|| हरि ॐ ||
विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.
१) पूर्वी नदीकाठी माणसाने आपल्या वसत्या केल्याने पाण्याचा प्रश्न आपोआप सुटला. कालांतराने नदी आटली मग विहिरी व तलाव बांधले गेले. लोकसंख्या वाढल्याने खेड्याचे गावात आणि गावांचे शहरात रुपांतर झाले आणि पाणी भरण्यासाठी विहिरी जाऊन नळावाटे पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये आलं. कित्येक मैल उन्हाताहानात लांबून पाणी भरण्याची कटकट गेली व विहिरीतून रहाटाने पाणी काढणे थांबले. याने पाठ, कंबर व गुडघ्यांचे व्यायाम बंद झाल्याने दू:खणी सूर झाली.
२) चुलीवर स्वयंपाक कारणे, कमरेत वाकून जेवण वाढणे बंद झाले तसेच सर्व प्रकारची घान्ये व भाज्या जमिनीवर बसून निवड टिपण्याच्या गावंढळ वाटणाऱ्या सवयी बासनात बांधल्या गेल्या. आता उभ्याचा ओटा, टेबल खुर्चीवर बसून जेवणाच्या पद्धती आल्याने कंबर, पाठ व गुडघ्याचा व्यायाम कमी झाले संबंधित दुखणी बळावली. ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांवर कंबर, पाठ, गुडघे व टाचा यांच्या व्याधीत वाढ झाली कारण वरील सर्व पद्धतीत दिवसातले बरेच तास उभे राहिल्याने तसेच ट्रेनचा उभाराहून प्रवासाने यात आणखीनच भर पडली.
३. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घरातील सर्व कामे सकाळच्या घाईगडबडीत करणे जमत नसल्याने कपडे घुण्यासाठी वाशिंग मशीन आले व हाताने कपडे घुण्याची सवय मोडली आणि कंबर, पाठ गुडघा व टाचांना व्यायाम मिळत होता तोही गेला किंवा कमी झाला आणि वरील सर्व दुखणी सुरु झाली.
वरील मुद्यांचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ अजून आहे, ती गेली तर गुलामगिरीतून सुटका नाही.
जगदीश पटवर्धन
वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply