आज सकाळीच अंगणात त्यांची –
सभा भरली होती,
विषय बराच क्षुल्लक पण –
ज्वलंत असावा,
म्हणून चर्चाही रंगलेली होती.
सभापतींच्या बोलण्याकडे दुर्लक्षून –
मध्येच कुणी सभात्याग करत होते,
अन् तितक्याच वेगाने पुन्हा –
आसनस्थही होत होते.
तोंडाचा पट्टा मात्र सतत –
सुरू होता दोघांचा……
सत्ताधारी अन् विरोधकांचा.
घसा फोडून सांगत होते काहीतरी –
हुबेहूब आपल्या नेत्यांसारखे.
तसे दिसत होते सगळेच सारखे –
बाहेरून आणि आतूनही, तरी –
सत्ताधारी झुल पांघरलेले आणि –
विरोधकांची पांघरलेले कोण –
हे चटकन ओळखू मात्र येत होतं.
विरोधकांचं पारडं जड होऊ लागलं ,
अखेर प्रकरण हमरीतुमरीवर आलं.
दोघे तिघे टगे काकदार चाल करून गेले –
जराशा उंचावर बसलेल्या कावळ्यावर –
बहुधा सभापती असावा.
क्षुल्लक विषयावरचं सेशन –
बराच वेळ रंगवलं होतं दोघांनी.
मी ही मग घरात आलो –
घोषणा मात्र ऐकू येत होत्या –
एकाच साच्यातल्या,
बहुधा काकंत्रालयाच्या बाहेर –
पायऱ्यांवर बसून दिल्या जात असाव्या.
आवेश तोरा अन् दिखाऊपण मात्र –
अगदी तस्संच होतं.
थोड्याच वेळात सेशन संपुष्टात आलं,
दोघांचीही नेमकी छायाचित्र –
मिळाली असावीत बहुधा.
पुढच्याच काही क्षणात, टुणटुणत –
एका मेल्या उंदराच्या मेजवानीवर दोघेही –
हसत कावकावत चोचीने ताव मारत होते…..
सत्ताधारी अन् विरोधकही…….
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply