नवीन लेखन...

मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.

सुरुवातील टॅक्सी हे वाहन होतं मुंबईत बाबेरून येणाऱ्या राजे-रजवाड्यांसाठी. ‘हे वाहन आपल्यासाठी नव्हेच’अशी सर्वसामान्य नागरीकांचा समज होता. तो रास्तही होता कारण हिचं महागडं भाडं. नंतर हिच्या वेगाच्या बरोबर मुंबईतला व्यापार उदीम वाढला आणि ही संस्थानिकांसोबत मुंबयतल्या शेठ लोकांनाही परवडू लागली. तरीही ही सामान्यांच्या आवाक्याबाहरचीच होती. मी लहान असताना, म्हणजे १९७०-७५ च्या दरम्यान हिच्यात बसणं अप्रुपाचं होतं. पुढे मोठेपणी हिला वश करून घ्यावं अशी परिस्थिती आली, तर ही कोणत्याही सौंदर्यवतीसारखी ‘नय आना तुमारे साथ’ म्हणत भर्रकन निघून जायचा. हिला आपल्यासाठी एंगेज होताना पाहून, आवडणारी पोरगी पटण्यासारखं वाटायचं..

हां हां म्हणता काळ बदलला. आकडण्यात आणि फणकरे दाखवण्यात आपलं वय चाललंय, हेच अनेक लावण्यखणींच्या लक्षात येत नाही, तसं हिचं काहीसं झालं. ‘तू नही तो और सही’ ह्या ब्रिदाला जागून जन्मजात आशिक दुसरीकडे प्रयत्नाला लागले आणि मग हिच्याच तरुण, देखण्या, शिडशिडीत बांध्याच्या ‘कूल’ बहीणी रस्त्यावर अवतरल्या आणि मुंबईकर त्या पहिलीला विसरले. आता वय गेलेल्या ‘त्या’ फ्याट बाया आशाळभुतपणे आपल्या या एकेकाळच्या आशिकाकडे पाहात बसतात आणि ह्यांचा त्या काळचा मुॅबैकर आशिक मात्र यांच्या तरूण, कूल बहिणीच्या कुशीत बसून यांच्याच समोरून निघूनही जातो. इश्काचे वय निघून गेलेल्या या सुंदरींना आता कोण विचारणार..नंतर बसावं म्हटलं तर ती कुणालाही ‘नाही’ म्हणून आपल्याच तोऱ्यात, मागे मुंबईकर, आणि आता ही त्यांच्या दारात सर्व सेवेला, हे म्हणतील तिथे हजर एवढा अप साईड डाऊन ट्रेंड पाहिलेल्या मुंबईच्या या सुप्रसिद्ध मोटराईज्ड टॅक्सी सेवेला १०० वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत.

टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबंईत १९११-१२ च्या सुमारास झाली. सन १९०१ साली मुंबईच्या रस्त्यावर जमशेदजी टाटा या अचाट कर्तुत्वाच्या भारतीय माणसाची पहिली मोटरकार धावली आणि मुंबईच्या समाजजीवनाने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या मोटरगाड्यांची संख्या आस्ते आस्ते वाढू लागली आणि त्यावेळच्या मुंबईकरांच्या जगण्यालाही वेग येऊ लागला. सार्वजनिक वाहतुरीसाठी टांगा आणि ट्रामपेक्षा वेगवान वाहन हवंस वाटू लागलं. लोकांची इच्छा आणि गरज ओळखून सन १९११ च्या आसपास ब्रिटीश सरकारने सार्वजनिक वापरासाठी टॅक्सी परवाने द्यायला सुरुवात केली आणि मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी धावू लागल्या.

सुरुवातीला मुंबईतल्या मोटार गाड्या म्हणजे टांग्याच्या केबिनची थोडी सुधारित आवृत्ती होती. या गाड्यांना वरून पक्का टप नसायचा, तर दुमडता येण्यासारखे मेण कापडाचे अथवा कॅनव्हासचे छत असायचे. तेंव्हा पक्के टप (हार्ड टॉप) असलेल्या गाड्या अगदी दुर्मिळ आणि किंमतीलाही महाग असायच्या. अश्या टप असलेल्या गाड्यांना तेंव्हा ‘लॅन्डो बॉडी’ गाडी म्हणायचे. १९११-१२च्या सुमारास सुरु झालेल्या टॅक्सी सेवेमधेही याच गाड्या आल्या. फोर्ड, शेवरले, ब्युक आदी देखण्या माॅडेलच्या प्रशस्त गाड्या वाटायच्यीच राजेशाही. एखादी मर्सिडीजही टॅक्सीत होती. गाड्या मोठ्या असल्यामुळे कितीही माणसं कोंबायची त्या काळी परवानगी होती.

