“त्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…”
लहानपणापासूनच अंकुशला वेगवेगळ्या पोझेस मध्ये फोटो काढुन घेण्याची व पाहण्याची आवड होती. स्वत:ला “कॅमेराबध्द” करता करता त्याला जाणवलं की आपण जे काही करतोय ते प्रिंट मॉडेलिंगशी निगडीत आहे. सोबत उत्तम चेहरा अणि लुक्सची जन्मत:च देणगी मिळाल्यामुळे मॉडेलिंगचं क्षेत्र अंकुशला खुणावू लागलं. याच दरम्यान त्याला अभिनयाची देखील आवड निर्माण झाली. “या क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी घरुन विरोध होता, पण त्यावेळी मी माझ्या एका प्रोजेक्टची क्लिपींग घरच्यांना दाखवली. तेव्हा काही प्रमाणात त्यांना विश्वास ठेवावा लागला. मॉडेलिंग किंवा अॅक्टींग मध्ये कारकिर्द घडवायची असेल तर मुंबईत येण्यावाचून गत्यंतर नाही असं वाटल्यामुळे त्यावेळी महानगरिचा मार्ग गाठला. त्याआधी मी बेंगळुरूच्या “मित्रसंघमा फिल्म इन्स्टीट्युट” तसंच “विजय फिल्म इन्स्टीट्युट” मधुन अभिनयाचं प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं. त्यामुळे या माध्यमात कसं वावरायचं याची कल्पना मला मिळाल्याचं” अंकुश सांगतो.
मुंबईत दाखल झाल्यानंतर अंकुश पाटीलचा सुरु झाला, मॉडेल तसंच अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठीचा स्ट्रगल. मग फोटो सेशन्स, पोर्टफोलिओ प्रॉडक्शन हाऊसकडे सादर करणं हे देखील ओघाने आलंच. अनेकदा अंकुशला रिजेक्शनला सुध्दा सामोरं जावं लागलं. पण कोणत्याही परिस्थितीत त्यानी हार मानली नाही किंवा माघारी देखील फिरला नाही. कारण त्याचं ध्येय सुरुवातीपासूनच निश्चित होतं की आपल्याला “मॉडेल-कम-अभिनेता” व्हायचं आहे. कालांतराने अनेक ब्रॅण्ड्स कडून बोलवणं आलं त्याकाळात “रोगोर पेस्टीसाईड्स”, “कपड्यांच्या जाहिरातींसाठी प्रिंट पोजेस” तर “क्युटिक्युरा साबणासाठी” अंकुशनी स्वत:ला मॉडेल म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. तसंच “मॅग्मा कॅलेंडर”च्या पृष्ठासाठी अंकुश ने फोटोशुट केलं असुन “माझ्यासाठी हा स्मरणीय अनुभव” असल्याचं तो आवर्जुन सांगतो.
“मुळात माझं कोणीही मार्गदर्शन करणारं नसल्यामुळे मॉडेलिंग फिल्ड मध्ये वावरताना ब-याच अडचणी आल्याच” अंकुश सांगतो. “पण ऑडिशनच्यावेळी अनेक तरुण तरूणींना पाहून त्यांच्या पोजेसकडे पाहून व बारकाईने अभ्यास करत तसंच मॉडेलिंग वर आधारीत असणार्या पुस्तकांचं आणि मॅगझीनच वाचन करुन मी स्वत:च बारकावे शिकत गेलो. स्वत:ची शरिरयष्टी शाबूत राखण्यासाठी दररोज ‘जॉगिंग’, ‘नियमित व्यायाम’, ‘प्राणायम’,’ प्रमाणशीर डाएट’ यासारखी पथ्यं पाळली असल्याचं” त्याने नमूद केलं. पुढे अंकुश असंही सांगतो की “या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे चढउतारांचा सिलसिला हा सुरूच असतो. रोज फ्रेश चेहरे खोर्याने दाखल होतात, त्यामुळे इतरांकडे पाहून स्वत:चा आत्मविश्वाश डगमगू न देणं किंवा स्वत:चा कामावर ‘फोकस्ड’ राहिल्यास आणि कामाची तळमळ असेल तर यश हमखास मिळतंच, असा विश्वास सुध्दा तो व्यक्त करतो”.
अंकुशच्या आत्मविश्वास व कलासक्त व्यक्तिमत्वामुळे दूरचित्रवाणीचं माध्यम त्याच्यासाठी खुलं झालं ते देखील हिंदीत! अनु कपूर यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केल्यामुळे त्याचा यशाच्या कमानीला अधिक गती मिळाली. झी टि.व्ही वरील “भागोवाली”, तर सोनी वाहिनीवरील “सुर्या-द सुपर कॉप”, “फियर फाइल्स” या मालिकांमधून तर कन्नड टेलिफिल्म मधून अंकुशने अभिनयात आपली चुणूक दाखवली आहे. सध्या नाटकांमध्ये व मराठी-हिंदी चित्रपटांसाठी त्याचे प्रोजेक्ट्स सुरु आहेत.
“अभिनय आणि मॉडेलिंग विश्वात जर टिकुन राहायचं असेल तर आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘वाचन’. निरनिराळ्या विषयांवर वाचत असल्यामुळे त्याचा फायदा आणि उपयोग होत असल्याचं” अंकुश म्हणतो.
विविध कलांचा प्रचंड अभ्यास, निरीक्षणाची वृत्ती यांसारख्या गुणांमुळेच अंकुश पाटीलला गुणवंत मॉडेल आणि बहुआयामी कलाकार म्हणून यशस्वी होण्यास नक्कीच मदत होईल. आणि तो दिवस देखील दूर नाही जेव्हा अंकुशच्या रुपानं कलेच्या प्रांगणात नवा तारा उदयास येऊन कायमच चमकत राहील.
अंकुश पाटील यांच्यावर चित्रीत झालेला व्हिडिओ आपण खाली पाहू शकता :-
(वरील व्हिडिओ या वेबसाईटवर दाखविण्याची परवानगी अंकुश पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे.)
— सागर मालाडकर
Leave a Reply