीला सासरी घेऊन येणे) करायचा आहे.” एक क्षीण हसू त्याच्या गंभीर चेहऱ्यावर क्षणभरच पसरलं आणि त्याच्या चिंतांमध्ये विरून जाण्याआधी एक सत्य त्याच्या समोर आलं की आई या लढाईतही जिंकली आहे. मनोजने त्याला खूष करण्यासाठी विचारलं, “वहिनी खूप सुंदर आहे ना?” तेव्हा तो म्हणाला, “चल, आज मी तुला भेटवतो. आईवडिलांना ते आवडणार नाही, परंतु ते एका नात्यात भेटायला गेले आहेत.” यानंतर मनोज लग्नात मिळालेल्या सायकलच्या मागे बसून त्याच्या गावाला गेला होता. हीच ती वेळ होती, जेव्हा काजळाने रेखलेले, लज्जित नव्हे, परंतु भीतीने, संकोचाने झुकलेले डोळे खूपदा समजावूनही त्याच्याकडे बघू शकले नाहीत.

आज कितीतरी वर्षांनी ते जमिनीकडे वळलेले डोळे त्याच्या स्मृतिपटलावर उमटले. विश्वास बसत नव्हता की ती फ्रेंच आणि जर्मन भाषेत हॅलो म्हणणारी कृश महिला तीच नाजुकशी ग्रामवधू होती. तिला तो चाळीस वर्षांपूर्वी भेटला होता. आता या दोन मित्रांमध्ये चाळीस वर्ष संपर्क असणं हा एक चमत्कार होता. खूप वर्षांनंतर मनोज आणि धीरजमध्ये अगदी नाटकीय पद्धतीने पुन्हा संपर्क झाला. त्यावेळी मनोज तामीळनाडूच्या कोईमतूर शहरातील एका मोठ्या इंजिनियरिंग कंपनीत उच्च पदावर होता. त्यादिवशी ऑफिसमध्ये त्याला एक फोन आला. फोन करणान्याने आपली ओळख सांगण्याऐवजी सरळ प्रश्न विचारला, “मि, मनोज, हा आवाज तुम्हाला ओळखता येतो आहे का?” प्रश्नकर्त्याचे इंग्रजी उच्चार फार चांगले होते. मनोज मिनिटभर विचार करीत राहिला, परंतु ओळखू शकला नाही. “आय अॅम सॉरी. आय अॅम अनेबल टू ट्रेस यू.”

दुसऱ्या बाजूने आणखीन एक प्रश्न आला, “नेव्हर माईंड, हियर इज क्लू! डू यू रिमेंबर व्हेन यू लास्ट ट्रॅव्हल टू अ व्हिलेज सिटिंग ऑन द कॅरिअर ऑफ दी बायसिकल?”

मनोजला अचानक आपल्या शाळेतील मित्राची धीरजची आठवण आली. त्याने गमतीत, थट्टेत चालविलेला तो संवाद तसाच चालू ठेवला. परंतु आता त्याने हिंदीत उत्तर दिलं, “ते तर आठवतं आहे, परंतु ज्या धीरज तिवारीची ती सायकल होती, त्याचा भगवानसुद्धा असं ऑक्स्फर्डवालं इंग्रजी उच्चारू शकत नाही. तू कोण आहेस बाबा?”

दुसरीकडून मोकळेपणाने हसण्याचा आवाज थांबल्यावर बोलणं पुढे सुरू झालं, “अरे बाबा, सगळं आयुष्य परदेशात राहिल्यावर तिथली उच्चारशैली जिभेवर येणारच ना! तरी तू बरोबर ओळखलंस. आता सांग, समोरासमोर बसून गप्पा मारायला वेळ कधी काढशील?”

“तू कुठे आहेस ते तर सांग. संध्याकाळी भेटू या. माझा फोन नंबर शोधून काढलास, घरचा पत्ताही माहिती असेल. गाडी कुठे पाठवू सांग.”

