१९८२ सालातील गोष्ट आहे. ‘बेताब’ या सनी देओलच्या पहिल्या चित्रपटासाठी नायिका म्हणून, तिची ऑडिशन झालेली होती. नंतर त्या जागी अमृता सिंगची वर्णी लागली. ही हाती आलेली संधी हुकली, तरीदेखील ती आईसोबत मुंबईतच राहिली. १९८४ साली, जे. पी. दत्तांच्या ‘गुलामी’ चित्रपटात, गाणाऱ्या बंजारनची भूमिका मिळाल्यावर तिची खऱ्या अर्थाने कारकिर्द सुरु झाली. तिचं नाव, हुमा खान!!
सलमानच्या, ब्लाॅक बस्टर ‘मैं ने प्यार किया’ चित्रपटातील दूधवालीच्या भूमिकेपासून तिचं फिल्मइंडस्ट्रीत, नाव झालं. तरीही तिच्या वाट्याला आयटम साॅंग व ‘सी ग्रेड’चेच चित्रपट येत राहिले. रामसे बंधूंच्या अनेक हाॅरर चित्रपटांमधून, ती दिसत राहिली.
दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ चित्रपटातही, ती होती. पंधरा वर्षांच्या कालावधीत तिच्या जीवनात फार चढ-उतार आले. तिची आई सोबत होती, तोपर्यंत ती निर्धास्त होती. आई गेल्यानंतर, एकाकी पडली. ती फाॅर्मात असताना तिच्या जीवनात राजू उर्फ अली, हा बदमाश माणूस आला. तो अमेरिकेत हाॅटेल इंडस्ट्रीज मध्ये होता. हुमा त्याच्या जाळ्यात, अलगद अडकली. तो व्यवसायासाठी तिच्याकडे पैसे मागत राहिला. हुमा भविष्याचा काहीही विचार न करता, त्याला पैसे पुरवत राहिली. शेवटी चार वेळा, मोठ्या रकमा दिल्यानंतर, हुमाकडे काहीच शिल्लक राहिली नाही.
हुमाला, अली आता टाळू लागला. दर तासाला येणारे त्याचे फोन, येईनासे झाले. तिने थोडीफार पैशाची जमवाजमव करुन अमेरिका गाठली. तोपर्यंत अलीला ती येणार असल्याची, कुणकुण लागल्याने तो दुबईला पळून गेला. दरम्यान हुमाला असं समजलं की, अली हा तिच्याच चुलत बहीणीसोबत राहतो आहे. हुमा हतबल झाली. अलीला दुबईत जाऊन गाठण्यासाठी, तिच्याजवळ आता पैसे उरलेले नव्हते. तिने चुलत बहीणीशी फोन करुन बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने हुमाला ‘ब्लाॅक’ केलेलं होतं.
हुमा मुंबईला परतली. कफल्लक अवस्था झाल्यामुळे, तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी तिच्या आरिफ खान व जावेद खान या दोन मित्रांनी, तिला त्यातून वाचवलं.
वयपरत्वे चित्रपटात काम मिळणे बंद झाल्याने तिने पुण्याला प्रस्थान केले. घरकाम करायला तिने, एका अल्पवयीन मुलीला ठेवले होते. जीवनात आलेल्या अपयशाचा राग, ती वेळोवेळी त्या मुलीवर काढू लागली. त्या छळाला कंटाळून, त्या मुलीने पोलीस स्टेशन गाठलं. हुमाला त्या केलेल्या चुकीबद्दल, तीन वर्षे तुरुंगवासाची सजा दिली गेली. कसाबसा जामीन मिळवून, काही महिन्यांनी ती तुरुंगातून बाहेर आली.
वाढत्या वयामुळे व डान्स शो बंद झाल्यामुळे तिला जगणे कठीण जाऊ लागले. त्यातच तिला शारीरिक व्याधींनी ग्रासले. ती वारंवार आजारी पडू लागली. मुंबईत येण्याआधी, अनेक पाकिस्तानी चित्रपटात तिने काम केलेले होते. तिला आशा होती की, तिकडून आपल्याला काही मदत मिळेल. पाकिस्तानातील तिच्या बालमैत्रिणीला, जी आता न्यूज अँकर आहे, तिला तिने आपली कर्मकहाणी फोनवरुन सांगितली. तिने तिची मुलाखत पाकिस्तान टीव्हीवर प्रसारित केली. तरीदेखील तिच्या मदतीला कोणीही आलं नाही.
तिच्या पूर्वीच्या मित्रांनी, हुमाला सलमानची भेट घ्यायला सांगितले. ती सलमानला भेटली. सलमानने ‘बीईंग ह्युमन’ च्या माध्यमातून तिला, दरमहा ठराविक रक्कम मिळण्याची व्यवस्था केली. आता ती किमान दोन वेळचे खाऊन, जगते आहे.
अभिनेत्रींनी, मिळकतीच्या काळात भविष्याची तरतूद करुन ठेवली तर, हुमासारखी अवस्था होत नाही. मात्र बहुसंख्य अभिनेत्री, जीवनाच्या उत्तरार्धात हुमासारख्या हतबल झालेल्या दिसतात.
हा हुमा खानचा जीवनपट मांडण्याचे कारण असं की, पस्तीस वर्षांपूर्वी माझा तिच्याशी संपर्क आलेला होता. मी ऑर्केस्ट्राच्या जाहिराती करीत असताना, एके दिवशी वसंतराव दांडगे नावाचे गृहस्थ ऑफिसवर आले. त्यांनी हुमा खानचा डान्स असलेला ऑर्केस्ट्राचा शो आयोजित केलेला होता. त्यावेळी ती फाॅर्मात होती. शो होता, कॅम्पमधील नेहरु मेमोरियल हाॅलमध्ये. शो चा दिवस उजाडला. त्याकाळी पेपरमधील जाहिराती आकाराने मोठ्या असत. सर्व पेपरमध्ये जाहिराती दिल्यामुळे, शो हाऊसफुल्ल झालेला होता. हुमाची उतरण्याची व्यवस्था, ‘हाॅटेल अमीर’मध्ये केलेली होती. शो ला सुरुवात झाली. मध्यंतराच्या आधी दोन व नंतर दोन अशा चार गाण्यांनी तिने पुणेकर रसिकांना, खुष करुन टाकले. मध्यंतरात, तिच्या मेकअपरुमपुढे, उतावीळ बघ्यांनी गर्दी व रेटारेटी केली. शेवटी पोलीसांना बोलावून बंदोबस्त केला गेला. त्यावेळी मी तिचे भरपूर फोटो काढले.
काही महिन्यांनंतर एका आयोजकाने तिचा शो, बालगंधर्व रंगमंदिरात ठेवला होता. त्या शोच्या वेळी तिने केलेल्या अदाकारीने, घायाळ प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले. तेव्हापासून तिचे शो, आयोजित करण्यावर बंदी घातली गेली.
आजच्या हुमाला पाहिलं तर, हीच का ती? असा प्रश्न पडतो. खरंच हुमाच्या जीवनाचं असंच वर्णन करता येईल की, कल चमन था, आज सेहरा हुआऽ. देखते ही देखते ये क्या हुआऽ.
(समीर मित्राच्या पोस्टवर आधारित)
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-६-२२.
Leave a Reply