“उंद्याचा काकडा आणि परसादऽऽ….. उंद्याचा काकडा आणि परसादऽऽ…… श्री. दुलाजी कानबा पिनगाळे या भाविक भक्ताचा राहीलऽऽ……! बोला,गोपाल कृष्ण भगवान की जय…..!”
रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.
रामदास काकांनं दोन तिनदा मव्ह नावं लाउड स्पिकरात पुकारलं व्हतं.मनुन मंग मी लयच खुशीत व्हतो.मी काकड आरतीवुन पळतच घरी आलो.म्या मह्या मायलं मव्ह नांव लाउड स्पिकरावर पुकारल्याच सांगतलं.तस तिनबी ते ऐकल्याच सांगतलं.हे सांगतांनी ती बी लयच खुश झाल्याच मलं दिसलं.मलं तं हे करू का ते करू आस झालतं. दुड्डीत रातची शिळी भाकर व्हती.म्या जराक्शी भुरकी चटनी भाकरीवर घेतली.तिलं मंधोमंध बोटानं दिबुन आळं केलं,आन तेलाची बाटली घेतली.तेलाच्या बाटलीत तेलाचा थेंबबी नवता.बुडाल निस्ता गाळ बसला व्हता.मायनं धा पैसे देले आन तेल आन मनली पण मह्याजवळ तेल आणण्या ईतका दम नवता.एक तं पोटात कावळे वड्डत व्हते आन दुसर मंजे मलं उंद्याचे लय कामं दिसत व्हते.मंग म्या मडक्यातुन जराक्स पाणी घेऊन भुरक्या चटनीवर टाकलं आन त्यावर एक मिठाचा खडा ईरघळवला. नेहारीचे दोन घास पोटात जाताच बरं वाटलं.मंग मी पुढच्या तयारीलं लागलो.
काकड आरतीलं शंभरेक लोकं येयाचे त्या हिसाबानं शे सव्वाशे तरी काकडा लागणार व्हता.मंग म्या गावातल्या टेलरायकडं चकरा मारल्या.मुसलमानाचा नजीर मामु मनुन एक टेलर व्हता.म्या त्याच्या मिसणीवर गेलो तं त्यानं मलं आयतच चिंदकायच एक गठुडच देलं.त्याल मायीत व्हतं की कारतीक मह्यण्यात काकडे करायलं चिंदक लागतात मनुन.मंग त्यो कारतीक मह्यण्यात रोजच आंदल्या दिशीच्या चिंदकायच गठुडं बांधुन ठुत आसे.तव्हा आमच्या गावातले मुसलमानबी लय एकोप्यानं राहायचे.काहीजनं तं हींदुयच्या देवायल नवसबी करायचे.ते देवायलं पुंजायचे बी.फक्त कपाळालं कुखु लावायचे नाही.त्याच्या ऐवजी ते गळ्याल गुलाल, कुखु लावायचे.दुसरा एक जानी मामु मनुन व्हता.ते तं काकड आरतीचा परसाद संभाळायचा आन समाप्तीलं सयपाकबी करायचा.म्या एकदा आसच जाणी मामुलं मनलं व्हत की,“मामु तुमच्यात कुखु काऊन लावत नाहीत….!”.तं मंग मलं जाणी मामु मनला की ,“ब्वा आस मंतात की सड्ड्यानं आमचं कुखु पळवुन नेल मुनं लावत नाहीत मनं ”.तव्हा आम्हालं जात-धरम हे भेदभाव माहीतच नवता.मलं आठवलं की मुसलमानायचे पोर्हं सड्ड्या दिसला की त्यालं मारायल पळतात.मनुन मंग मलं जानी मामुचं मननं पटलं.तव्हा मलं ते खरच वाटलं व्हतं.
तं आसं झालं की नजीर मामुनं देलेल्या गठुड्यात पन्नासकच चिंदक निंघाले.मंग म्या दुसर्याबी मिसनी धुंडाळुन चिंदकायची जमवा जमव केली.दुपारी मव्हा लाहना भाऊ नाम्या,आज्या आन म्या ते चिंदकं मांडीवर वळुन त्याचे काकडे केले.काकडे करतांनी चिंदकाचे मंधातुन दोन भाग करून त्यालं हातावर नाय तं पायावर वळावं लागायचं.सुंबाचा पड वळण्यापक्शा हे आवघड जायाचं.एक तं चिंदुक टेरीकाट नाय तं नायलानचं आसायचं.त्यामुळं ते चोपडडक आसायचं.त्यामुळं काकडे वळतांनी हात लय दुखायचे..तरीबी म्या हिरसीनं काकडे वळतच व्हतो.मही त्यादिशी पुजा,आरती आसल्यानं म्या ईचार केला की ब्वा आपुण आपल्यासाठी एक चांगला हाताच्या आकाराचा जाडजुड काकडा करू मनुन. मंग म्या मह्या आज्याकडं हाताएवढ्या आकाराचा मोठा काकडा करून मांघतला.आजानं बी मलं कौतुकानं मोठ्ठा काकडा करून देला.मंग म्या ते समदे काकडे डालड्यात भिजवायलं एका कटुरीत ठुले.मव्हा मोठा काकडा म्या दुसर्या एका कटुरीत भिजायलं ठुला.
आत्ता काकडे झालते.मंग म्या दुकानावुन आरधा किलो साकर्या आणला.दौला माळ्याच्या मळ्यातुन दोन डजेन केळं आन जराशे फुलं आणले.शेजारच्या शेवंतामायकुन दोन तांबे दुध आनलं आन त्याचा परसाद बनवुन म्या एका टोपल्यात ठुला आन दुसर टोपलं तेच्यावर झाकन ठुलं.
मही काकडा आरतीची तय्यारी झालती.मी शेसावुन जाऊन तिन तिनदा ते टोपलं उघडुन खालचे काकडे आन परसाद पाह्याचो.उंद्याची तयारी झालती.आरतीच सामायन काढुन म्या निट परसादाजवळच ठुलं.मव्हा भाऊ तं मह्यापक्शाबी जास्त शेसावला व्हता.त्यानं त्याच्या कपड्यावर तांब्यान ईस्तरी करून कपडे निट घडी करून ठुले व्हते.ईकडं मलं परसाद आन काकड्याकडं पाहात पाहात कव्हा झोप लागली हे मव्ह मलच कळलं नाही.
पहाटं मह्या मायनं मलं जोरजोरानं हलवुन उठवलं.मलं उठु वाटयन गेलतं.मंग माय मनली काकडा आरतीची येळ झालीए.आज आपला काकडा परसाद हाय मनुन.म्या जसयबी काकडा आन परसाद हे आईकलं तसं खाडकन मह्या डोस्क्यात उजेडलं.मही झोप कुठल्ल्या कुठं पळुन गेलती.म्या तसाच आथरूणावरूनच अंगणातल्या ईहीरीकडं पळतं गेलो.तिथल्ला पव्हरा उचलला आन दोनचार पाण्याच्या बादल्या शेंदुन भडं भडं अंगावर वतल्या.झाकतं ईहरीतलं पाणी कोमट कोमट आसते.मह्या अंगातलं चट हिव पळुन गेलतं.म्या तसेच कपडे घातले अन काकडाआरतीच सामायन घेऊन मारोतीच्या देवळाकडं पळालो.मव्हा लहाणा भाऊ मह्या मांघुन लगबगीन संग मंगच येत व्हता.
म्या देवळात गेलो.परसाद काकडे गाभाऱ्यात झाकुन ठुले.काकडा आरतीच्या आंधीचे भजनं चालु व्हते.लोकं एकानी दुकानी देवळाकडं येत व्हते.काकडा आरतीच्या आंधीचे भजन सरत आलते.आत्ता काकड आरतीची येळ झालती.म्या एका पोर्हाजवळ काकड्यायचं टोपलं काकडे वाटायलं देलं.काकडे वाटणार्या पोर्हाजवळ सगळ्यायनं गर्दी केलती.ईकडं देवळात म्या आरतीच ताट चेतवलं आन मह्या लहाण्या भावाजवळ देलं आनं मंग म्या टोपल्यात ठुलेला मोठा काकडा काढला.म्या काकडा हातात घेतला व्हता.मलं लयच थंडगार वाटु लागला.मलं वाटलं डालडा लय थिजला आसलं मनुन मलं तसं वाटत आसलं.म्या आपला आरतीच्या तयारीत मग्न व्हतो.म्या आरती चेतवली.देवळातल्या सगळ्यायनं आपापले काकडे चेतविले.मुडदुंगावर थाप पडली,ईण्याचे तार झनझणले,झांझा,खंजेर्या आन टाळायचा गजर झाला.आन काकड आरतीलं सुरवात झाली.म्या मव्हा काकडा पेटवायलं मनुन हातात धरला आन पेटवायल दिव्याजवळ नेला.तसा फुस्सऽऽ…हं…. फुस्सऽऽ…हंम्म…आसा आवाज आला.एकदम चमकुन म्या काकड्याकडं पाहात व्हतो तं य्ये मोठ्ठा भुजंग मह्या हातात वळवळत व्हता.मलं त्याच्या फडीवरचा आकडा दिसतं व्हता.म्या त्या भुजंगाकडं पाह्यलं तं त्यो बी मह्याकडं जिभल्या बाहीर काढु काढु पाहात व्हता.म्या तं त्या भुजंगाल पाहुन थिजुन एकदम दगडासारका उभा व्हतो.मह्या लाहाण्या भावाच मह्याकडं ध्यान गेलं आन त्यो घायबरून चिरकतच बाहीर पळाला.त्याच्या चिरकण्यानं सगळे भजने आन हाती काकडे घेतलेले पोर्ह एकदम शांत झाले.काय झालं कोणालच कळयन गेलतं.सगळ्यायच्या नजरा मह्यावर पडल्या.सगळे टक लावुन मह्याकडं पाहु लागले व्हते.म्या बारक्या भावाच्या चिरकण्यानं ध्यानावर आलतो.म्या हातातला भुजंग तसाच फेकला.जसाबी म्या त्यो भुजंग फेकला तसं सगळेचजनं दिसल तिकडं पळाया लागले.कोणाचा कोणालं मेळ लागत नवता.तेव्हड्यात रामदास काका मायकावरून बोलले की,“ कोण बी पळु नका,कोणालं काय बि व्हणार नाय….देव आपल्यालं भेटायलं आलता आन भेटुन त्यालं जिथं जायाचं तिथं त्यो गेला.” रामदास काकाच्या या शब्दाययनं सगळे शांत झाले.त्यो भुजंग कोठं गेला हे कोणालच कळलं नाही.राह्यलेली काकड आरती शांततेत पार पडली.
तं एकदाची काकड आरती झाली.परसाद वाटला आन रामदास काका पुन्हा नेहमीपरमानं माईकवर मनले की,“उंद्याचा काकडा आणि परसादऽऽ उंद्याचा काकडा आणी परसादऽऽ ………*****या भाविक भक्ताचा राहील…….बोला गोपाल कृष्ण भगवान की जय……..!”
काकडा आरती झाली.लोक आपापल्या घराकडं जायालं निंघाले.काकड आरती झाली की लोक शिरस्त्यापरमाणं मारोतीच्या देवळापुढच्या महादेवाच्या पिंडीच दर्शन घेऊन घरी जायाचे.जसेबी लोकं महादेवाच्या पिंडीच दर्शन घेयासाठी गेले तं पुढचा देखावा पाहुन सगळे दंग झाले.महादेवाच्या पिंडीभवती त्यो भलामोठा भुजंग येटोळं मारून बसला व्हता.लोकं त्या भुजंगालं पाहुन दुरूनच दर्शन घेऊ लागले.पारावरचं ते चित्तर पाहुन थोड्याच येळात तिथं गरदी जमली.म्या बी भक्तीभावानं महादेव आन भुजंगाच्या पाया पडलो.तेव्हड्यात रामदास काका तिथं आले.भक्तीभावानं ते महादेव आन भुजंगाच्या पाया पडले आन हात जोडुन मनले,“देवा तु आम्हालं दर्शन देऊन धन्य केलं.आत्ता तु जिथुन आला तिथं परत जा.तुव्ह हे आस रूप आमच्या सामान्य मानसालं न कळणारं हे……..तव्हा तुहा हे आशिर्वाद आन तुही कृपा अशिच कायम गावावर राहु दे……! ”
अन रामदास काकानं आपलं मुंडकं महादेवापुढं झुकवलं.मुंडकं उठऊन पाहोस्तोर तं भुजंग एकदम कुठल्ल्या कुठं गायप झालता.देवानं पाठविलेला त्यो पाव्हणा कुठंनं आलता आन आखरीलं कुठं गेला हे कोणालच कळलं नाही…….!
©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली
9405807079
Leave a Reply