“नाही मित्रा, गाडी पाठवायची गरज नाही. इथेच अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत एका मल्टीनॅशनल कंपनीने एक वर्कशॉप आयोजित केले आहे. त्यांनी इथे ग्रँट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. किती वर्ष झाली गावाला गेलो नाही. परंतु शहरातील एक ओळखीचे गृहस्थ दिल्लीला आले होते. त्यांच्याकडून कळले की तू कोईमतूरला या कंपनीत आहेस. आज योगायोगाने इथे आलो तर आमच्या होस्टना तुझी चौकशी करायला सांगितली. आज संध्याकाळी त्यांनी इथे एक रिसेप्शन आयोजित केलं आहे. तूसुद्धा ये. मला उद्या सकाळच्या फ्लाईटने दिल्लीला परत जायचे आहे. पुन्हा संधी मिळाली तर तुझ्या घरी नक्की येईन. हां, वहिनींनासुद्धा यायचं असेल तर स्वागत आहे.”

त्या दिवशी संध्याकाळी ग्रँट हॉटेलच्या ग्रँड पार्टीमध्ये मनोज एकटाच गेला. धीरज एकटाच होता. त्यामुळे पत्नीचे बरोबर न येणं खटकलं नाही. संध्याकाळी धीरज खूप जिव्हाळ्याने, आत्मीयतेने भेटला, त्याच्या कुटुंबातील सर्वांची चौकशी केली परंतु आपल्या कुटुंबाबद्दल खूप कमी बोलला. फक्त एवढंच की, मुलगा विदेशात सेटल झाला आहे आणि पत्नी सतत खूप आजारी होती किंवा मुलाबरोबर त्या भेटीमध्ये कितीतरी वर्षं धूळ खात पडलेल्या त्यांच्या मैत्रीला नवजीवन मिळालं. या भेटीत मनोजला एवढंच कळलं की एम.एससी.पर्यंत प्रथम श्रेणी मिळाल्यानंतर धीरजला जर्मन सरकारकडून एक ग्रँट मिळाली होती त्या आधारे त्याने खूप महत्त्वपूर्ण संशोधन करून पीएच.डी. मिळविली होती. नंतर स्वित्झर्लंडमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत त्याला खूप चांगली नोकरी मिळाली होती. मागील तीस वर्षांत त्याने कधी स्वित्झर्लंड, कधी जर्मनी आणि कधी फ्रान्समध्ये राहून रसायनशास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण शोधग्रंथांची निर्मिती केली. विदेशात सरस्वती आणि लक्ष्मीमध्ये सापत्नभाव नसतो, जसा आपल्या भारत देशात आहे. म्हणून आपल्या वैज्ञानिक प्रतिभेचा दबदबा निर्माण करणाऱ्या धीरज तिवारीला एकापेक्षा एक उच्च पदावर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. एवढी सगळी कहाणी सांगितल्यावर तो म्हणाला, एक वर्षापूर्वी तो भारतात आला आहे आणि दिल्लीच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या एशिया-पॅसिफिक रिजनल डायरेक्टरच्या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. कंपनीने गोल्फ लिंकमध्ये घर दिलं आहे. संध्याकाळची भेट संपण्यापूर्वी धीरजने मनोजकडून आश्वासन घेतलं की तो जेव्हा कधी दिल्लीला येईल, त्याचं आतिथ्य स्विकारेल.

त्या भेटीनंतर मनोजला अनेकदा दिल्लीला जावं लागलं. कंपनी त्याच्या राहण्याची व्यवस्था चांगल्या हॉटेलमध्ये करीत असे. त्यावेळी कितीतरी वेळा संध्याकाळी धीरज त्याला भेटला परंतु पंचतारांकित हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटला. दिल्लीच्या गोल्फ लिंकसारख्या श्रीमंत कॉलनीत त्याचं घर होतं. परंतु घरी येण्याचा आग्रह कधीच केला नाही किंवा मनोज तू आपल्या पत्नीला घेऊन दिल्लीला ये असं म्हणाला नाही. कुटुंबाचा विषय निघाला की धीरज त्याची पत्नी चंदा परदेशात मुलाकडे आहे किंवा आजारी आहे असं सांगत असे आणि विषय बदलत असे. असे दोन वर्ष चाललं होतं. मनोजला आश्चर्य वाटत होतं की आपली नववधू चंदा जिचे नाव ती चंद्रमुखी असणं निश्चित करीत होतं तिला आपल्या किशोरवयीन मित्राला दाखविण्यासाठी धीरज अधीर झाला होता आणि या चंदाभोवती असं रहस्यमय वातावरण का निर्माण करतो आहे?

