एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply