नवीन लेखन...

कालिकाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे.  ध्यान जितके भयावह आहे, स्तुती तितकीच रसाळ आहे. मातेचे हे रूप जितके मोहक आहे तितके ते मानवी आकलनापलिकडे आहे.


ध्यानम्

गलद्रक्तमुण्डावलीकण्ठमाला
महोघोररावा सुदंष्ट्रा कराला ।
विवस्त्रा श्मशानालया मुक्तकेशी
महाकालकामाकुला कालिकेयम् ॥१॥

मराठी- ज्यांच्यातून रक्त टपकत आहे अशा मुंडक्यांची माळ जिच्या गळ्यात आहे, जी अत्यंत उच्च स्वरात गर्जना करीत आहे, जिच्या दाढा आणि सुळे भीषण आहेत, जी विवस्त्र आहे (जिचे कपडे विस्कटलेले आहेत), स्मशान हेच जिचे घर आहे, केस मोकळे सोडलेली, महादेवासह कामक्रीडेत व्यग्र अशी ही भगवती कालिका आहे.

गळे रक्त माळा गळा मुंडक्यांची
स्वरे गर्जना उंच, भीती सुळ्यांची !
न वस्त्रे, स्मशानी, महादेव संगे
अशी कालिका कामक्रीडेत रंगे !! ०१


भुजेवामयुग्मे शिरोऽसिं दधाना
वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथैव ।
सुमध्याऽपि तुङ्गस्तना भारनम्रा
लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या ॥२॥

मराठी- जिने डावीकडच्या दोन हातात मुंडके आणि तलवार धरली आहे, तर उजवीकडच्या दोन हातात अभय व वरदान दिसते आहे, सुडौल कटी असूनही उत्तुंग वक्षांच्या वजनाने ती पुढे झुकलेली आहे,तिच्या ओठांचा कडेचा भाग रक्ताने चमकत आहे आणि तिच्या मुखावर मधुर हास्य झळकत आहे.

धरी मुंडके खड्ग ही वाम हाती
दुजे दे वरा नष्ट हो सर्व भीती ।
कटी नेटकी, वक्ष उत्तुंग, वाके
मुखी हास्य, ओठी जरी रक्त झाके ॥ ०२


शवद्वन्द्वकर्णावतंसा सुकेशी
लसत्प्रेतपाणिं प्रयुक्तैककाञ्ची ।
शवाकारमञ्चाधिरूढा शिवाभिश्_
चतुर्दिक्षुशब्दायमानाऽभिरेजे ॥३॥

मराठी- तिचे केस सुरेख असून तिच्या दोन्ही कानात प्रेताच्या आकाराची आभूषणे आहेत, शवांच्या हाताची मेखला चमकत आहे, प्रेताच्या आकाराच्या मंचकावर ती बसली आहे, तिच्या चहू बाजूंनी कोल्हे भयावह आवाज करीत आहेत.

शवाकार कानी अलंकार दोन्ही
कटीमेखला प्रेत-हातां करोनी |
सुकेशा बसे मंचकी प्रेतकारी
चहूबाजु कोल्हेकुई दीन भारी ॥ ०३


स्तुतिः

विरञ्च्यादिदेवास्त्रयस्ते गुणास्त्रीन्
समाराध्य कालीं प्रधाना बभूबुः ।
अनादिं सुरादिं मखादिं भवादिं
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥१॥

मराठी- ब्रह्मा आदिक तीन देव कालीच्या तीन गुणांचा आधार घेऊन व तिची उपासना करूनच प्रमुख झाले. तिचे उद्गम नसलेले, देवतांमध्ये श्रेष्ठ, यज्ञयागांचा प्रारंभ असणारे व जगताच्या आरंभापासून आस्तित्वात असलेले स्वरूप देवांनाही ठावे नाही.

विधातादि आधार देवां गुणांचा
तिन्ही, मुख्य होण्या करी कालि-अर्चा ।
अनादी सुरश्रेष्ठ यज्ञा अधीचे
तुझे रूप ठावे  न विश्वोद्गमाचे ॥ ०१


जगन्मोहनीयं तु वाग्वादिनीयं
सुहृत्पोषिणीशत्रुसंहारणीयम् ।
वचस्तम्भनीयं किमुच्चाटनीयं
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥२॥

मराठी- सर्व जगाला वेड लावणारे, वाणीला स्तुत्य वाटणारे, सज्जनांचे पालन करणारे तर शत्रूंचा नाश करणारे, शब्दांना स्तब्ध करून त्यांचे उच्चाटन करून टाकणारे असे तुझे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

जगा वेड लावी, असे स्तुत्य वाचे
सखे वाढवी, अंतकारी अरींचे ।
करी बोलती बंद शब्दां खुडोनी
तुझे रूप अज्ञात, देवांस ज्ञानी ॥ ०२


इयं स्वर्गदात्री पुनः कल्पवल्ली
मनोजास्तु कामान् यथार्थं प्रकुर्यात् ।
तथा ते कृतार्था भवन्तीति नित्यं
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥३॥

मराठी- ही (भक्तांना) स्वर्ग प्रदान करणारी तसेच इच्छिलेले देणारी कल्प लता आहे. मनात उत्पन्न होणा-या आशांना यथायोग्य पूर्णत्वास नेणारी आहे. त्यामुळे ते कायमचे तृप्त होतात. हे असे तुझे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

करी देव लोक प्रदाना सदा ही
जसे वांछिले देत भक्तांस पाही ।
मनी येत आशांस पूर्णत्व देई
तुझे रूप देवांस ठावेच नाही ॥ ०३


सुरापानमत्ता सुभक्तानुरक्ता
लसत्पूतचित्ते सदाविर्भवत्ते ।
जपध्यानपूजासुधाधौतपङ्का
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥४॥

मराठी- तू (युद्धसमयी) सोमपानामुळे आवेशपूर्ण असतेस पण सज्जन भक्तांच्या बाबतीत मात्र वत्सल असतेस, जप, पूजा, ध्यान रूपी अमृताने ज्याचे किल्मिष धुवून टाकले आहे अशा तेजस्वी पवित्र हृदयात तुझा प्रादुर्भाव होतो, असे तुझे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

सुराधुंद ती प्रेम भक्तांस देई
जप ध्यान पूजामृताने सफाई ।
अशा शुद्ध चित्ती अभिव्यक्त होते
तुझे रूप ठावे नसे हे सुरांते ॥ ०४


चिदानन्दकन्दं हसन् मन्दमन्दं
शरच्चन्द्रकोटिप्रभापुञ्जबिम्बम् ।
मुनीनां कवीनां हृदि द्योतयन्तं
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥५॥

मराठी- प्रज्ञा आणि आनंद यांचा मेघ असलेले, मंद स्मित हास्य करणारे, शरदातील कोट्यवधी चंद्रांच्या तेजाचे प्रतिबिंब असलेले, मुनींच्या व कवींच्या हृदयात प्रकाश टाकणारे असे तुझे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

मती-मोद-मेघा जसे, मंद हासे
शरत्कोटिचंद्रा जसे तेज भासे ।
कवींच्या मुनींच्या मनी जे प्रकाशे
तुझे रूप ठावे न देवांस ऐसे ॥ ०५


महामेघकाली सुरक्तापि शुभ्रा
कदाचिद् विचित्राकृतिर्योगमाया ।
न बाला न वृद्धा न कामातुरापि
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥६॥

मराठी- कधी (एखाद्या प्रलयंकारी) प्रचंड ढगाप्रमाणे काळा, कधी (रक्तासारखा) लालभडक तर कधी गोरापान रंग असणारी, विलक्षण आकृती असलेली, ना लहान मुलगी, ना म्हातारी, ना विकारवश तरुणी असे तुझे योगमायेचे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

कधी लाल, गोरी, घनाजेवि काळी
तुझी योगमाया दिसे भिन्न वेळी ।
नसे बालिका जर्जरा कामबद्धा
न ठावे तुझे रूप देवांस सुद्धा ॥ ०६


क्षमस्वापराधं महागुप्तभावं
मया लोकमध्ये प्रकाशिकृतं यत् ।
तव ध्यानपूतेन चापल्यभावात्
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥७॥

मराठी- हे तुझे अत्यंत गुप्त स्वरूप, ध्यान करून पावन झालेल्या मी माझ्या (स्वभावातील) चंचलेतेमुळे या जगात उघड केले याबद्दल मला क्षमा कर. तुझे स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

तुझे गौप्य माहात्म्य माझेकडूनी
प्रकाशात आले जगी, मग्न ध्यानी ।
उतावीळ, माझी क्षमायाचना ही
तुझे रूप देवांस ठावेच नाही ॥ ०७


यदि ध्यानयुक्तं पठेद् यो मनुष्यस्_
तदा सर्वलोके विशालो भवेच्च ।
गृहे चाष्टसिद्धिर्मृते चापि मुक्तिः
स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ॥८॥

मराठी- जर कोणी मानव (हे स्तोत्र) ध्यानपूर्वक (ध्यान लावून) म्हणेल, तर तो सर्व जगती थोर मोठा बनेल. त्याच्या घरात अष्टसिद्धी नांदतील तसेच मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळेल. असे तुझे  स्वरूप देवांनाही ठाऊक नाही.

कुणी हे म्हणे स्तोत्र लावून ध्याना
जगी थोर मोठा बने खास जाणा ।
घरी आठ सिद्धी, मिळे मोक्ष अंती
तुझे रूप येई  सुरांच्या न चित्ती ॥ ०८।

| असे श्रीमत् शंकराचार्यांनी रचलेले श्रीकालिकाष्टक समाप्त ।

*************************

धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..