तसे पहायला गेलो तर आपल्याला ईश्वराने दोन डोळ्यांची मोठी देणगीच दिलीय. डोळ्यांमुळे आपण सृष्टीचे सौंदर्य पाहू शकतो. या सुंदर अशा जगाचा डोळ्यांनी आस्वाद घेऊ शकतो. विविध रंगाची फुले पाहु शकतो, त्यांचे सौंदर्य अनुभवू शकतो. सूर्य-चंद्राची मोहकता अनुभवू शकतो. चांदण्यांची शितलता अनुभवतो. समुद्राची अथांगता पाहु शकतो, गगनात भिडणारी हिमायलयाची विशालता अनुभवू शकतो. एक ना अनेक गोष्टी आपण डोळ्यांव्दारे पाहु शकतो. पण या पाहण्याला मर्यादा आहेतच.. कशा.. आपण काळाच्या पल्याड पाहु शकत नाही. काळाचा पडदा बाजुला सारून पाहण्याची दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाहीय. जर तशी दृष्टी आपल्याकडे राहिली असती तर…काळाचा पडदा बाजुला सारून आपल्याला पाहता आले असते तर अनेक घटनांचे आकलन आधीच झाले असते नाही का? चांगल्या वाईटाचे भान आल्यामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या घडल्या असत्या नाही का? पुढच्या क्षणाला काय होणार आहे, हे जर कळले असते तर सृष्टीच्या चलनात, मानवाच्या जीवनात खुप काही फरक पडला नसता काय? निश्चित पडला असता. पण त्या नियंत्याने मानवाची रचना करताना काळाच्या पल्याड पाहण्याचे हे दिव्यत्व स्वत:जवळ का राखुन ठेवले असावे… हे काही केल्या कळत नाही. आपण सारी या पृथ्वीतलावरची सामान्य माणसं. मोठ्या अभ्यासाने, ध्यान-धारणेतून काळाच्या पल्याड पाहण्याचे कौशल्य प्राप्त होऊ शकते. अर्थात हा सारा विषय आपला नाही… आपण फक्त काळाचा पडदा बाजुला सारून पाहता आले असते तर किती बरे झाले असते नाही.. का? मानवी हव्यासामुळे पुढच्या क्षणाला घडणाऱ्या घटनांचे आकलन आपल्याला झाल्याने सर्व अनिष्ट घटना आपल्याला टाळता आल्या असत्या….
पुढच्या क्षणाला होणाऱ्या घटना आधीच समजल्याने आपण युद्ध टाळू शकलो असतो का..? आपण महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार टाळू शकलो असतो काय..? अगदी काल-परवा झालेला धुळे जिल्ह्यात झालेला जमावाच्या हल्ल्याची भिषण घटना टाळू शकलो असतो का..? अशा कितीतरी अप्रिय घटनांना आपण निर्बंध घालू शकलो असतो….
पण
महाभारतातला हा छोटासा प्रसंग.. पांडवांची सभा भरली होती. राजा युधिष्ठीराच्या समोर.. एक याचक येऊन उभा राहिला.. दान मागण्यासाठी.. पण युधिष्ठीराने त्याला उद्या सकाळी येण्यास सांगितले. त्यावेळी शेजारी बसलेल्या भिमाने शंख फुंकायला सुरवात केली. त्यावर युधिष्ठानं त्याला अवेळी शंख फुंकण्याचे कारण विचारलं. त्यावर भिमानं उत्तर दिलं.. ‘दादा तू त्रिकालबाधित आहेस, काळाच्या पल्याड पाहू शकतोस. पुढच्या क्षणाला काय होणार आहे, हे मी जाणू शकत नाही, त्या याचकाला तू चक्क उद्या येण्याविषयी सांगतो आहेस.. ते कोणत्या भरवशावर’….
काळाचा हा पडदा इतका गडद, गहिरा आहे, पण तो न दिसणाराही आहे… आपण उद्या कधीच पाहू शकत नाही.. ओशो रजनीश म्हणतात, ‘आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हे कल थी…!’
– दिनेश दीक्षित.. (३ जुलै २०१८)
Leave a Reply