एक दिवस असा आला, मनोजला त्याची पत्नी स्मिताला घेऊन परदेशात जायचं होतं. परंतु दिल्लीला येऊन पुढे जायचं होतं. धीरजला जेव्हा कळलं तेव्हा तो अडून बसला की मनोज, तू स्मिताला घेऊन माझ्याकडे राहायला ये. रात्री जेवण झाल्यावर तिघेही बराच वेळ गप्पा मारीत बसले होते. परंतु चंदाची अनुपस्थिती पुन्हा पुन्हा त्यांच्यात भिंत बनून उभी राहत होती. सारखं सारखं पत्नी आणि कुटुंबातील प्रसंग टाळणं अशक्य झालं. शेवटी त्याला मनोज आणि स्मितासमोर जे रहस्य त्याने आपल्या मनात लपवून ठेवलं होतं ते उघड करावंच लागलं. गेली अनेक वर्ष त्याची पत्नी चंदाला एक कठीण मानसिक रोग झाला आहे. त्यामुळे तिला एका नर्सिंग होममध्ये ठेवलं आहे.

खूप दु:खी स्वरात धीरज म्हणाला, “तिची मन:स्थिती ऊन-सावलीसारखी असते. कधी खूप दुःखी तर कधी लहान मुलासारखी खळखळून हसते. कधी कधी दिसणं, बोलणं अगदी नॉर्मल असतं. तेव्हा ती ओळखते आणि आमच्या एकुलत्या एक मुलाबद्दल बोलते. परंतु आणखी कोणाला भेटायला तिला आवडत नाही.” त्याच्या आवाजातून जाणवत होतं की मनात खोलवर कुठे काटा टोचला आहे. त्याने स्वत:ला सावरून म्हटलं, “फक्त तूच एकटा माझा अगदी जवळचा मित्र आहेस, अनेक वर्षांपूर्वी तिने तुला पाहिलं आहे आणि माझ्या तोंडून अनेकदा तुझं नाव ऐकलं आहे. आपण प्रथम भेटल्यावर तिची काय प्रतिक्रिया होते ते बघू या आणि मग तिच्याशी स्मिताची भेट करू या.’

दुसऱ्या दिवशी ते महागड्या नर्सिंग होममध्ये गेले. तेथील चंदाच्या अनपेक्षित वागण्याने मनोज दु:खी झाला. त्या विचित्र भेटीनंतर त्याला आत्मग्लानी आली होती. अनेक वर्षांपूर्वी नववधू चंदाशी झालेली भेट त्याच्या इच्छेमुळे नव्हती, उलट तो धीरजच्या लहरीपणाचा परिणाम होता. परंतु आज मनोजच्या इच्छेसाठी धीरज पुन्हा एकदा या चंदाला भेटविण्यासाठी तयार झाला, जिला रहस्यमय स्तरांमध्ये लपवून ठेवलं होतं. चंदाच्या नर्सने तिला परत घेऊन जाणं पुरेसा संकेत होता की आता तुम्हीसुद्धा जायला हवं. मनोजने स्मिताला फोन करून सांगितलं की तिला चंदाला भेटणं शक्य नाही. घरी आल्यावर धीरज अगदी गप्प गप्प होता. परंतु स्मिता जेव्हा आपल्या डोळ्यात जेव्हा अनेक मूक प्रश्न घेऊन आली तेव्हा त्याच्या धैर्याचा, सहनशीलतेचा बांध फुटला. ड्राईंग रूममधील सोफ्यावर एखाद्या कापलेल्या झाडासारखा तो कोसळला आणि मग आजपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवलेला त्याच्या जीवनाचा अध्याय उघडा पडला.

