लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् ।
नूनं मया तु सदृशः करुणैकपात्रं
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा ॥ १० ॥
भक्ताच्या आणि भगवंताचे नाते माता पुत्रासमान असते. इथे तर भगवती आई जगदंबेचाच विषय आहे. त्या पुत्र वात्सल्याचे विविध पैलू आचार्यांच्या विवेचनात प्रकट होत आहेत. आईला अनेक लेकरे असतात. सगळेच तिला प्रिय असतात. पण त्यातही जे लेकरू थोडे दुर्बल असते, असहाय्य असते, हतबल असते, त्यावर आईचे थोडे अधिक लक्ष असते. व्यवहारातील मातेचा हा स्वभावविशेष येथे आधार करीत आचार्य श्री आई जगदंबे ला स्वतःकडे लक्ष द्यायला सांगत आहेत.
आईच्या विश्वजननी स्वरूपाला मान्य करत ते आरंभी म्हणतात,
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् – आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाने निरीक्षण करावे असे असंख्य जीव असले तरी ही त्रिपुरसुंदरी माझ्याकडे कदाचित पाहील.
अर्थात तिच्या कृपेला पात्र जगात असंख्य लोक आहेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत मी अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे पहिल्या आवेगात माझ्याकडे लक्ष जाणार नाही हे ठीक आहे. पण तरी ती त्रिपुरसुंदरी माझ्याकडे पाहील.
हा एक तर माझा विश्वास आहे आणि दुसरा माझा नाईलाज.
विश्वास यासाठी की ती जगज्जननी आहे तर मग माझा अव्हेर कसा करेल? आणि नाईलाज यासाठी की तिच्या शिवाय मला आहे तरी कोण?
आई जशी हतबल लेकराकडे अधिक पाहते तशी ती माझ्याकडे पाहणारच. कारण,
नूनं – खरोखरच
मया तु सदृशः- माझ्या समान.
करुणैकपात्रं- करूणेला पूर्णपणे पात्र.
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा – आजवर कोणी जन्माला आला नसेल किंवा कदाचित भविष्यात जन्माला येणार ही नाही.
मग माझी आई ! तुला माझ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply