नवीन लेखन...

काळजी

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका …

मानवी शरीर हे मानव प्राण्याला मिळालेले एक उत्कृष्ट वरदान आहे. आरोग्य ही जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे आणि हे आरोग्य मिळविण्यासाठी जीवनात मनःस्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. एकदा मनःस्वास्थ्य बिघडले की जीवनाला काहीच अर्थ उरत नाही, जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. परंतु प्रत्यक्षात मात्र लोक आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवितात. बिघडलेले आरोग्य पुन्हा वळणावर येणे कठीण होऊन बसते.
 
मनःस्वास्थ्य आपोआप निर्माण होत नाही किंवा मिळत नाही. मनःस्वास्थ्य म्हणजे नेमके काय व ते मिळविण्याचा नेमका मार्ग कोणता ? हे माणसाला ज्ञात झाले पाहिजे. भरपूर पैसे मिळविला किंवा मिळाला म्हणजे मनःस्वास्थ्य मिळेल असा बहुसंख्य लोकांचा भ्रम असतो. मानवी जीवनात पैशाला इतके महत्व दिले गेलेले आहे की, पैसे हेच माणसाचे सर्वस्व होऊन बसलेले आहे. पैशासाठी माणसे अक्षरशः पिसी होतात आणि त्यासाठी स्वतःला जीवनात हरवून बसतात. पैसा ही लक्ष्मी नसून ‘शांती’ ही खरी लक्ष्मी आहे. सुखसोयी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य जरी पैशात असले तरी सुखशांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो.
 
सूक्ष्म दृष्टीने पहिले तर सर्वसाधारण माणसाचे सुखाविषयीचे अज्ञान प्रचंड असते. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ प्रचंड अज्ञान आहे याचे सुद्धा माणसाला ज्ञान नसते. ‘मनासारख्या सर्व गोष्टी घडत रहाणे’ याला सर्वसामान्य माणसे भाग्य असे म्हणतात. परंतु मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी संख्येने अधिक असल्यामुळे सामान्य माणसे स्वतःला दुर्भागी समजतात. म्हणून खरे भाग्य नेमके कशात आहे हे समजणे आवश्यक आहे. खरे भाग्य मनासारख्या घटना घडण्यात नसून, वाकड्या आणि चंचल मनाला सरळ, सारखे व स्थिर करण्यातच माणसाचे खरे सौभाग्य आहे.
 
जीवनाच्या प्रवासात माणसाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना सामोरे जावेच लागते. सामान्य माणसे यशाने हुरळून जातात तर अपयशाने होरपळून जातात. ‘काळजी करणे’ हा माणसाला जडलेला एक रोग आहे. काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तरी आणि नसली तरी, माणूस काल्पनिक भयगंडाच्या आहारी जाऊन काळजी करीत बसतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो त्याप्रमाणे काळजीरूपी भुंगा माणसाचे जीवन पोखरीत असतो. म्हणून काळजी घ्यावी अवश्य, पण काळजी करू नये मुळीच. भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता या दोन्ही बाजूला सारून जो केवळ वर्तमानकाळात स्थिर राहतो तो स्थितप्रज्ञ.
 
हव्यास, हाव, वासना रुपी मायेने जीवाला जोपर्यंत जखडून टाकले आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने जीवाला स्वानंदाचा सण साजरा करता येणार नाही. वासनेचे व्यक्त रूप म्हणजे हाव व जेथे हाव आहे तेथे धाव आलीच. माणसाचे जीवन ‘हाव आणि धाव’ यांच्या कात्रीत सापडले आहे आणि म्हणूनच माणसाने जीवनभर कितीही यातायात केली आणि धावाधाव केली तरी त्याला सुख, शांती, समाधान प्राप्त होत नाही.
 
विचार व विकार, संकल्प व विकल्प, कल्पना व भावना अशा तऱ्हेचे रंगी-बेरंगी धागे आपल्यातूनच निर्माण करून त्या धाग्यांनी विणलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वतःच अडकतात ते बद्ध आणि दुःखी राहतात, तर याउलट जे या जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार व व्यवहार करतात तेच मुक्त आणि सुखी जाणावेत.
 
प्रयत्नाला पर्याय नाही हे माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. वाईट म्हणून जे काही आहे ते कष्ट केल्याशिवाय पदरात पडते. परंतु चांगले म्हणून जे काही आहे ते मात्र केवळ प्रयत्नसाध्यच असते. ज्या गोष्टी माणसाच्या हातात नसतात त्याबद्दल काळजी, चिंता, दुःख करीत वेळ वाया घालविण्यापेक्षा ज्या गोष्टी त्याच्या हातात असतात त्यासाठी सतत प्रयत्नरत राहणे माणसाच्या हिताचे असते. प्रयत्न करून माणसाला यश मिळणे हा नियम असून प्रयत्न करूनही त्याला अपयश मिळणे हा अपवाद आहे. म्हणून अपवादालाच नियम समजून प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे सर्वस्वी चुकीचे व अहिताचे आहे.
 
जीवन जगणे ही फार मोठी कला असून ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुंदर, सुरेख, सुखावह व सुसह्य होणे शक्य नाही. परंतु सामान्य माणसांना जीवन जगणे ही कला आहे हे ज्ञात नसल्यामुळे ते दैवाधीन होऊन जीवनाचा गाडा कसातरी ढकलत असतात.
 
न थांबता, न हारता, न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबसुद्धा हार मानतं. जो पर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयात ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण आपलाच आहे. आपण जगत असतो तो एकमेव क्षण आपल्या हातात असतो. आयुष्य तर कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. कारण आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका …
 
 
 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..