“अनेक वर्ष झाली मी स्वत:शीच लढतो आहे.. मी खूप प्रयत्न केला की एखादा तरी तर्क माझ्या बाजूने स्वत:समोर मांडू. परंतु प्रत्येक वेळी मी हरलो आहे. आज मी स्वत:ला तुझ्यासमोर नग्न करतो. म्हणजे कदाचित मला स्वत:ची नग्नता एकट्यानेच बघत राहाण्याच्या वेदनेपासून मुक्ती मिळेल.”

मनोज हतप्रभ होता. चंदाला भेटणं हेच त्याच्यासाठी खूप दुःखदायक होतं. धीरजच्या मनातील धगधगत्या ज्वालेची त्याने स्मिताला डोळ्यानेच खूण करून तिथून जायला सांगितलं. परंतु धीरजने ते पाहिलं आणि तिला थांबवलं. तो म्हणाला, “जेव्हा मी स्वत:चा स्वार्थीपणा आणि चंदाची विवशता समजू शकलो, तोपर्यंत चंदाची स्थिती इतकी वाईट झाली होती की मी तिला माझी आत्मगमानी समजावू शकत नव्हतो. मी पश्चात्ताप करीत होतो परंतु स्वत:समोर स्मितासुद्धा एक स्त्री आहे. पत्नी आहे. तिच्यासमोर मला आपला मूर्खपणा आणि क्रूरता स्वीकार करू दे, कदाचित माझ्या आत धगधगणारी आग थोडी शांत होईल.” यानंतर त्या दोघांच्या होकाराची प्रतीक्षा न करता धीरज बोलू लागला, समजावून सांगणं थोडं कठीण आहे की शहरातील समृद्ध वर्गमित्रांच्या क्रूर चेष्टामस्करीमुळे मी आपल्या कुटुंबाची गरीबी आणि मागासलेपणा बदलाच्या खोल हीन भावनेने त्रासून गेलो होतो. अभ्यासात उत्तम असणंसुद्धा माझ्या मनातील अंधार दूर करू शकत नव्हतं. दीन भावनेच्या अंधारात माझ्या पत्नीच्या सौंदर्याचा एक दीप लावला. परंतु गावातील वातावरणात माझ्याजवळची ही संपदा माझ्या वर्गमित्रांसमोर घेऊन जाणं अशक्य होतं. माझ्याजवळ असं काहीतरी आहे जे तुमच्याकडे नाही हे दाखवू शकलो नाही. चंदावर तर अधिकच रूढीग्रस्त वातावरणाचा प्रभाव होता. मी खूप आग्रह केल्यावरसुद्धा तुझ्यासमोर तिने एवढासा पदर वर केला की तुझे डोळे तिच्या डोळ्यात डोकावू शकले नाहीत. मी खूप निराश झालो. कुठे माझे स्वप्न होतं की माझी पत्नी तुला ईर्षा करण्याची वस्तू वाटेल आणि कसा तिचा व्यवहार की कदाचित तू तिच्या मागासलेपणावर हसावं.” सांगता सांगता धीरज क्षणभर थांबला.

एक घोट पाणी पिऊन त्याने आपलं बोलणं सुरू केलं, “त्यादिवशी तू गेल्यानंतर लहान मुलासारख्या निरागस चंदाला मी समजावण्याचा प्रयत्न केला, तुला माझ्या शहरी मित्रांसमोर आत्मविश्वासाने यायला हवं. परंतु ती एखाद्या गरीब गाईसारखी गप्प राहून माझं दटावणं ऐकत राहिली. ती दुसऱ्यांना काय बघणार माझ्याकडेसुद्धा तिने नजर उचलून बघितलं नाही. निराश होऊन मला वेड लागायची वेळ आली. त्या हताश, कुंठीत आणि हीन भावनेने त्रासून जाऊन मी फुलासारख्या नाजूक चंदावर हात उचलला.’ सांगता सांगता धीरजचे डोळे अश्रूनी भरले.