मुळात राजे-रजवाड्यांसाठीच सुर झालेल्या या सेवेत एक गडबड हमखास व्हायची, ती टॅक्सीच्या काळ्या कुळकुळीत रंगामुळे. त्या काळातल्या सर्वच कंपन्यांच्या, खाजगी उपयोगासाठी असो की टॅक्सीसाठी असो, गाड्यांचा रंग काळाच असायचा. दुसऱ्या रंगाच्या गाड्या बनायच्याच नाहीत. इथे मुंबयकरांचा गोंधळ व्हायला लागला. टॅक्सी म्हणून एखाद्या गाडीला हात दाखवायचा, तर ती नेमकी कुठल्याचरी संस्थानच्या राजाची गाडी निघायची आणि मग ‘बेवकूफ, तुम क्या हमको ट्याक्सीवाला समजता क्या’ या टाईपचं इगोसंबंधीत भांडणंही व्हायची. आता हे काही कुठं लिहिलेलं नाही, पण मनाने क्षणभर त्या काळात जाऊन हे प्रसंग कसे साग्रसंगीत साजरे होत असतील त्याची कल्पना आजच्या काळावरून करु शकतो करु शकतो. आता ज्या अनेक माॅडेलच्या गाड्या टॅक्सी सेवेत आल्यात, त्या जर एकाच रंगाच्या असत्या, तर जे काही झालं असतं, तेच नेमकं त्या काळात होत असावं..!

अशा गोंधळाच्या वेळी कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून शक्कल निघाली, की जी टॅक्सी असेल त्या टॅक्सी मिटरच्या दांडीवर ‘पिवळा कपडा’ लटकावून ठेवायचा आणि जर ती टॅक्सी एंगेज असेल, तर त्याच कपड्याने मिटर गुंडाळून टाकायचा. त्याकाळात टॅक्सीचा मिटर मधल्या काळातल्या फियाट टॅक्सीसारखा टॅक्सीच्या बाहेर बाॅनेटच्या डाव्या कोपऱ्यात लावलेला असायचा, त्या मुळे, टॅक्सी उपलब्ध असेल तर मिटरला लटकणारं आणि एंगेज्ड असेल तर मिटरला गंडाळलेलं ‘पिवळं फडकं’ लांबूनही दिसायचं आणि लोकांना टॅक्सी लांबूनही ओळखता येऊ लागली. या एवढ्या एका आयडीयेने लोकांमधला गोंधळ संपुष्टात आला आणि सर्व सुरळीत होऊन गेलं..! ही कल्पना नक्कीच एखाद्या देशी डोक्यातून आली असावी यात शंका नाही, कारण भल्या भल्या शास्त्रज्ञांच्या डोक्यातही न येऊ शकणारा लोकोपयोगी सोपा जुगाड करण्यात आपण हुशार आहोत..!!

या पिवळ्या रंगाच्या कपड्यावरून लोकांना टॅक्सी ओळखणे सोपं झालं आणि पुढे हाच पिवळा रंग टॅक्सीच्या टपावर जाऊन बसला आणि टॅक्सीला हळद लागली, ती आजपर्यंत उतरलेलीच नाही..खालची काळी चंद्रकळा मात्र सुरुवातीपासून ची तिच आहे..! टॅक्सीला लागलेल्या हळदीची कथा ही अशी आहे..!

आताही काली-पिली आहेच, पण मागाहून आलेल्या तिच्या कूल बहिणी किंवा मेरू, ओला, उबर इत्यादी भगिनी विविध रंगाच्या मिड्या-साड्या ल्यायलेल्या असल्या तरी, हळदीच्या रंगाच्या नंबर प्लेटच्या रुपाने त्या जुन्या हळदीचं बोट लावल्याखेरीज रस्त्यावर येऊ शकत नाहीत..!!

— नितीन साळुंखे
9321811091

‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ लेखमाला – लेख १९ वा

संदर्भ –
‘स्थल-काल’ – श्री. अरुण टिकेकर २००४
‘माय मुंबाई’ – वा.वा.गोखले- १९९१

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

2 Comments on मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

  1. Khup sunder pane hey sangitl gele ahe ani lokana hey kalnar ki ka kali pili mhantat, Atachi pidi la hey mahit nasel jasa mala mahit nhavata pan hey vachlya nantr kalala ani amhi ajun lokana sangu shakto.

  2. good information taxi matter (kali-pili).good topic mumbai taxi la lagleli haldi chi ghostt. I don’t know old taxi information. but salunkhe sir u giving good information & reading time I will go (old days).

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..