नवीन लेखन...

काळा फळा…

माझी आई सातारा तालुक्यातील धनवडे वाडीत इयत्ता तिसरी पर्यंत शिकली. १९४० सालामध्ये तिचे वडील तिला शाळेत पाठवायला तयार नव्हते, तरीदेखील तिने शाळेत जाणे सोडले नाही. मंदिरात भरणारी शाळा, मोजकीच मुलं. खुर्चीवर ठेवलेला काळा फळा. मुलांच्या हातात पाटी देण्याची, तेव्हा पालकांची ऐपतही नव्हती. धुळाक्षरे काढून शिकवले जाई. म्हणजे माती पसरुन त्यावर बोट फिरवून मुळाक्षरे शिकविली जात असत.

खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत.

शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो.

पाचवीसाठी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडमध्ये प्रवेश घेतला आणि पहिल्या दिवसापासून मी फळ्याच्या सानिध्यात आलो. मी वर्गात फळ्यासमोरच्या पहिल्याच बाकावर बसायचो. मोठा भाऊ याच शाळेतून शिकल्यामुळे त्याच नावडकरचा हा धाकटा भाऊ आहे, हे सर्व शिक्षकांना माहीत होते.

पाचवी ‘ब’च्या वर्गाला इंग्रजी शिकवायला फडके सर होते. काळी टोपी, पांढऱ्या सदऱ्यावर काळा कोट, खाली धोतर व पायात चपला. सरांनी मला पहिल्या दिवसापासून फळा डस्टरने स्वच्छ पुसून, पट्टी वापरुन खडूने आडव्या रेघा मारण्याचे काम सोपविले. मी रोज ते काम उत्साहाने करीत असे.

मराठीच्या सरांनी मला रोज एक सुविचार फळ्यावर लिहायला सांगितले. मी खुर्चीवर उभा राहून सरांनी दिलेले सुविचार रोज लिहित असे. शाळेच्या तळमजल्यावरील गोलाकार भिंतीवर दैनंदिन सूचना लिहिण्यासाठी तीन चौकोनी फळे होते. पालखीच्या दिवशी माझे चित्रकलेचे म. द. वारे सर मला त्या फळ्यावर रंगीत खडूने ज्ञानेश्वर, तुकारामांचे चित्र काढायला सांगत. १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला झेंडावंदनचे, आषाढी एकादशीला विठ्ठलाचे चित्र काढायला सांगत असत. मी देखील उत्साहाने माझी कला वर्षभर दाखवत असे.

सातवीला गेल्यावर मी वहीत काढलेली हृदयाची आकृती पुस्तकातील आकृती सारखीच अचूक आलेली पाहून बाईंचा विश्र्वास बसला नाही, त्यांनी मला तीच आकृती फळ्यावर काढायला लावली. मग त्यांचा, माझ्या चित्रकलेवर विश्र्वास बसला.

शाळेतले एक सर वर्गावर येताना नेहमी डस्टर आणायला विसरायचे. मात्र त्यांनी त्यासाठी शिकविणे थांबविले नाही. ते खडूने लिहून झाल्यावर ते पुसण्यासाठी शर्टाची बाही वापरत. तास संपल्यावर त्यांची बाही पांढरीफटक झालेली दिसे.

पाचवी ते नववी पर्यंत वर्षातून काही दिवस पाठ घेणारे शिक्षक, शिक्षिका वर्गावर यायचे. ते येताना गुंडाळीचा फळा घेऊन यायचे. त्यांचे शिकविणे पाहण्यासाठी दोन अधिकारी वर्गातच मागील बाकावर बसायचे. ते शिकाऊ शिक्षक एखाद्या धड्यावरचा पाठ घ्यायचे. ते कसे शिकवितात? विद्यार्थ्यांशी कसे वागतात? यावर ते अधिकारी शेरा देत असत. वर्गातील काही व्रात्य मुलं अशावेळी गोंधळ करीत असत. असे बरेच गुंडाळफळीचे पाठ अजूनही माझ्या लक्षात आहेत..

दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या सर्व वर्गातील फळे काळा रंग देऊन नवे केलेले दिसायचे. ते वयच असं होतं की, सर किंवा बाई जे फळ्यावर लिहायचे…ती अक्षरं, आकडे स्मरणात कायमस्वरूपी रहायचे… त्यामुळेच त्या काळातील कविता, धडे अजूनही लक्षात आहेत. दहावी, अकरावी झाल्यावर मी महाविद्यालयात गेलो.

बीएमसीसी मधील फळे हे हिरव्या जाड काचेचे होते. त्या स्मूथ फळ्यावरुन हात फिरवताना तो स्पर्श हवाहवासा वाटायचा. हे फळे शाळेपेक्षा मोठ्या आकाराचे होते. या फळ्यावरुन शिकवलेल्या बॅलन्सशीटच्या दोन्ही अमाऊंट्स‌ सारख्या यायच्या, त्यावेळी शिकविणारे अलुलकर सर मला जादूगार वाटायचे. महाविद्यालयात माझा फळ्याशी संपर्क आला नाही.

काॅलेज झालं. फळ्याशी नातं दुरावलं. व्यवसायात श्रीप्रकाश सप्रे हे नाट्य कलाकार कामानिमित्ताने भेटले. त्यांचं स्टेशनरीचे दुकान होतं. माझा मुलगा विजय, हा पहिलीच्या वर्गात शिकत होता. सप्रे यांचेकडून घरी भिंतीवर लावण्यासाठी दोन बाय दोन फूटचा लाकडी फळा खरेदी केला. त्या फळ्यावर अनेकदा त्याने गणितं सोडवली, कविता लिहिल्या, प्रश्नोत्तरे सोडविली. मी रोजच त्यावर तारीख व वार लिहित असे. सणांच्या दिवशी चित्र काढत असे. विजयची दहावी होईपर्यंत त्या फळ्याने साथ दिली.

बाजारात आता पूर्वीसारखे काळे गुंडाळफळे कोणी खरेदी करीत नाही. आता व्हाईटबोर्डची क्रेझ आहे. अॅल्युमिनियमची प्रेम असलेले व्हाईट बोर्ड लहान आकारापासून मोठ्या सहा बाय आठ फूटच्या साईजपर्यंत मिळतात. त्यावरचे मार्कर लाल, काळ्या, हिरव्या व निळ्या रंगात मिळतात. लिहिलेला मजकूर डस्टरने सहज पुसता येतो. क्लासेसमध्ये आता जुने फळे जाऊन हेच बोर्ड वापरले जात होते.

आता टेक्नाॅलाॅजी फार पुढे गेली आहे. आता डिजिटल बोर्ड निघाले आहेत. त्यावरुन शिकविले जाते. एके काळच्या ‘काळा फळा’ आता इतिहासजमा झाला आहे…

मी मात्र घरी छोट्या व्हाईट बोर्डवर रोज तारीख व वार न चुकता लिहित असतो…कारण मला अजूनही फळ्यावर लिहायला आवडतं…ते लिहिल्यानं
माझ्यातल्या ‘सुप्त शिक्षका’ला एक प्रकारचं मनस्वी समाधान मिळतं….

© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४

१४-५-२१

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..