परंतु अजून बरंच काही सांगायचं होतं, “या घटनेनंतर चंदाने दुःखाने उसासे टाकले नाही की अश्रू गाळले नाहीत. पतीच्या मारण्यामुळे होणारी मानसिक वेदना, कदाचित तिच्या दृष्टीने आश्चर्य वाटावं असं काही नव्हतं. परंतु मी एवढा नालायक नव्हतो की स्वत:च्या एवढ्या मोठ्या अपराधाला क्षमा करू. पश्चात्तापाच्या आगीत मी जळत होतो. बी.एससी., आणि एम.एससी. करीत असताना सुटीमध्ये घरी जायला तिकिटासाठी पैसे नसायचे की चंदाला एखादी भेटवस्तू आणायला माझ्याजवळ पैसे असायचे. ट्यूशन करून थोडे पैसे मिळायचे ते आईकडे पाठवत असे. म्हणजे त्यातून तिने चंदाला थोडंसं शिक्षण द्यावं. परंतु विवाहित स्त्रीने शाळेत जाणं शक्य नव्हतं. स्वत:च्या सुनेला शिकविण्याची कल्पनाच माझे वडील करू शकत नव्हते आणि एखाद्या शिक्षकाने घरी येऊन चंदाला शिकवणं आईला असह्य होतं. स्वतः शिकू शकेल एवढी चंदामध्ये शक्ती नव्हती. संधी न मिळाल्याने ती स्वत:ला शुद्ध भाषेत बोलण्यायोग्यही बनवू शकली नाही. ती फक्त भोजपुरी भाषेत बोलू शकत होती. मला जशी हवी होती तशी चंदा बनू शकली नाही आणि चंदाला त्याची सहज अपेक्षा असेल ते प्रेम पतीकडून मिळू शकलं नाही. मी जेवढा पुढे जात होतो, चंदा तेवढीच माझ्यापासून मागे पडत होती.’

मनोज आणि स्मिता दोघेही अस्वस्थ झाले. ते विचार करीत होते की धीरजच्या इतक्या खाजगं जीवनात डोकावण्याचा त्यांना अधिकार आहे का? परंतु अनेक वर्षांपासूनचा धीरजच्या मनातील दबलेला ज्यालामुखी जागा झाला होता. त्याला थांबविणे अशक्य होते. तो बोलत होता, “विवाहानंतर चंदा आणि मी इतका थोडा वेळ एकत्र राहिलो की आम्ही एकमेकांना अनोळखी वाटायचो. एम.एससी.नंतर मी जर्मनीमध्ये संशोधन करीत होतो. मध्येच कधी तरी भारतात आलो तर गावाला आल्यावर पत्नीचं शरीर बिनतक्रार मिळायचं, परंतु घाबरत घाबरत, जणू तिला माझी भीती वाटायची. आमच्या दोघांमध्ये शरीराशिवाय सेतू बनण्यासाठी काहीच नव्हतं. या अवेळी आणि अनमोल विवाहासाठी आई आणि वडिलांना जबाबदार समजल्यामुळे त्यांच्याबद्दलही माझ्या मनात असंतोष होता. मला हे समजत होतं की आमच्या दोघांमध्ये चंदामुळे दरी निर्माण होत नाहीये. तरीही मी तीन वर्षं चंदाकडे दुर्लक्ष केलं. स्वत:ला वाचविण्यासाठी एवढंच सांगेन की त्या उच्चस्तरीय शोधकार्यात आकंठ बुडाल्यानंतर चंदाचं शरीर एखाद्या युरोपियन मुलीमध्ये शोधण्याची कधीही इच्छा झाली नाही. मी पण केला होता की मी आयुष्यात व्यवस्थित सेटल झालो की माझ्या चंदाला माझ्यायोग्य बनविन परंतु माझ्या आज लक्षात येतं आहे की हे करण्यापूर्वी एकदा त्या बिचारीच्या मनात काय आहे ते विचारायला हवं होतं.’

धीरजच्या कथेला एक महत्त्वपूर्ण वळण मिळालेलं बघून मनोजने उत्कंठेने विचारलं, “तू स्वित्झर्लंड, जर्मनी व फ्रान्समध्ये अनेक वर्ष राहिलास. खूप चांगल्या चांगल्या नोकऱ्या केल्यास, तू चंदासाठी काही करू शकला नाहीस?

