काचेतून आरपार निघून जाणार्या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं. पण तो पदार्थही किरणांना आरपार जाऊ न देता किंवा शोषून न टाकता आल्या दिशेनं जायला लावील असा असावयास हवा हेही लक्षात आलं. त्यातून मग सुरुवातीला काचेच्या मागे धातूंच्या घासून घासून गुळगुळीत केलेल्या सपाट पत्र्यांचा जोड द्यायला सुरुवात झाली. आता त्या पत्र्यावरून परत फिरणारे किरण वस्तूचं प्रतिबिंब त्या काचेत दाखवू लागले. तरीही ही व्यवस्था तेवढीशी समाधानकारक नव्हती.
कारण सारी किमया त्या पत्र्याचीच होती. तर मग काच कशासाठी वापरायची? यातूनच काचेला परावर्तकाचा मुलामा देण्याची कल्पना पुढं आली. अशा पदार्थांचा शोध घेतला जाऊ लागला. धातूचाच पातळसा थर काचेवर चढवला तर त्यावरूनही किरण परावर्तित होतात हे समजल्यावर तर असा थर चढवण्याचं तंत्र विकसित करण्यावरच भर दिला गेला. त्यातूनच इटलीत व्हेनिस आणि जर्मनीत न्युरेम्बर्ग इथं उत्तम प्रतीचे आरसे तयार होऊ लागले. यामध्ये मुख्यत्वे अॅल्युमिनियम किंवा चांदीचा मुलामा चढवलेला असे. पण या आरशांचा वापर घरांच्या सजावटीसाठीही होऊ लागल्यावर काही ठिकाणी ब्रॉन्झ या मिश्रधातूचा मुलामाही दिला जाऊ लागला. व्हेनिसमधल्या कारागिरांनीच ही कला मग युरोपभर सर्वत्र पसरवली. या आरशांना मग कलात्मक महिरपींची जोडही दिली जाऊ लागली. सुरुवातीचे आरसे बहुधा हातात धरावयाचे असल्यानं त्यांना हॅन्डलची गरज होतीच.
त्यामुळंही या महिरपींना महत्त्व आलं. हस्तीदंत, चांदी, एबनी यांच्या नक्षीदार महिरपी तयार होऊ लागल्या. जाळीदार महिरपींचाही सजावटीसाठी उपयोग होऊ लागला. लाकडाचा उपयोग या चौकटींसाठी त्या मानानं उशीराच होऊ लागला. त्या लाकडांवरही निरनिराळ्या धातूमय रंगांचे थर चढवून त्यांना चकाकी आणण्याचेही प्रयत्न सुरु झाले. आरशांचं महत्त्व वाढत गेलं.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply