“तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही …
बेसूर वाटता वाटता , सूर कधी जुळले .. कळलेच नाही …
हळुवार नाजूक स्पर्शाची , मिठी कधी झाली .. कळलेच नाही …
एकमेकांच्या प्रीतीच्या डोहात , आकंठ कधी बुडाले .. कळलेच नाही …
नाकावरच्या रागाला, औषध कधी गवसले .. कळलेच नाही …
समुद्राच्या वाळूतले पावलांचे ठसे , सप्तपदी कधी झाल्या .. कळलेच नाही …
लपवाछपवीत रचलेले अनधिकृत इमले , अधिकृत कधी झाले .. कळलेच नाही …
तुझा माझा दोघांचा संसार , कधी सुरू झाला .. कळलेच नाही …
महिने लोटले ,वर्ष सरलं, अन अचानक दिवस कधी गेले .. कळलेच नाही …
बघता बघता ,दोन फुल आणि दोन हाफ झालो.. कळलेच नाही …
शाळेच्या आठवणीत रमता रमता, पालकसभा कधी आली .. कळलेच नाही …
आपल्या ध्येयाचा आढावा घेता घेता , मुलांची ध्येय्य दिसु लागली .. कळलेच नाही …
तो परदेशात अन ती संसारात, कधी गुरफटले .. कळलेच नाही …
सगळा प्रवास करून, गाडी पुन्हा त्याच स्टेशनात कधी आली .. कळलेच नाही …
एकमेकांच्या गप्पात आता “”गुडघेही”” बोलू लागले .. कळलेच नाही …
मिठीतुन बाहेर पडत, मठात कधी रमू लागले .. कळलेच नाही … ..
छान आवरून झाल्यावर धरलेला हात, आता “”सावरून”” घेणारा आधार कधी झाला …. कळलेच नाही …
आयुष्यात आलेले आपले-परके, साथ सोडून कधी गेले .. कळलेच नाही …
पण तू आणि मीच शेवटपर्यंत , एकसंध , हे मात्र इतरांना ….. कधी कळलेच नाही….
तक्रार करता करता प्रेम कधी झाले .. कळलेच नाही …
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply