मी शाळेत असताना, माझ्या वडिलांनी मला व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘माणदेशी माणसं’ हे पुस्तक वाचायला दिलं. मी ते एका बैठकीत, वाचून काढलं. त्या जुन्या आवृत्तीमध्ये दीनानाथ दलाल व द. ग. गोडसे यांनी काढलेली रेखाचित्रे होती. सुरुवातीलाच झोपडीपुढे बसलेला उघडा, धर्मा रामोशी भेटला.. नंतर गळ्याशी पैरण धरलेला, झेल्या दिसला.. नामा मास्तर, बन्या बापू, कोंडिबा गायकवाड नंतर तांबोळ्याची खाला दिसली.. चालताना धोतराचा एक टोक चिमटीत धरून चालणारा, रघू कारकून भेटला.. खळाळून हसणाऱ्या बिटाकाका नंतर पाठीवर धोपटी घेतलेला, रामा मैलकुली दिसला.. गणा महार, शिवा माळी, अस्वलाला नाचवणारा बाबाखान दरवेशी भेटला.. मुलाण्याचा बकस, माझा बाप, शिदा चांभार नंतर लक्षात राहिला तो लाकडाच्या ओंडक्यावर उकीडवा बसलेला, गणा भपट्या..
ही खेडेगावात हमखास दिसणारी बारा बलुतेदारं व साधीभोळी माणसं व्यंकटेश माडगुळकरांनी हुबेहूब चितारली.. या लेखनामागे त्यांच्या वडिलांची एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी व आईची चित्रकला कारणीभूत आहे.
६ जुलै १९२७ व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगलीतील, माडगूळ गावी झाला. पाच भाऊ, दोन बहिणी व आई वडील असं मोठं कुटुंब. प्रतिकूल परिस्थितीमुळे चित्रकलेची साधनं परवडली नाहीत, म्हणून लेखक झालो.. ही खंत त्यांनी एकदा मुलाखतीत बोलून दाखवली होती.
‘काळ्या तोंडाची’ ही त्यांची पहिली कथा १९४६ साली प्रकाशित झाली. १९४९ साली ‘माणदेशी माणसं’ लिहिली. १९५५ साली ‘बनगरवाडी’ लिहिली. अनेक कथासंग्रह, कादंबरी, नाटकं, लोकनाट्यं, पटकथा लेखन, जंगल व वन्य प्राणी असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे.
‘बनगरवाडी’ वाचल्यानंतर मला यावर चित्रपट व्हायलाच हवा, असं मनापासून वाटत होतं. व्ही. शांताराम यांनी या कादंबरीवर चित्रपट करण्याचे ठरविले होते, मात्र प्रत्यक्षात घडले नाही. अमोल पालेकर यांनी मात्र माझं हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं.. चित्रपट निर्मिती अप्रतिम झाली. चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले.
व्यंकटेश माडगूळकर, काळ्या कॅनव्हासवरील रंगकाम अपुरेच ठेवून २८ ऑगस्ट २००१ रोजी गेले.. ३० वर्षे आकाशवाणीवर प्रदीर्घ सेवा केलेले, ज्यांचे साहित्य डॅनिश, जर्मन, जपानी भाषेत अनुवादित झालेले आहे. ज्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत, असे ज्येष्ठ लेखक पुन्हा होणे नाही..
‘माणदेशी माणसं’ मधील ‘झेल्या’ हे व्यक्तीचित्र मला अतिशय भावलेलं आहे.. मी ते अनेकदा वाचलेलं आहे.. आज ७३ वर्षांनंतरही जेव्हा मी माझ्या गावी जातो, तेव्हा माळावरच्या शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांमध्ये मी ‘झेल्या’ला शोधत राहतो…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-७-२२.
Leave a Reply