धीरजचा आवाज मध्यम झाला. जवळ जवळ कुजबुजत बोलला, “केलं. खूप काही केलं मी. परंतु जे केलं ते सगळं चुकीचं. चंदाला कधी जर्मन तर कधी फ्रेंच भाषा शिकवायला शिक्षक ठेवले. ती थोडीफार, कामचलाऊ बोलण्यापुरती ही भाषा शिकलीसुद्धा. परंतु तिने आपला आत्मविश्वास माझ्या प्रतारणेमुळे गमावला होता. तो मिळवू शकली नाही. नवीन फॅशनचे कपडे आणि दागिन्यांनी मढवून तिला माझ्याबरोबर पार्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती माझ्याबरोबर चालायला शिकेल. परंतु सुरुवातीच्या वर्षांमध्ये पतीप्रेमापासून वंचित राहिलेली चंदा इतक्या वर्षांनंतर आपल्यासमोर उमललेला प्रेमाचा सागर बघून सुखावली नाही. यानंतर मी सर्वांत अक्षम्य पाप केलं. आमच्या चार वर्षाच्या मुलाला एका प्रसिद्ध स्विस बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. मला एकच ध्यास लागला होता की आपल्या मुलाने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचं शिक्षण अशा संस्थेत पूर्ण करावं, ज्याचा त्याला आयुष्यभर अभिमान वाटेल. चंदाचा एकुलती एक संपदा तिच्यापासून हिस्कावली गेली. जगातील सर्वांत महागडं शिक्षण घेतलेल्या माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल कृतज्ञता आहे. परंतु प्रेम नाही. आता तो आपल्या आईकडे, सुरुवातीला मी ज्या तिरस्कृत नजरेने बघत असे तसेच बघतो, बाप-बेट्याच्या जगापासून चंदा अनेक युगं मागे पडली आहे. मुलाकडून प्रेम आणि जवळीक न मिळाल्याचा आघात ‘मी माझ्या कामात बुडून जाऊन थोडासा विसरू शकतो परंतु चंदासमोर कोणताही पर्याय नव्हता. आमच्या कुटुंबाच्या माळेतील सगळे मणी तुटून इकडे तिकडे पसरले. आपल्या एकटेपणाने दु:खी होऊन मी चंदाजवळ येण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिला प्रेमाने, विनवण्या करून, विविध भेटवस्तू देऊन जिंकायचे सगळे प्रयत्न निष्फळ झाले. चोवीस वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या, डोळे भरून न बघितल्याच्या, अपराधाबद्दल जी थप्पड मिळाली होती, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला बघितल्यावर ती आठवण तिच्या मनात वीजेसारखी चमकायची. मग ती आधी काही तरी निरर्थक बोलायला लागायची. जणू त्या दिवशीचं मूक राहाणं सुधारत होती. त्यानंतर स्वत:वरचं नियंत्रण सुटायचं. जणू तिच्या जीवनातील ते निरागस क्षण हिसकावले गेल्याचा ती प्रतिकार करते आहे, जे सुरुवातीला तिच्या पतीच्या हीन भावनेचे बळी ठरले आणि नंतर त्याच्या महत्त्वाकांक्षेचे. ज्या अंधारात मी तिला ढकललं त्यातून बाहेर काढण्यात मी पूर्णतः अयशस्वी ठरलो आहे.

धीरज बोलता बोलता गप्प झाला. मनोज आणि स्मिताही गप्प बसले होते. त्यानंतर त्या दोघांनी कितीवेळा चर्चा केली परंतु या दु:खात कथेचा व्हीलन कोण आहे ते ठरवू शकले नाहीत. धीरजचे आई-वडील, की त्याच्या बालपणीचे क्रूर थट्टा करणारे वर्गमित्र, की त्यांच्या उपहासाने तो खूप दुखावला गेला. तसेच यामध्ये जास्त सहानुभूतीयोग्य कोण होतं? ती बिचारी चंदा आपल्या पतीच्या मनात डोकावून समजू शकली नाही की तो तिच्यात काय शोधीत होता किंवा धीरजला स्वत:ला समजलं नाही की तो चंदामध्ये जे शोधत होता ते त्याच्या मनात जखमी होऊन लपलं होतं.

मूळ लेखक: अरूणेंद्र नाथ वर्मा
मूळ भाषा: हिंदी.
अनुवादिका: डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..