श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे.
आचार्यांनी या अत्यंत रसाळ स्तोत्राची रचना ‘तूणक’ (र ज र ज र) वृत्तात केली आहे.
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १
मराठी- ज्याचे पवित्र चरण कमल देवांचा राजा इंद्र पूजितो, जो जानवे म्हणून सर्पाचा वापर करतो, ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे, जो सर्वांवर कृपा करतो, नारद इत्यादी मुनींचा समूह ज्याला प्रणाम करतो, दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
इंद्र पाद-नीरजां पवित्र नित्य पूजितो
चंद्रचूड, सर्प जानवे, विवस्त्र घालितो ।
काशिका नृपास नारदादि सर्व वंदिती
मी करीतसे प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०१
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥२॥
मराठी- ज्याचे तेज कोट्यवधी सूर्यांसारखे आहे, जो भवसागरातून पलिकडे तारून नेतो, ज्याचा गळा निळा आहे, जो इच्छिलेल्या गोष्टी प्रदान करतो, ज्याला तीन डोळे आहेत, जो काळाचाही काळ आहे, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ज्याचा त्रिशूल हा विश्वाचा कणा आहे, जो अक्षय आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
कोटि सूर्य, -हास ना, भवात नेत तारुनी
इष्ट दे, गळा निळा, सरोज नेत्र हो तिन्ही ।
अंतकास अंत, विश्व-आस शूळ संगती
काशिका नृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०२
शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥३॥
मराठी- आपल्या हाती भाला, परशू (कृपाण,कु-हाड), दोरीचा फास, दण्ड घेतलेल्या, विश्वाच्या आरंभाचे निमित्त असलेल्या, सावळ्या रंगाच्या, अविकारी, सर्व रोगांच्या पलिकडे असणा-या, प्रचंड पराक्रमी, अद्भुत् तांडव नृत्य ज्याला आवडते, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
सृष्टिकारका-करी कु-हाड फास शूल ही
दण्ड, आद्य देव, तांडवा करी अनोळखी ।
सावळा, निकोप, वीर दांडगा, प्रजापती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०३
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥४॥
मराठी- उपभोगाची साधने उपलब्ध करून देणारा, मोक्ष देणारा, पवित्र व मोहक रूप असलेला, भक्तांबद्दल ममत्व बाळगणारा, सकल विश्वात आस्तित्व असणारा, विविध मंजुळ आवाज करणारी छोटी सुंदर सुवर्ण घंटा ज्याच्या कमरेवर झळकते, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
भोग्य वस्तु, मोक्ष दे, सुरेख भव्य आकृती
प्रेम दे उपासकां, समस्त विश्वसंगती ।
घंटिका कटीवरी सुवर्ण नाद गुंजती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०४
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥५॥
मराठी- जो धर्माच्या प्रस्थापित संस्थांचा रक्षक आहे, तसेच अधर्माच्या वाटेचा नाश करतो, जो (जन्मोजन्मीच्या) कृत्यांच्या पाशातून मुक्तता करतो, जो नाथ (आत्म्यासाठी) मोठा आनंददायक आहे, सोनेरी रंगाच्या नागांच्या वेटोळ्यांनी जो शोभिबंत दिसत आहे,जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
धर्म तत्व राखतो, अधर्म वाट रोखतो
मोद दे मनास नाथ, कर्मबंध तोडतो ।
शोभिवंत अंग जै सुवर्ण नाग वेढिती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०५
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥६॥
मराठी- ज्याची दोन्ही पावले रत्नजडित पादुकांच्या तेजाने सुंदर दिसत आहेत, जो अनादि अनंत एकमेव असा निष्कलंक देव आहे जो मृत्यूचा अहंकाराचा व अभिमानाचा नाश करतो आणि जो आपल्या भयानक दातांनी या भीतीपासून मुक्तता देतो, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
पावली सुरेख तेज रत्नयुक्त पादुका
एकमेव निष्कलंक नित्य इष्ट देवता ।
तीक्ष्ण दात मृत्यु-भीति मृत्यु-गर्व भेदिती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०६
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥७॥
मराठी- ज्याच्या विकट हास्याने ब्रह्मांडाचा समूह विदीर्ण होतो, दृष्टिक्षेपाने पातकांचे जाळे नाश पावते, ज्याचे शासन कठोर आहे, जो (भक्ताला) अष्टसिद्धी प्रदान करतो, ज्याने मुंडक्यांची माळ घातली आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
रौद्र हास्य कारणे विदीर्ण विश्व होतसे
पाप नाश दृष्टिनेच, शासनी कठोरसे ।
आठ सिद्धि दान दे, गळ्यात मुंड माळ ती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०७
टीप- अष्ट सिद्दींचे वर्णन संस्कृत श्लोकात असे केले आहे.
अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा । प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्टसिद्धयः ॥
अर्थ – अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या सिद्धींना “अष्टसिद्धि” म्हणतात. सिद्धी म्हणजे तप आणि साधनेच्या द्वारे प्राप्त होणा-या पारलौकिक आणि आत्मिक शक्ती.
१. अणिमा – आपले शरीर एका अणु इतके लहान करण्याची क्षमता
२. महिमा – शरीराचा आकार अत्यन्त मोठा करण्याची क्षमता.
३. गरिमा – शरीर अत्यंत वजनदार बनविण्याची क्षमता.
४. लघिमा – शरीर वजनरहित करण्याची क्षमता.
५. प्राप्ति – कोणत्याही अडथळ्याविना कोठेही जाण्याची क्षमता.
६. प्राकाम्य – आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता.
७. ईशित्व – प्रत्येक वस्तु आणि प्राणीमात्रावर पूर्ण अधिकार गाजवण्याची क्षमता.
८. वशित्व – प्रत्येक प्राण्याला वश करण्याची क्षमता.
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥८॥
मराठी- भुतांच्या गटांचा प्रमुख असणारा, जो महान नावलौकिक प्राप्त करून देतो, काशी नगरीत रहाणा-या जनांच्या पाप आणि पुण्याचा न्यायनिवाडा करतो, जो योग्यायोग्यतेच्या वाटेवरील व्युत्पन्न पंडित आहे, जगाचा चिरंतन स्वामी आहे, जो काशी नगरीचा अधिपती आहे, अशा कालभैरवाची मी आराधना करतो.
भूतसंघ मुख्य, दे महान नावलौकिका
सार्वभौम, न्याय दे जनां पुरात काशिका ।
योग्य वाट जाणकार, नित्य जो जगत्पती
काशिकानृपा प्रणाम कालभैरवाप्रती ॥ ०८
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥९॥
मराठी- जे या मनोहर, ज्ञान व मोक्षाचे साधन असणा-या, अपूर्व पुण्य वाढवणा-या, दुःख, मोह, दारिद्र्य, राग यांचा त्रास नष्ट करणा-या कालभैरवाष्टकाचे पठण करतात, ते जन कालभैरवाच्या चरणांजवळ निश्चितच पोहोचतात.
जे सुरेख स्तोत्र गात मोक्ष ज्ञान साधना
दुःख मोह राग लोभ क्लेश त्रास नाशना ।
आठ श्लोक गान जे अपूर्व पुण्य वाढवी
कालभैरवा पदी जना खचीत पोचवी ॥ ०९
। इति श्री कालभैरवाष्टकं सम्पूर्णम ।
—— ——
— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
मनापासून धन्यवाद गुरुदेव … आपल्या सारखि
विद्वान आज ही मराठी समाजा मधे आहेत हे महाराष्ट्राचे सौभाग्य आहे
धन्यवाद गुरुजी.
सर महिषासुरमर्दिनी स्तोत्रचे भाषांतर आहे का?
श्री आदि शंकराचार्य कृत स्तोत्र आहे
‘अयिगिरीनंदनी….’
हे स्त्रोत्र वाचनाने अशांत मन शांत होते, मनाला शांती मिळते आणि मन सकारात्मक विचार करू लागते .आणि सर्व काही चांगलेच घडेल ही शास्वतीच वाटते म्हणून स्त्रोत्र खुपच प्रभावी वाटते.
खुप खुप धन्यवाद गुरूजी.
खूप छान गोड आवाजात कालभैरव अष्टक व तसेच छान अर्थासह त्याचे अर्थपूर्ण विश्लेषण , माहिती
Sunder ..man ekdam Shanta zhala
khup chan ahe anuvad ani arth
अप्रतिम.. खूप छान भाषांतर आहे.. जेंव्हा अर्थ कळतो स्तोत्र आपोआप पाठ होतात.. धन्यवाद गुरुजी..
प्रसाद कुलकर्णी
Khup chhan ??????
Khup sundar…….
अप्रतिम |पुन्हा पुन्हा ऐकत असतो
माझ्यासारख्या सामान्य माणसाला
(ज्याला संस्कृत भाषेमध्ये गती नाही
आणि आपल्या धर्मांविषयी
अगदी बेताचेच ज्ञान आहे),
पंडित धनंजय बोरकर यांचा
संस्कृतचा व्यासंग, त्यांचा काव्याचा
आणि संगीताचा सखोल अभ्यास,
आणि त्यांच्या स्नुषेचे मधुर आणि
सुस्पष्ट उच्चारातील गायन म्हणजे
आपल्या संमृध्द संस्कृतीशीबरोबर
पुन:श्च संधान स्थापन करण्याची
एक सुवर्णसंधी नव्हे काय?