हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगीसंगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे – मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. “तेरी दुनिया मे दिल लगता नही”, “कहा हो तुम” ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या “मै दिल हुं एक अरमान भरा” या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. “बार बार तोहे क्या समझाये” किंवा “झीलामील तारे करे इशारा” ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. “सलामे आली हसरत कबूल कर लो” आणि “मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है” ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. “बहारो ने मेरा चमन लूटकर” या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.
“मैने शायद तुम्हे” या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण “सम” म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम “निराघात” आहे. “शायद” या शब्दातील, “य” अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत.”कही तो मिलेगी”, “सखी रे मोरा मन”, “वो चले आये रे” ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. “हम इंतजार करेंगे”,”छा गये बादल”,”पाव छु लेने दो” ,”छुपा लो युं दिल मे प्यार” इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), “बता दो कौन गली (तिलंग), “मदभरी अंखीयां” (जौनपुरी) किंवा “गरजत बरसत” (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, “सलामे हसरत”,”गमे हस्तीसे बस बेगाना”,”वळला क्या बात”,”युं अगर मुझको ना चाहो तो” ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.
“कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. “अगर ये दिल” (घर घर मे दिवाली),”ना तो कारवां की तलाश” (बरसात की रात), “निगाहें मिलाने को” (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. “निगाहें मिलाने को” या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या “रे” वरून एकदम अचूक वरचा “रे” घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
“तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे”
— अनिल गोविलकर