नवीन लेखन...

कलामहर्षी बाबूराव पेंटर

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला.

दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत!

बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते.

कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली.

‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या. बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’,‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत.

आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली.

बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.

संदर्भ :- इंटरनेट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..