कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिःलक्ष्मीस्वयंवरण मंगलदीपिकाभिः ।
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम् ॥ १ ॥
आई जगदंबेच्या या नितांतसुंदर स्तोत्राचा पहिल्या चरणात आलेल्या कल्याणवृष्टी या पहिल्याच शब्दाच्या आधारे या संपूर्ण स्तोत्रालाच कल्याणवृष्टिस्तव या नावाने ओळखले जाते.
आई जगदंबे की दृष्टी सकल कल्याणाचे अधिष्ठान आहे, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात,
कल्याणवृष्टिभिरिवामृतपूरिताभिः- आई सकल कल्याणाची वृष्टी करणारी तुझी ही दृष्टी अमृताने भरलेली आहे.अर्थात ज्याच्यावर हा दृष्टिपात होतो त्याला अमृत प्राप्त होते. अमृत स्वर्गात असते. म्हणजे जणूकाही त्या साधकाला या जगातच स्वर्गीय आनंद प्राप्त होतो.
लक्ष्मीस्वयंवरण- आईच्या दृष्टीचे वैभव म्हणजे ती ज्याच्यावर पडते त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःच धावत येते. जगात बाकी सगळ्यांना लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतात. मात्र आई जगदंबेच्या कृपा पात्र साधकाला या जगातील सर्व सुखे आपोआप
बसल्याजागी मिळतात. हे आचार्य कथन किती सुंदर आहे?
मंगलदीपिकाभिः- आईची दृष्टी मंगलाची दीपिका आहे. दीप प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करतो. तो नसला तर समोर असलेली गोष्ट ही अंधारात दिसत नाही. तो असला की सर्वत्र लख्ख दिसू लागते. तशी आईची कृपादृष्टी प्राप्त झाली की सर्वत्र मंगलच मंगल दिसू लागते. अमंगलाचा अंधार दूर होतो.
सॆवाभिरम्ब तव पादसरॊजमूलॆ- हे आई जगदंबे एकदा तुझा चरणकमलांची सेवा करण्याला सुरुवात केली की मग त्या सेवेने,
नाकारि किं मनसि भाग्यवतां जनानाम्- त्या भाग्यवान जणांच्या मनामध्ये असलेले काय होत नाही? अर्थात त्यांच्या मनात जे जे येईल ते पूर्ण सफलच होते.
अशी आईची सेवा करणाऱ्या साधकाला आचार्य भाग्यवंत म्हणत आहेत.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply