डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो…१
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण…२
फुलांमधला रस शोषतां, फूल पाखरू नाचते
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते…३
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला…४
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते…५,
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ …६
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply